Ananda Owari (अानंदअोवरी): Marathi Text

I’ve typed the complete text of Ananda Owari below. I will proofread it again before it goes to print.

I’m now going through the text again and fixing typos… still finding A LOT.

I’ve corrected the text up through Ch. 22 (24 October)

अानंदअोवरी

दि. बा. मोकाशी

|| १ ||

तुका हरवला तो दिवस सोमवार होता. फाल्गुन वद्य द्वितीया होती.  अजून पहाटे रानात धुकट हवा होती.  त्या दिवशी शोणगोठा उरकून, दुधे काढून, पहिला प्रहर संपतासंपता गवताचा भारा अाणायला मी रानात गेलो.  बरोबर भाकर बांधून घेतली होती.

विळ्याचा हात गवतावर झपझप चालत होता अाणी अधूनमधून स्वतःचे पूर्वीचे रचलेले अभंग कवीच्या अात्मानंदात मी म्हणत होतो.  पण त्यांतून प्रपंचाचे विचार घुसत होते.  रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातील प्रश्नांचा विचारही चांगला होतो. कोंडलेले संताप, निराशा यांना बडबडून वाट करून देता येते.  गवत कापताना माझे तेच चालले होते.  मी माझ्या बायकोला समजावीत होतो.  वहिनीचे–तुकाच्या बायकोचे–सांत्वन करीत होतो.  दुकानाचे विचार मनात होतेच.  गाठी असलेल्या तोटक्या द्रव्यात संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवीत होतो.  अाणि वीसबावीस दिवस तुकाने वैकुंठाचा टकळा सुरू केला होता तोही मनातून जात नव्हता.  मी म्हणत होतो, तुकादादा !  तू जर थोडेसे प्रपंचात लक्ष घातलेस तर अापण किती सुखी होऊ !

गेली काही वर्षे प्रपंचाला तुका निरुपयोगी झाला होताच.  पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा अावेग वाढला होता.  जगाची शुद्ध गेल्यासारखे त्याचे झाले होते.  भजन करताना इतके बेभान मी त्याला कधी पाहिले नव्हते.  अातापर्यंत कधी नव्हती एवढी अार्तता त्याच्या कवित्वात अाली होती.  त्या अार्त अभंगांचे शब्द मानगुटीस बसल्यासारखे मनाला सोडत नव्हते.  मधून नकळतच मी गुणगुणत होतो,

“पैल अाले हरी | शंख चक्र शोभे करीं ||

गरूड येतो फडत्कारें | ना भी ना भी म्हणे त्वरें ||

मुगुटकुंडलांच्या दीप्ति | तेजें लोपला गभस्ति ||

मेघश्यामवर्ण हरि | मूर्ति डोळस साजिरी || ”

अाणि दचकून सावध होऊन स्वत:ला बजावीत होतो, कान्ह्या !  सावध !  इतका दंग होऊ नकोस.  हा तुझा मार्ग नव्हे.  मग हा तुकाचा मार्ग अाहे का ?  केव्हा ठरला हा मर्ग तुकाचा ?  कुणी ठरविला ?  कधी ?  मी अाठवू लागलो….लहानपणी तुका अामच्याबरोबरच अामच्याप्रमाणे सर्व खेळ खेळला होता.  मग तो दुकानात बसू लागला.  मग अामचे अाईवडील गेले.  अाणि मागचे अाठवताना नकळतच तुकाने स्वत:चे चरित्र सांगितले ते अाठवले.

चरित्र सांगण्याचा हा प्रसंग अानंदअोवरीवर घडला.  अामच्या घरच्या अोवरीला अानंदअोवरी म्हणत.  इथे अामचे बालपण हुंदडले, जाणतेपण गरजले.  इथे बसून तुकाने अभंग लिहिले अाणि पुष्कळदा तुका व त्याचे सहकारी इथेच अभंगसंकीर्तन कतीत.  एका रात्री कीर्तनानंतर तुकाच्या सहकाऱ्यांनी फारच अाग्रह केला की, बोवा !  तुमचे चरित्र ऐकायचे अाहे.  तेव्हा संकोचाने पंधरावीस अभंगांतून तुकाने ते संक्षेपाने सांगितले.

ते अभंग मी म्हणू लागलो.  पण म्हणता म्हणता ते कशासाठी म्हणत होतो ते विसरलो.  तुकाचे अभंग म्हणू लागले की भान राहत नाही हा नेहमीचा अनुभव अाहे.  मी स्वत: अभंग रचले अाहेत–तुकयाबंधू म्हणून, कान्होबा म्हणून.  तुकाचे पाहून अनेकांनी रचले अाहेत.  रामा म्हणे, गोंद्या म्हणे, किशा म्हणे असे घराघराअाड कवित्व सुरू झाले तेव्हा मी सोडून दिले.

|| २ ||

त्या दिवशी दुपारपर्यंत मी गवत कापले.  झाडाखाली बसून भाकर खाल्ली.  नदीवर पाणी प्यालो.  मग एक वाळलेले झाड दिसले.  ते जळणासाठी तोडले.  गवताचा भारा बंाधला.  त्यावर लाकडे अावळली अाणि डोकीवर घेऊन घराकडे निघालो.

घरी येऊन बेड्यात दोन्ही अोझी झोकून घरात गेलो.  अात तुकाची बायको भिंतीला पाठ टेकून समोर पाय पसरून बसली होती.  ती सहा महिन्यांची गर्भार होती.  तिच्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली होती.  भिंतीवर मान टेकून ती हताश नजरेने शून्यात होती.

काय झाले असेल मी अोळखले.  तुका नक्की पुन्हा गायब होता.  हा प्रसंग तसा जुनाच.  गेला महिनाभर अापल्याला वैकुंठाचे बोलावणे अाले अाहे–अापण वैकुंठाला जात अाहोत, असे गात तुका बाहेर पडत होता अाणि अाता गर्भार असल्यामुळे त्याला शोधायला तिला डोंगर-राने तुडविता येत नव्हती.  त्यासाठी ती माझ्या येण्याची वाट पाहत बसली होती.  एकदा तिने माझ्याकडे पाहिले मात्र.  ती थकली होती–गर्भाचा भार वाहून अाणि तुकाच्या अायुष्याचे अोझे वाहून.  तुकाजवळ अायुष्य काढणे सोपे नव्हते.  “भावोजी” तिने हाक मारली अाणि ती घळघळा रडू लागली.

माझ्या बायकोने पुढे होऊन सांगितले की, तुकाभावोजी काल रात्री जे कीर्तनाला गेले ते अजून अालेले नाहीत.  मुले देवळात पाहून अाली होती.  तुकाभावोजी तेथे नव्हते.

बायकोचे ऐकताच मी हातातला विळा कोनाड्यात सारला.  वर खोवलेले धोतर तसेच ठेवून बाहेर पडलो.  बाहेर अानंदअोवरीवर पाहिले.  तुकाची टाळ-गोधडी जाग्यावर नव्हती.  तडक देवळात गेलो.  तिथेही दादाची टाळ-गोधडी दिसली नाही.  तेव्हा विठ्ठलरखुमाईपुढे अालो.  नमस्कार केला.  मनात अाले–दरवेळी याचे नाव घेत तुका कुठेतरी जाऊन बसतो.  अाता यानेच त्याला शोधून काढावे.  मग विठ्ठलाला म्हटले, “तू कोण अाहेस रे ?  कुणी अाहेस का ?  अामच्या संसारात सारखा व्यत्यय अाणतो अाहेस.  तुका तुझ्यामागे, मी तुकाच्या मागे.  किती दिवस घालणार हा गोंधळ ?  गवताचे भारे अाणायचे कुणी ?  साठवायचे कुणी ?  दुधे कुणी काढायची ?  शेतावर कुणी जायचे अाणि दुकानात कुणी बसायचे ?  या घराचे कसे होणार ?  सहा महिन्यांच्या गर्भारणीला का नवऱ्याला शोधायला बाहेर धाडणार ?  अाणि तिला गर्भ का राहावा ?”

नमस्कार करून देवळातून बाहेर पडल्यावर गावातील रस्त्यातून मी धावतच निघालो.  लोकांना अाता त्याची सवय झाली होती.  कुणीतरी एखादा म्हणायचा, “गेला वाटते तुका पुन्हा !”  अाणि त्याला शोधून काढून घेऊन अालो की म्हणायचा, “सापडला वाटते ?”  गेले का ?  अाणि सापडला का ?–या दोहोंमध्ये काय काय होत होते, त्यांना काय ठाऊक ?  मला रागाने म्हणावेसे वाटायचे–एखादे दिवशी सापडणार नाही तेव्हा कळेल.  मग माझ्याच मनात अाले, काय कळणार !  काही कळणार नाही.  अातापर्यंत गेले त्यांना लोक विसरले.  तुकाला विसरतील.  परमेश्वराचे रहाटगाडगे इतके जबरदस्त फिरते अाहे !

देवळातून बाहेर पडून मी धावत नदीकडे गेलो.  इंद्रायणीच्या काठी कातळावर उभा राहिलो.  दुपारची उन्हातली स्तब्धता नदीवर पसरली होती.  इंद्रायणीचा प्रवाह चकाकत वाहत होता.  मी तोंडापुढे हाताचा शंख करून हाका मारल्या–“तुका !  दादा !”

मग हाका देत, थांबत-थांबत, काठाकाठाने पुढेमगे धावत, श्वासासाठी थबकत, जिथे जिथे धोका ठाऊक होता त्या ठिकाणी डोहाकडे पाहत, प्रवाहावर काही तरंगत येताना दिसले की धडधडत्या छातीवर हात देत, मी किती वेळ शोधीत होतो कुणास ठाऊक !  संध्याकाळ झाल्यावर थकून एका कातळावर बसलो.

|| ३ ||

संध्याकाळचा काळोख उतरताना कित्येकदा अाम्ही तिघे भाऊ इथे बसलो होतो.  सावाजी, तुका अाणि मी.  सावजी चौदापंधरा वर्षंचा, तुका बारा वर्षंचा, मी दहाएक वर्षंचा असेन.  किती वर्षे गेले !  इंद्रायणीचा प्रवाह असाच वाहत होता.  समोरच्या काठावरची झाडी अशीच डोहात लवून पाहत होती.   इंद्रायणीच्या पलीकडल्या तीरावरील या झाडीचे तुकला नेहमी गूढ वाटे.  तो घटकाघटका त्या झाडीकडे निरखून पाहत बसे.  अाणि मला तिची भीती वाटे.  मी झाडीकडे पाठ करी.  अाधी चरायला सोडलेली ढोरे वळवून अाणून उभी केलेली असत.  माझ्याकडे अाणि तुकाकडे ते काम होते.  फक्त सोबतीला असावा तसा सावजी अामच्याबरोबर असे.  अाम्ही ढोरे नीट चरतात की नाही इकडे नजर ठेवून अासताना सावजी काठावरील एका कातळावर बसे.  त्याचे भजन सुरू होई.  तो गीतापाठ म्हणे किंवा ध्यान लावून बसे.

काळोख अतरण्यापूर्वी ढोरे वळवून अाणून अाम्ही दोघेही सावजीच्या शेजारच्या एखाद्या कातळावर बसत असू.  मग तुका समोरच्या झाडीकडे टक लावून बसल्यावर, त्या झाडीची गर्द पालवी, मोठमोठे तपकिरी बुंधे, त्यांना विळखा घालीत चढत गेलेल्या वेली, या सर्वांमागे काहीतरी भयंकर लपलेय असे मला वाटत राही.  तिथून निरनिराळे चीत्कार घुमत कानावर येत.  डोह काळेभोर चककत.  मधेच वाळकी फांदी पडून धप्प अावाज होई.  रात्री तिथूनच कोल्हेकुईला अारंभ होई.

संध्याकाळ वाढून अाकाश लाल पडू लागले की झाडी काळा रंग घेऊन तटासारखी उभी ठाके.  मला अधिकच भीती वाटू लागे अाणि तुका झाडीविषयी बोलत राही.  त्याला पडणारी स्वप्ने तो सांगे. एका स्वप्नात त्याला दिसे–इंद्रायणीचा प्रवाह अोलांडून त्या झाडीत अापण शिरलो अाहोत.  झाडीतील पाउलवाटेने जाता जाता मागाची वाट बंद होत अाहे.  अापले अाईवील, भाऊबहीण, देहू गाव नाहीसे झाले अाहे.  अापण अगदी एकटे पडलो अाहोत.

दुसऱ्या स्वप्नात हीच झाडी विलक्षण अानंदाची वाटे.  सूर्यप्रकाशात, निळ्या अाकाशावर झाडीतून, झाडीहूनही उंच गेलेल्या एकच एका फांदीवर एखादा शुभ्र बगळा झोके घेत बसलेला दिसे.  तुका नदी अोलांडून झाडीत शिरताक्षणीच झाडी प्रकाशाने फुलून जाई.  पक्ष्यांची सुस्वर गीते चहू वाजूने कानावर येत.  वृक्षवेली कोवळ्या जांभळ्या, पोपटी पानांनी फुललेल्या असत.  फुले वहरलेली असत.  हवेत मंद सुगंध भरलेला असे अाणि पाऊलवाट अापोअाप वाट मोकळी करून देई.  त्याला वाटे, पक्ष्यांबरोबर अापणही गावे.  त्याचा गळा शब्दांनी दाटून येई.  पण शब्द फुटण्यापूर्वीच श्वास कोंडून तो जागा होई.

तुकाने ही दोन स्वप्ने त्या कातळावर बसलो असता कितीतरी वेळा सांगितली असतील. माझे अर्धे लक्ष उभ्या करून ठेवलेल्या अामच्या गुरांकडे असे.  ती पुन्हा उधळली तर अंघारात सापडणार नाहीत अाणि अधेमधे गावाशी येऊन जाणारा वाघ त्यांना खाईल, अशी भीती मला वाटत राही.

त्याच वेळी सावजी प्रवाहाशी अगदी निकट असलेल्या कातळावर ध्यान लावून बसलेला असे.  त्याला अामचे भान नसे.  गुरांचे, नदीचे किंवा झाडीचेही नसे.  कधी तो काही पाठांतर म्हणत राही.  त्या पाठांतराचा एकच एक सूर मला उदास करी.  फार अंधार पडला की अाम्ही त्याला हलवून भानावर अाणीत असू.

मला वाटते, संध्याकाळच्या त्या लाल प्रकाशातच अाम्ही तिघे भाऊ मोठेपणी जसे होणार होतो तसे घडलो.  त्य कातळावर तिघांचे भवितव्य ठरले.  सावजी पुढे संसारमुक्त झाला.  मी संसाराच्या दरीवर, ब्रह्मज्ञानाच्या फांदीला लोंबकळत राहिलो.  अाता त्याच कातळावर बसलो असता माझ्या मनात अाले, जर तुका सापडला नाही तर तिघा भावांतला मी एकटाच उरलो असे होईल.  जिथे तिघांनी बसायचे तिथे मी एकटाच बसलेला राहीन.  मग माझ्या मनात अाले, जे विठ्ठलाच्या मागे लागले त्यांचे असेच होते.  ज्ञानेशांचे अाणि त्यांच्या भावंडांचे असेच झाले.  पण विठ्ठलाच्या मागे लागणे म्हणजे तरी काय ?

अाता अांधार वाढला होता.  रातकिड्यांचे गाणे सुरू झाले होते.  मला उठावेस वाटेना.  सारखे अाम्हा भावांचे विचार मनात येऊ लागले.  अाम्ही असे कसे झालो ?  असे कसे गुंतत गेलो ?

|| ४ ||

माणूस जन्मतो तेव्हा कोरास्वच्छ असतो. पुढे वयाबरोबर तो अहंकारांनी लडबडला जातो.

अाम्हीही असेच लडबडले गेलो. अाम्हांला लहानपणीच केव्हातरी कळले, अाम्ही शूद्र अाहोत, जातीने कुणबी अाहोत अाणि अामचा धंदा वाण्याचा अाहे. या सर्वाला मोठा अर्थ अाहे असे अामच्यावर ठसविण्यात अाले. अाम्हांला कळले की, अामचा सातवा पूर्वज प्रथम देहूला अाला अाणि अाम्ही देहूकर झालो. की, अाम्हांला कळले की, अामच्या जातीचा अाम्ही अभिमान बाळगला पाहिजे. अाम्हांला हेही कळले की, ज्याने त्याने अापली जात सांभाळली पाहिजे. माझ्या मनात अाले, अाम्ही सात पिढ्यांपूर्वी या गावी अालो नसतो तर अाजचे काही झाले नसते. मग इंद्रायणी नसती, ही झाडी नसती, ती स्वप्ने नसती, कदाचित तुकाचे कवित्वही झाले नसते अाणि महाजनही झालो नसतो. अाईने अाम्हांला अाम्ही देहूचे महाजन अाहोत ही सारखी जाणीव दिली तीही दिली नसती. तिला वाटे, अाम्ही महाजनाची मुले अाहोत हे अाम्ही कधी विसरू नये व इतरांना िवसरू देऊ नये. त्यासाठी तिला वाटे, वाटेल त्या पोरांबरोबर खेळून अाम्ही धुळीत मळून येऊ नये. अाम्ही वेगळे कळावे म्हणून त्या वयातही ती अामच्या कानांत भिगबाळ्या किंवा हातात सलकड्या घाली. अाणि अधूनमधून अामच्या हातून खेळताना एखादा अलंकार पडून हरवला की तो, खेळाच्या जागेवर, स्वत: शोधायला येई. काळोख पडेपर्यत तिचे शोधण्याचे काम चाले.

सावजी अामच्यांत मोठा असल्यामुळे सावजीवर तिने अलंकारांची हौस जास्त केली. सावजीला विरक्ती येऊ लागल्यावर अाईने घातलेले अलंकार पुढेपुढे तो हळूच घरात कोनाड्यात काढून ठेवून जाऊ लागला. अाईने सावजीवर नवे अलंकार घालावे, दूर उभे करून त्याला डोळे भरून पाहावे, बोटे मोडावी अाणि तिची पाठ वळताच सावजीने ते काढून ठेवावे. सावजी केव्हापासून यात्रेला जाणार म्हणू लागला होता. यात्रा म्हणजे काय हे तेव्हा त्याला कळतही नसावे. इतक्या लहान वयापासून तो संसारविन्मुख व्हावा याचे मला अाजही अाश्चर्य वाटते. त्याची शरीरकाठी तेव्हापासून तपस्व्याला योग्य अशी होती. काळा किडकिडीत देह, कोरडी अोढलेली कातडी. तेजस्वी मोठे डोळे, लांब हात. जणू अाईच्या पोटात असल्यापासून तो तप करीत असावा. अाई त्याच्या चिंतेत नेहमी चूर असे. अाणि ज्याच्याबद्दल चिंता असते तो लेक लाडका असतो.

अईने महाजनकीचा अभिमान अामच्यांत घातला तर सावजीने अामच्यात, अामच्या मोरे घराण्यात चालत अालेली विठ्ठलाची मिराशी भिनविली.

सावजीचा अावाज गोड होता. त्याच्या भजनाचा सूर अजून माझ्या कानात घुमतो अाहे. घरात देवघरासमोर बसून तो भजन-पूजान-पठण करायचा तिथे तो बसला असल्याचा भास, तो यात्रेला निघून गेल्यावरही, मला अनेकदा होत असे. अगदी पहाटेच्या अंधारात तो इंद्रायणीवर जाऊन स्नान करी. मग अोलेत्याने तो अामच्या वडिलार्जित विठ्ठलमंदिरात जाई. तिथे पूजा, पारायणे वगैरे अाटोपून तो घरच्या देवांची पूजा करण्यास येई. तिथेही पूजापठण होत असेच. मला अाठवते तेव्हापासून, घरच्या देवाकडून विठ्ठलमंदिर अाणि उलट, असे दिवसभर त्याचे चालू असे. रस्त्याने तो सरळ समोर पाहत जाई. कुणाशी बोलताना त्याला पाहिल्याचे मला अाठवत नाही. वडिलांपुढे तो फारसा जात नसे.

दिवसभर अामच्याशी त्याला बोलायला वेळ होत नसे. पण संध्याकाळी नदीवर जाताना किंवा नदीवरून परत येताना तो अाम्हांला अामच्या कुटुंबातील विठ्ठल-भक्तीच्या परंपरेच्या गोष्टी सांगे. त्या गोष्टी एक तर भावोत्कट किंवा एक तर अद्-भुत असत.

सात पिढि्यांपूर्वी अाम्ही देहूकर झाले हे ऐकताना अाम्हांला अभिमान वटे. सात पिढ्या देहूत असलेली घराणी किती होती ? विश्वंभर हा इथे अालेला अामचा पहिला पूर्वज. विश्वंभराच्या गोष्टी सांगताना सावजी सद्-गदित होई. पंढरपुरची वारी विश्वंभरापासून अामच्या घरात होती, हे संगताना त्याचे डोळे चकाकत. कार्तिकीपासून ज्येष्ठापर्यंत विश्वंभराच्या पंढरपुरास सोळा येरझारा होत. त्याचे हे सेवाऋण पाहून देव प्रसन्न होऊन त्याच्या स्वप्नात अाले अाणि त्याचे कष्ट वाचवण्यास अापण देहूस येऊन राहिलो अाहोत असे त्यांनी सांगितले.

असे दिसते की स्वप्ने पडणे व पुष्कळदा त्याप्रमाणे होणे हे अामच्या कुटुंबात विश्वंभरापासून अाहे. पुढे तुकालाही स्वप्नात दृष्टांत झाले. पण मी मात्र दुर्दैवी होतो. मला कधी स्वप्नात दृष्टांत झाले नाहीत.

सावजीने सांगितले, देव इथे येऊन राहिले हे स्वप्नात दिसल्यावर, एकदा अांब्याच्या बनात खणत असता विश्वंभराला विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. मग विश्वंभराने इंद्रायणीच्या काठाजवळ देऊळ बांधून त्या मूर्तीची स्थापना केली.

ज्या देवळात सर्व गाव दर्शनाला येते ते देऊळ अामच्या पूर्वजांच्या दृष्टांतातून निघाले हे ऐकून अाम्हांला अभिमान वाटे. सावजी अाम्हांला अापल्या विरक्तीचे मूळ घराण्यातच कसे अाहे हे सांगत असता अाम्ही अहंकाराची एक पुटी चढवून घेत होतो.

तुकाने तर अाम्हांला अामचे बालपण दिले. तो अाम्हा मुलांचे सर्वस्व होता. तुकाइतकी हौस कुणाला नसेल. लहान भावाला मोठ्या भावात जे जे हवे असते ते ते तुकात होते. दादा ! अंथरूणातून उठताच तोंड वगैरे धुऊन, भाकर खाऊन तू बाहेर धावायचास. तुझ्यामागे बाहेर पडण्यास भाझी धावपळ व्हायची. अाणि तू रस्त्यावर येताच, बाळकृष्णामागे गोपांची मुले येत तशी घराघरातून गावातली मुले बाहेर पडत. त्या त्या ऋतूचा खेळ तू पहिल्यांदा सुरू करायचास. विटीदांडू तुझा लाडके खेळ. पण सगळे खेळच तुझे लाडके होते. विटी कोलायला लागले की अगदी समोर जवळ तू उभा राहायचास. तुला भीती ठाऊक नव्हती. अाणि तू विटी मारू लागलास की तुझे टोले धडाडत डोक्यावरून जायचे.

गावच्या मुलींबरोबर वारुळाची पूजा करायला अापण मुले जायचो. त्या गाणी म्हणत जात असता अापण दगडादगडी खेळत मागे असायचो. मुलींची गाणी तुला सर्व पाठ होती. एवढेच काय, पहाटे दळताना बाया अोव्या म्हणत त्या तुला पाठ होत्या. सर्वांा त्याचे नवल वाटायचे. श्रावणात झाडांना बांधलेल्या हिदोळ्यांवर तू सर्वांत उंच झोके ध्यायचास व मुलींना घाबरून सोडायचास. मुली, बाया, बाप्ये, सर्वांशी तुझे चांगले जमायचे. एकदा उंच झोका गेल्यावर खाली येण्यापूर्वी क्षणभर थबकतो, त्या क्षणी खरी मजा येते, तू म्हणायचास. तू म्हणायचास, तेव्हा काय वाटे, सांगता येत नाही.

डोंगरावर तू एकदा बेभान अवस्थेत सापडलास तेव्हा तीच भावना तुला झाली होती का ?

|| ५ ||

रातकिड्यांची किर्तर्र एकदम कानांत घुसली. अापण कातळावर असल्याचे भान अाले. मी इकडेतिकडे पाहिले. काळोख चहूकडून घेऊन अाला होता. तो माझी दृष्टी तेवढी अडवीत होता. अापल्याला दिसत नाही तरी काळोखातही सृष्टी चालूच अाहे, माझ्या मनात अाले. फाल्गुनातील अाटलेली इंद्रायणी वाहतच अाहे. अापल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही. अापला अगदी सख्ख भाऊ असला तरी तो सृष्टीत नाहीसा होतो. सृष्टीला भाऊ नाही, बहीण नाही, वडील नाहीत. सृष्टीला कुणाचे काही नाही. मग सृष्टीला कोण अाहे ? विठ्ठल ? तुकाचा तो लाडका विठ्ठल ? इथे, कातळावर बसल्यावर वाटणारी बालपणाची भीती अाठवली. ती भीती कुठे गेली ? मी नवल करू लागलो. माझ्या लक्षात अाले, ती भीती अाहेच. तिची रूपे बदलली अाहेत. तुकाचे काय झालेय याची भीती. योगक्षेम कसा चालेल ही भीती.

योाक्षेमाचे विचार मनात येताच घर अाठवले. मी दचकून उभा राहिलो. घरी सर्व काळजी करीत असतील. वहिनीचा जीव अर्धा झाला असेल. लेकरांना भोवताली घेऊन दोन्ही बाया बसल्या असतील. जाऊन वहिनीला काय सांगू ?

मग विचार अाला, तुका घरी अालाही असेल. अाणि अाता तो माझी चिंता करीत असेल. तो मला शोधायला बाहेर पडेल. संसारी माणसाच्या चिंता अशा पलटी घेत असतात. एक दुसऱ्याची चिंता करतो. दुसरा पहिल्याची चिंता करतो. एकमेकाच्या चिंतेत राहणे त्याला अावडते. तो तेव्हाच खरा जगतो.

पण तुका अाला नसला तर ? गर्भार बायकोची पर्वा न करता त्याने जावे ! मला त्याचा संताप अाला. घराकडे निघण्यापूर्वी रागाच्या भरात मी जोराने दोन हाका मारून घेतल्या. “तुका ! दादा !”

घराशी पोहोचताच मला कळले, तुका अालेला नाही. उघड्या दारातून अातली दिव्याची लाल ज्योत दिसली. माझे पाय गळाले. घर सामसूम होते. अंगणात बैलगाडी सोडून ठेवलेली होती. तिच्या उतरत्या जोकडावर मी बसलो. समोर दरवाजा उघडा होता. पण अात जावेसे वाटत नव्हते. किती हौसेने अनेकदा अाम्ही हे अामचे घर सारवले होते, रंगवले होते ! तुळया-खांबांना तेलपाणी केले होते. त्या घरात माझी बायकोमुले होती. तुकाची बायदोमुले होती. तरी ते उदास वाटत होते.

डोक्यावर काळ्या ताऱ्यांनी भरलेल्या अाकाशाखाली अायुष्यातली मागची सारी वर्षे दाटून अाली. इतकी वर्षे रोज रोज हेच तारे डोक्यावरून गेले असतील, त्यांचे कधी भान केले नव्हते. असेना का वर अाकाश, तारे उगवेनात का, सूर्यचंद्र उगवोत, मावळोत–या पृथ्वीवर अाम्ही किती गमतीत होतो. अाम्ही–ही मोऱ्यांची मुले, ही महाजनांची मुले. अाम्हांला कधी काही कमी पडण्याचे कारण नव्हते, कधी दु:ख होण्याचे कारण नव्हते. ज्या बैलगाडीच्या जोकडावर मी अाता बसलो होतो ती गाडी रात्रभर जागून अाम्ही रंगवली होती. जत्रेला जाताना इतर गाड्यांबरोबर झडपा लावून अाम्ही अग्रेसर राहिलो होतो. रंगवलेली अामची गाडी रस्त्याने जाऊ लागली की लोक टकमका बघत होते. अाम्हा भावांचा प्रत्येकाचा एकेक बैल लाडका होता.

जोकडावरून उठून मी घरात अालो. खाली मान घालून एखाद्या अपराधी मणसासारखा मी झर्रकन तुकाच्या बायकोच्या अंगावरून पुढे गेलो. स्वयंपाकघरात चूल थंड होती. अामची दोन लहान मुले कोपऱ्यात गोधडी टाकून बायकोने झोपवली होती. पुढे होऊन मी चूल पेटवू लागलो. मागोमाग माझी बायको अात अाली. शेजारी बसून माझ्या हातातले फाटे घेत तिने हळूच विचारले,

“काय झाले ? सापडले का ?”

मी ‘सापडला नाही’ अशी मान हलवली. म्हणालो,

“नदीवर पाहिले. डोंगरावर जाऊन येईन उद्या.”

बायको चुलीत फाटे हलवीत खालच्या मानेने म्हणाली,

“भावोजी सापडणार नाहीत !”

मला तिचा भयंकर राग अाला. ती अशी झटकन जी जी भविष्यवाणी वर्तवी ती ती अातापर्यंत खरी ठरत अाली होती, म्हणून राग अाला. तिला तुकाबद्दल, माझ्या भावाबद्दल अात्मीयता नाही असे वाटून राग अाला. इतकी वर्षे या घरात येऊन झाल्यावर तिने माझ्याप्रमाणे भावाबद्दल हळवे होऊ नये म्हणून राग अाला. मागे अामचे अाईवडील गेल्यावर ती म्हणाली होती, “अाता बायको गेल्यावर सावजी-भावोजी यात्रेला निघून जातील.”

सावजीची बायको अाजारी होती व ती मरणार हे दिसत होते. सारे खरे होते. पण हे बोलून दाखविण्याची गरज नव्हती तिला. तिची ती वाणी खरी ठरली होती. एकदा ती म्हणाली,

“मागच्या जन्मीच्या कोणत्या पापामुळे या वेड्या घरात येऊन पडल्ये ! तुम्ही मात्र वेडे होऊ नका !” मग म्हणाली, “तुम्ही वेडे होणार नाही.”

अाणि एकदा वैतागल्यावर ती म्हणाली होती,

“सोडू या ना अापण हे गाव. माझ्या माहेरच्या गावी जाऊन राहू. तिथे कुणाचे तरी शेत लावायला घेऊ. सगळी नवीन सुरुवात करू. नको इथे. ही महाजनकी नको. या घराला विठ्ठलाचा शाप अाहे !”

विठ्ठलाचा अाणि शाप ! मी तेव्हा संतापाने अोरडलो होतो,

“गप्प बस रांडे !”

|| ६ ||

अाणि तिच्या मनात अालेली तीही भविष्यवाणी खरी ठरली. पुढे अाम्ही गाव सोडलेच. मी बायकोवर, अाशा बोलण्यवर चिडत असे ते भावनेच्या पोटी. ती बरोबर सांगते हे मनात अातून पटत असे. मला नव्हता तो अात्मविश्वस तिला होता. एखादी गोष्ट करायची ठरली की तिला संशय नसे. कर्तव्याला ती कधी चुकली नाही. घरातील माणूस तिने कधी अापण होऊन तोडले नाही. अामचे घर तिच्यामुळेच उभे होते. तुकाची बायको तुकाचे बघता बघता व त्याची चिंता करता करतानाच जेरीस यायची.

माझी बायको माझ्याचप्रमाणे श्यामवर्णाची व मला शोभेलशी उंच सडसडीत होती. मी फरच उंच होतो. पण तिचा उंचपणा रेखीव तर माझा खडबडीत होता. माझे हाड मोठे होते. माझी हाडे शरीरांतून बाहेर डोकावल्यासारखी वाटत. माझे शरीर मलाच अावडत नसे. घरातले प्रत्येक दार मला ठेंगणे होते. मला सारखे वाकावे लागे. प्रत्येकजण एकेद गोष्टीसाठी प्रसिद्ध असतो. मी माझ्या कुऱ्यहाडीच्या घावावद्दल प्रसिद्ध होतो. “कुठलाही अोंडका द्या, कान्हा एका घावात चिरफळून टाकतो !”, लोक म्हणत. बाकी मी धांदरट होतो. माझी उगीचच धावपळ चालायची.

अामच्या घरात रूपाला सुंदर, ठेंगणी, ठुसकी अशी तुकाची ही दुसरी बायको होती. तुकाची पहिली बायको पांढरी गोरी होती. ती प्रौढवयापर्यत जगली असती अाणि जर अामची परिस्थिती चांगली राहिली असती तर शांत, सौम्य घरंदाजासारखी शोभली अासती. ती समजूतदार होती. बालवयातही तिला अाब होता. उलट, तुकाची दुसरी बायको तुकाप्रमाणेच, पण उलट अर्थाने, जीवनाची खरी भोक्ती होती. जर वैभव राहिले असते तर ते तिने थाटामाटाने भोगले असते. पण दैवाने ते काढून घेतले होते.

मला वाटते, सावजी व तुका सोडले तर अामचे कुटुंब इतर चार कुटुंबांसारखेच होते.

|| ७ ||

बायकोने भात-विठले झाल्यावर मुलांना उठून जेवू घातले.  अाम्ही जेवढे जातील तेवढे चार घास तोंडात टाकले.  तुकाच्या बायकोला थोडेसे दूध घ्यायला लावले.  अाणि एक घोंगडी देवघरासमोर अंथरून मी अाडवा झालो.  ही जागा सावजीची होती अाणि नंतर तुका इथेच बसून अभंग रचीत अाला होता.  त्या जागेवर मी अस्वस्थ मनानेच पडलो.  दिवसभराच्या धावपळीमुळे, थकव्याने डोळे मिटत होते अाणि मधेच मी जागा होत होतो.  तुळईखाली झोपाचे, तशी माझी झोप दचकून तुटत होती.  ज्या जागेवर मी झोपलो होतो तिच्यावर विठ्ठलभक्तीची तुळई होती !

केव्हातरी अपरात्री मी जागा झालो ते तुकाचे स्वप्न पडून.  इथेच देवासमोर उभा राहून तुका जरीचा फेटा बांधीत होता.  अाणि सर्वजण कौतुकाने पाहत होते.  फेट्याचे दोन वळसे द्यावे न द्यावे तर टोक निसटून फेटा खाली अोघळत होता.  तुकाची फजिती पाहून सर्व हसत होते.  तुका लाजत होता.  पण पुन्हा पुन्हा पडलेले टोक उचलून बांधीत होता.

मला अाठवले, तेव्हा बालवयातही तुकाचा चेहरा गोल होता.  डोळे वाटोळे मोठाले होते.  भुवया जाड होत्या.  त्याच्या डोळयांत स्वप्ने होती.  अनेक स्वप्ने होती.  त्यात सावजीसारखे टक लावून बसलेले एकच स्वप्न नव्हते.  तो अाईसारखा काहीसा गोरा होता.  त्या वयात अंगावर मांस नसूनही चेहरा मांसल वाटे.  त्याची कातडी सावजीसारखी रूक्ष-कोरडी नव्हती.  त्याच्या अंगावर मार्दव होते.  काहीसे मुलींसारखे मार्दव होते.  त्याचा चेहरा गुबगुबीत वाटे.

मला स्वप्न पडले होते ते तुका पेढीवर जाऊ लागला त्या पहिल्या दिवसाचे.  अाणि स्वप्न संपल्यावर तो पहिला दिवस माझ्या डोळ्यापुढे अाला.  पहाटे लौकर उठून, स्नान करून, गंध लावून, लांब अंगरखा घालून, फेटा बांधून, तुकाने देवांना नमस्कार केला, वडीलमाणसांना केला.  मग तो वडिलांबरोबर दुकानाकडे गेला.

तुका पेढीवर जाऊन व्यवसायउदीम पाहू लागला अाणि अामचे एकत्र खेळणे, रानात भटकणे, नदीत डुंबणे यांत खंड पडला.  दादाने लहानपण सोडले तेव्हा मलाही खेळ पोरकट वाटू लागले.  दादाबरोबर मी दुकानात जाऊ लागलो.  वडील त्याला मोडी शिकवू लागले तेव्हा मीही धुळीत बोटाने मोडी अक्षरे काढू लागलो.  माल देता-घेताना त्याला मापे मोजायला मदत करू लागलो.  कीर्द-खतावण्या, सावकारी हिशेब यांत मला रस नव्हता.  मला त्या वयात तसले व्यवहार कळलेही नसते.  पण तुका मात्र दुकानाच्या सर्व तऱ्हेच्या व्यवहारांत हिरिरीने पडला अाणि दुकानात उगीचच त्याच्या अासपास बसण्याचा मला कंटाळा येऊ लागला.  माझे खेळाचे वय मला दुकानाबाहेरून सारखे खुणावू लागले.  मी दुकानात जाणे सोडले व परत इतर मुलांत खेळू लागलो.

तुका असा मोठ्या माणसांच्या जगात शिरल्यावर काही काळ त्याची नि माझी फारकत झाली.  तुकाचे वागणे-बोलणे अाता बदलत चालले होते.  दुकानातील व्यवहाराशिवाय तो दुसरे बोलत नाहीसा झाला.  घरातलेही त्यांच्याकडे “मोठा झाला” असे मानून वागू लागले.

तुका दुकानातून अाला की अाई तत्परतेने त्याचे ताट वाढायाला पुढे होऊ लागली.  त्याच्या दोन्ही बायका लगबगीने पुढे येऊन तिच्या हाताशी लागू लागल्या.  एकदा ऋणकोच्या दारी धरणे धरायला गेल्यामुळे तुकाला जेवायला येण्यास खूप उशीर झाला, तेव्हा अाई वडिलांसाठी थांबे तशी त्याच्यासाठीही जेवणाची थांबली.  वडील येऊन जेवण करून दुकानात गेले.  तुकाच्या बायका जेवीनात तेव्हा अाईने त्यांना जेवायला बसवले.  मी लहान होतो अाणि मला वाटले, माझी बायकोही उशीच माझ्यासाठी जेवणाचे थांबण्याचा हट्ट घेईल.  मला अगदी हौस वाटली.  बायका जेवणाचे थांबत होत्या हे अाईने त्याला सांगितले तेव्हा तुकाही त्या दिवशी सुखावला.  त्याच्या दोन्ही बायका दाराअाड बसल्या होत्या तिकडे तो सारख कौतुकाने पाहत होता.

घरातला मोठा मुलगा म्हणून खरे सावजीने दुकान संभाळायचे.  पण सावजीने दुकानात बसायला नकार दिला होता.  वडील एकदोन दिवास रागात होते.  अाई त्यांना समजावीत होती.  त्यांचा राग, अाईचे समजावणे किंवा सावजीने धंद्यात पडायचा नकार का दिला, हे त्या वयात मला कळले नाही.  जसे लहानपणाच्या हट्टाचे कारण बघायचे नसते तसे सावजीच्या हट्टाबद्दल कधी विचारही मनात अाला नाही.  त्याने नाही म्हटले बस !  तो मोकळा राहिला.  तो अापले भजनपूजन करीत राहिला.

|| ८ ||

तो सर्व काळ त्याची बायको कुठे होती ?  अाता इतक्या वार्षंनी सावजीची बायको एकदम अाठवून मी नवल करू लागलो.  तिची अाठवण इतकी पुसट झाली होती !  ती कधी होती का या अामच्या घरात ?  खरे पाहिले तर ती सर्वांत लक्षात राहायला हवी होती.  अामच्या घरात विठ्ठलाचा ती पहिली बळी होती.  ती अामची थोरली भावजय होती व तिने अामचे पुष्कळ केले होते.  अाता पडल्या-पडल्या एका कोपरावर उंच होऊन मी स्वयंपाकघराच्या दाराकडील अंधारात डोकावून पाहिले.  जणू मला ती तिथे वावरताना दिसणारच होती.  तेव्हा ती सारखी कामात असे अाणि झटकन इकडून तिकडे जाताना दिसे.  ती एखादा शब्दा बोले न बोले.  मोठी सून म्हणून तिच्यावर सासूचे जास्त दडपण असेल.  अाईच्या हाताखाली ती सारखी लवलेली असे मात्र खरे.  अाईबरोबरच ती जेवायला बसे अाणि तिचे जेवण विलक्षण सावकाश होते.  जशी मी तिला पाहत होतो तशीच ती उंच, किडकिडीत, एकसारखी होती.  तिच्या मंद जेवणाबद्दल अाई नेहमी बोले. रात्री जेवण झाल्यावर अापली ठरलेली घोंगडी अाणि चौघडी घेऊन ती अातल्या खोलीच्या कोपऱ्यात अंथरूण घाली अाणि भिंतीकडे तोंड करून, हाताचे उसे करून झोपी जाई.

सावजीला तिच्याशी कधी बोलतानाही मी पाहिले नाही.  तो तिला अापले एकही काम करू देत नसे.  तो स्वत:चे पान स्वत: घेऊन बसे.  स्वत:चे कपडे स्वत: धुऊन काढी.  पण या वागण्यात बायकोबद्दल तिटकारा किंवा राग त्याच्या मनात नव्हता.  थंडपणा होता.  त्याने जो विरक्तीचा मार्ग पत्करला होता त्यात बायको बसत नव्हती.  ही विरक्ती येण्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.  तेव्हा दोष दैवाचा होता.

त्यांना मूल नव्हते.  सावजीने तिच्याशी कधी नवऱ्याचे नाते ठेवले होते का याबद्दल मला संशय अाहे.  पण त्याच्या मनात तिच्याबद्दल तो दाखवीत नसला तरी अधू भावना होती.  ती मेल्यावरच त्याने यात्रेसाठी कायमचे घर सोडले.  सावजी जरी किती चांगला वागत असला तरी ती कुढत चालली होती.  तिचे शरीर तरूण वयात सुकत चालले होते.  नवरा असा देवाधर्माकडे लागलेला.  या वयातली त्याची विरक्ती पाहून जनांत सावजीचे कौतुक होत होत, पण स्वत:च्या दु:खाचे तिला बोलता येत नव्हाते.  तिचे सावकाश जेवण  म्हणजे अन्न कमी कमी खाण्याचे तिने योजले असावे.  नवऱ्याने संसार टाकला म्हणून ती कष्टी होती, तर सावजी ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही म्हणून कष्टी होता.  माझ्या बायकोला तिची फार कीव येई.

सावजीचे चित्त किती अस्वस्थ असते हे एका संध्याकाळी मला कळले.  अाम्ही नदीवर बसलो होतो.  सावजी डोळे मिटून ध्यान लावून बसला होता.  सुर्य अाताच मावळला होता.  इतकयात पक्ष्यांचा एक थवा पात्रावरून उडत फेरी घेत अाला.  तो थवा खाली उतरला अाणि सावजीच्या अंगावर येऊन फुटला.  तेव्हा सावजी इतका विलक्षण दचकला !  थव स्वत:ला सावरीत दाही दिशांना होऊन परत पात्रावर एकत्र होऊन उडू लागला.  पण ध्यानभंग झालेला सावजी कितीतरी वेळ अस्वस्थ होता.  अापण ध्यानमार्गात पुरेसे तयार नाहीत हे ध्यानात येऊन तो अास्वस्थ असावा.

तुका विलक्षण होताच, पण सावजी काही कमी विलक्षण नव्हता.  तुकाची शेवटची वर्षे गढू होती.  सावजीचा अारंभच गूढ होती.  दुसरी कसली जाण येण्यापूर्वी त्याला वैराग्याची जाण कशी अाली असेल ? एखदे इंद्रिय नसावे तसे त्याला ऐहिकतेचे इंद्रिय जन्मत:च नव्हते का ?  किती विचित्र !  अाम्हांला तो जसा कधी कळला नाही तसा त्याच्या बायकोलाही तो कधी कळला नसावा.  अशा पुरुषाशी जन्माची गाठ पडावी हे अापले दुर्दैव मानून दिवस काढण्यापलीकडे तिच्या हाती काय होता ?

पडल्यापडल्या मला वाटले, कोणत्याही क्षणी अंधाऱ्या दारातून सावजीची बायको पुढे येऊन तुका न सापडल्याने कष्टी झालेल्या अामच्याकडे पाहून, स्वत:चे अायुष्य अाठवून करूण हसेल.

|| ९ ||

या पहाटेची अाणि उगवणाऱ्या सूर्यनारायणाची शपथ घेऊन सांग, तुका !  तू सावजीसारखा होतास का ?  तेराव्या वर्षी ऐटदार फेटा बांधून पेढीवर जाऊन तू उदीम करू लागलास, तो हौसेनेच की नाही ?  सावजीने दुकान संभाळणार नाही असे म्हणताच तू सरसावून पुढे अालास अाणि एका वर्षात तुकाशेट म्हणून लोक तुला अोळखून लागले.  सावजीचे वैराग्य हा तेव्हा तुला काहीसा वेडपणाच वाटला होता.  दोन वर्षेत सावकारीचे व महाजनकीचे व्यवहार तू सांभाळू लागलास.  तुला होनाची किंमत होनच होती.  होन मोजताना तुला अानंद होत होता.  हिशेबाच्या कीर्दखतावण्या तू व्यवस्थित ठेवायला शिकलास.  कुणाला कर्ज द्यायचे, कुणाला नाही हे तुला चांगले जाणता येऊ लागले.  कर्ज वसूल कसे करावे वगैरे सावकारी डावपेचांत तू तयार झालास.

तुझे नाव पुण्यापर्यंत गेले.  तुझी पहिली बायको दमेकरी होती.  तिला मूल होणार नाही असे वाटून बाबांनी तुझे दुसरे लग्न करून दिले.  ही तुझी दुसरी बायको श्रीमंताची होती.  विशेष म्हणजे शरीराने सुट्टढ होती.  ती तुला एवढी अावडली नाही, मनोमन तुमचे पटले नाही तरी तिच्यापासून मिळणाऱ्या शरीरसुखाचा मोह तुला कधी अावरला नाही.  कबूल ?

सावजीने भोग नाकरले.  तू सारे भोगलेस.  तीनचार वर्षेत धंदाउदीम वाढला.  तू त्यात पूर्ण रमलास.  होन, रूपये यांच्या खेळात, तू लहानपणाच्या खेळात रमायचास तसा रमलास.  तुरा उगवलेल्या कोंबड्यासारखी, व्यवहार कळला अाहे याची जाण तुझ्या प्रत्येक शब्दात, वागण्यात दिसू लागली.  माणसातली जगण्याची धडपड तुला तीट कळली.  खरेदी-विक्रीतले, व्याजबट्ट्यातले तंत्र तू अात्मसात केलेस.  जग कळल्याच्या अात्मविश्वासाने तू वागू लागलास.

बाबांना, अाईला तुझे किती कौतुक वाटू लागले म्हणून सांगू !

अहंकाराचा अाणखी एक पापुद्रा तू अंगावर चढून घेतलास दादा !  त्या अहंकारातला एकहजारांश जरी अाज राखतास तर !  तू कुठे गेला असशील तेथून परत ये !  परत येऊन इथे अामच्यांत राहण्यापुरता अहंकार मनात ठेव.  बाकी तू काही कर.  कीर्तन कर, भजन कर, रात्रंदिवस कवित्व कर, नदीकाठी जाऊन बेभान नाच.  तुझा वैकुंठाचा टकळा चालू दे.  अाम्ही काही म्हणणार नाही.

|| १० ||

पहाटे उठून मी तुकाला शोधायला बाहेर पडणार होतो.  पण रात्रभर मी असा डोके भरकटत जागा राहिलो अाणि पहाटे मला डोळा लागला.  उठलो तेव्हा उन्हे पडली होती.  काळझोप लागावी तसा मी झोपलो होतो.  मला माझी लाज वाटली.  झटकन उठून, तोंड धुऊन, भाकरी खाऊन व बरोबर घेऊन बाहेर पडलो.  तसाच देवळाकडे गेलो.  बाहेरून विठ्ठल-रखुमाईला नमस्कार केला.

हातातील खुळखुळ्याची काठी अापटीत मी परत नदीकडे निघालो.  पाचपन्नास पावले गेलो नाही तोच गावातला वेडा, म्हातारा जन्या समोर उभा !  मला पाहताच तो हसला अाणि अोरडला, “हरवला–हरवला–तुक्या पुन्हा हरवला!”

अोरडत तो नाचू लागला.  त्याच्या नाचण्याहसण्याचा मला भयंकर राग अाला.  हा जन्या जेव्हा वेडा झाला अाणि मुले त्याच्या मागे दगडे मारीत येऊ लागली तेव्हा, दादा !  तूच मुलांना पिटाळून लावून अनेकदा त्याला वाचवलेस.  अाणि अाता तोच जन्या तू हरवलास म्हणून नाचतोय !  दादा !  तू हरवलास हे ऐकून काहींना अानंद होईल–मला ठाऊक अाहे.  पण या वेड्यालाही अानंद व्हावा !

मी रागाने जन्याच्या अंगावर गोलो.  माझी खात्री झाली, त्याने तुकाला कुठेतरी पाह्यलाय.  अाणि तो माझी गंमत करतोय.  त्याला जोराने हलवीत मी विचारले,

“कुठे पाहिले दादाला ?  बोल.”

हसणे थांबवून त्याने माझ्याकडे पाहिले.  मग धोरत वर खोचण्याची नक्कल तो करू लागला.  प्रवाहातून जावे तशी त्याने दोन पावले टाकली.  माझ्या ध्यानात अाले, तो मला नदी अोलांडून जायला सांगतोय.  मी विचारले,

“कुठे ?  नदीपलीकडे ?”

न बोलता तो धोतर वर खोचण्याची नक्कल करीत राहिला.  त्याला सोडून मी पुढे निघालो.  माझ्या पाठीला त्याचे खळखळून हसणे ऐकू अाले.  मला एकदा वाटले, त्याने माझी गंमत चालविली अाहे ; एकदा वाटले, तो खरे पाहिलेले सांगतोय.  मी मागे वळून पाहिले.  चिपळ्या धरल्यासारखे हात वर करून तुकाच्या नाचण्याची नक्कल करीत तो कर्कश भेसूर सुरात म्हणू लागला,

“ अाम्ही जातों अामुच्या गावा

अामुचा रामराम ध्यावा || ”

मला तो भसूर सूर ऐकवेना.  कानांवर हात ठेवून मी धावत सुटलो.  गेला महिनाभर असलेच अभंग म्हणत बेभान होऊन तुका बाहेर पडत होता.

नदीवर येऊन श्वास अावरीत उभा राहिलो.  पण वेड्याचे मनातून जाईना.  या वेड्याचे नि अापले नाते असल्यासाखे तुका बोलत असे ते मला अाठवले.  कित्येकदा तो वेड्या जन्याकडे टक लावून बसे.  घरात उरलेसुरले, कधी अापल्या पानातले, या वेड्याला येऊन खाऊ घाली.  अगदी शेजारी बसून अाळवून भरवी.  एकदा मला तुका म्हणाला,

“कान्हा !  जन्या वेडा असला तर सगळ्यांनी वेड व्हावे.  वस्त्रप्रावरणांसाठी अाम्ही तगमगतो तर शरीराला लंगोटीसुद्धा पुरते हे त्याने दाखवून दिलेय.  बायको, मुले, मित्रपरिवार यांच्या मायेशिवाय अाम्हांला जगता येत नाही, तर तस्यला मायेशिवाय जगता येते हे त्याने अाम्हांला शिकवलेय.  राहायला प्रासादाची गरज नाही, वर निळे अाकाशही पुरते–त्याने सिद्ध केलेय.  पोटाला भाकरी-कालवणच लागते अाणि दिवसातून तीन वेळा लागते–त्याने तेसुद्धा खोटे ठरवलेय.  कान्हा !  त्याने मला शिकवले की, जे जे अापण मूल्यवान मानतो ती ती  माया अाहे.  अरे !  त्याला देवसुद्धा लागत नाही जगायला.”

तुकाचे बोलणे मला तेव्हा भयंकर वाटले.  मी म्हटले,

“दादा, हे तू काय बोलतो अाहेस ?”

तुका म्हणाला,

“काय सांगावे !  अापण जगतो ते खोटे असेल.  त्याचेच खरे असेल.  तो अापल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना ?”

|| ११ ||

धोतर नीट वर खोवीत मी इंद्रायणीत शिरलो.  इंद्रायणीत नदी अोलांडून काठ चढून वर गेलो.  तुका नेहमीप्रमाणे कुठेतरी डोंगराकडे सापडणार ही खात्री होती.  जरा वेळाने माझी पायवाट बैलगाडीच्या चाकोरीला मिळाली.  फाल्गुन महिना होता.  चाकोरीत धूळ जमू लागली होती.  त्या धुळीत कुठे तुकाची पावले उमटलेली दिसतात का पाहू लागलो.  हवेतला गारठा गला होता.  वाळलेली पाने झाडांवरून उडू लागली होती.  करवंदी हिरव्य होऊ लागल्या होत्या अाणि पळसात तांबडी कोवळी पाने दिसू लागली होती.  मंद वारा सुटला होता.  मी चिंतेत नसतो तर तो सुखद वाटला असता.  गावाकडून एक कोकिळा अोरडू लागली.

मला वाटले, ती “तुका–तुका–” असेच अोरडत अाहे.  मी मनात म्हणालो, दादा !  बघ सृष्टी कशी अानंदात अाहे.  तूच या सृष्टीचे वैभव पाहून अनेकदा वेडा झाला अाहेस.  या सृष्टीशी तू अनेकदा एकांत केलास.  ही तू सोडून गेलास हे पटत नाही.  तू नक्की इथेच कुठेतरी कपारीत सृष्टीचे रूप पाहत बसला असशील.

दादा ! असे म्हणू नकोस, “मला या सृष्टीचे काय अाहे ?”  तू अामच्या कुणापेक्षाही एकदा जगात रमला होतास.  दुसऱ्यला लग्नाच्या वेळी तू हौसेने मिरवलास.  व्यापारला गेलास.  अामच्यासाठी बासने घेऊन अालास.  जीवनावर तुझी नक्की अासक्ती होती.  अाणि अापल्या कुलदैवताचे तू करीत होतास, तेही या अासक्तीचाच भाग होता.  चारचौघांसारखीच तुझी देवावरची श्रद्धा व्यवहारमिश्रित होती.

दादा !  तू केव्हा बदललास ?  अापले सगळे घरच बदलले.  एखाद्या झाडाची फुले गळावी, मग पाने गळावी, मग फांद्या शुष्क व्हाव्यात, तसे या अापल्या घराचे झाले.  कधीकधी मला हताश वाटते रे !

|| १२ ||

चलता चलता मी थबकलो.  विचारांच्या अोझ्याने माझी पावले मंद केली.  मी एका वृक्षाखाली मुळंवर बसलो.

केव्हापासून अामचे घर बदलले ?  मी मागच्या गोष्टी अाठवू लागलो.  अानंदात असलेल्या घराला एकदम दृष्ट लागली तो दिवस अाठवू लागलो.  वडील गेले, अाई गेली, मग सावजीची बायको गेली.

सावजीची बायको मेली अाणि घराला अवकळा सुरू झाली.  सावजीची बायको मेली–दु:खातून सुटली.  कुणाला त्या घटनेचा धक्काही बसला नाही.  मूळबाळ न झालेली बाई.  नवऱ्याचे लक्ष नसलेली.  तिला किंमत नव्हती.  नवरा संबंध ठेवत नव्हता म्हणून तिला मूल झाले नव्हते.  पण ते कुणी ध्यानात घेतले नाही.  विवाह होऊनही ती कुवारी राहिली.  अाणि ती होती तोपर्यंत तिच्या दु:खाच्या पुण्याईने घरचे वैभव चढत गेले.  ती गेल्यावर तिच्या तळतळाटाने घर बसले.

ती मेली अाणि सावजी यात्रेला गेला अाणि दुष्काळ पडला.  माझ्या मनात अाले, हे सारे कल्पनेच खेळ असतील अापल्या.  इतक्या वर्षांनंतर अधलेमधले बरेवाईट दोन्ही कितीतरी विसरले गेलेय.  पुसट रेघा पुसून जातात.  खोल रेघा राहतात.  तेव्हा अशा कल्पना करणे खोट.  कुणी गेल्यामुळे किंवा राहिल्यामुळे अवकळा अाली नाही.  सावजी विरक्ती घेऊनच जन्माला अाला होता.

पण एखाद्या कुटुंबात कुणी विरक्त निघत नाही का ?  अाणि अाईबाप केव्हा ना केव्हा जातातच प्रत्येकाचे.  अाणि दुष्काळ पडला तो एकट्या मोरे घराण्यावरच पडला का ?  सबंध देहूवर, सबंध प्रांतावर पडला.  सर्व घरी कुणी ना कुणी अपाशी मेले अाणि कुणाचे दिवाळे निघाले नाही का कधी ?  अनेकांचे निघते.  मग अामच्याच घरात हा सावजी, हा तुका असे का निर्माण व्हावे ?

एव्हाना सबंघ डोंगर पालथा घालायला हवा होता, तुकाला शोधायला.  पण पाय गळाले होते.  मी जरा उंचावर बसलो होतो.  तेथून देहू गाव झाडीतून डोकावताना दिसत होते.  अधूमधून नदीचे पात्र चकाकत होते.  गावाबाहेर निघालेली एक चाकोरी अाणि दोनतीन पायवाटा दिसत होत्या.  वेशीजवळचा अांबा दिसत होता.

सावजीने घर सोडला तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी अामचे सगळे कुटुंब या अांब्यापर्यंत अाले होते.  घर सोडायचे सावजीचे कित्येक दिसत चालले होते.  अाईवडील गेले.  मग त्याची बायको मेल्यावर तो म्हणाला,

“अापल्या अाईवडिलांना दु:ख होईल म्हणून मी ते असेपर्यंत घर सोडले नव्हते.  ते गेल्यावर माझ्या बायकोला दु:ख होईल म्हणून मी थांबलो.  अाता बायको मेल्यावर विठ्ठलाने त्याही जबाबदारीतून मुक्त केले अाहे.  माझा निघन्याचा दिवस अाला.”

तो प्रयाणाची तयारी करू लागला.  तयारी ती काय ?  एक घोंगडी, धोतर-कुडते, लोटा, गंध, भस्म, टाळ.  निघण्याच्या दिवसाच्या अादल्या रात्री तो जेवला नाही.  “उद्या निघणार” एवढेच म्हणाला.  मग बऱ्याच रात्रीपर्यंत तो देवघरासमोर बसून होता.  मनातून तो अस्वस्थ होता.  त्याला विरक्ती तर बाहेर काढीत होती, पण माया सुटत नव्हती.  किती झाले तरी अाम्ही त्याचे भाऊ होतो.  रात्री दोनतीन वेळा तो उठला.  बाहेर जाऊन अाला.  घराभोवती त्याने दोनचार फेऱ्या घातल्या.  एकदोनदा अाम्ही झोपलो होतो तिथे कोपऱ्यात उभे राहून त्याने अाम्हा सर्वंकडे पाहिले.  नजरेने त्याने सर्वांना कुरवाळून घेतले.

मी डोळे किलकिले करून पाहत होतो.  अाम्ही माजघरातच झोपलो होतो.  त्याने काही वेळ तुकाकडे टक लावली.  मग माझ्याकडे.  मग स्वयंपाकघराच्या दारात डोकावून अाला.  देवघरासमोर उभे राहून त्याने वारंवार देवांना नमस्कार केला.  नंतर अोटीवर गेला.  मी हळूच उठून अोटीकडे अालो.  सावजी अोटीवर एका खांबाला टेकून बसला होता.  त्या अंधारात त्याचे तोंड नीट दिसत नव्हेते.  डोळे पाणावलेही असतील त्याचे.  तो बसला होता, त्याच्या डोक्यावरच्या खुंटीला त्याने अापले बोचके टांगले होते.  कोपऱ्यात त्याची तेहमीची काठी होती.  त्या वेळी मी बावरून तसाच मागे वळून येऊन परत झोपलो नसतो, पुढे होऊन त्याच्या पायाशी बसलो असतो, त्याला जाऊ नको म्हटले असते, रडलो असतो, तर कदाचित त्या क्षणी सावजी विरघळला असता–गेलाही नसता.

पण मी बावरून अोटीच्या तोंडापासून परत फिरलो.  नेहमीच्या हट्टाप्रमानेच तो हाही हट्ट पुरा करणार असे वाटले.  वडिलांनी अनेकदा विनंत्या करूनही त्याने घरचा धंदाउदीम हातात घेतला नव्हता हे मी ऐकले होते.  अाणि त्याच्या बायकोने त्याला विरक्तीपासून वळविण्याचे प्रयत्न केले नसतील का ?  पण तरीसुद्धा मला वाटते, एखादा असा क्षण येतो की मन अधू होते.  एक बोटाने तुटते.  तो क्षण तो होता.

तो बोट मी पुढे केले नाही.

सकाळी सावजीने गाठोडे डोक्यावर घेतले.  दारातून पुन्हा एकदा देवांना नमस्कार करून तो बाहेर पडला.  अाम्ही घरचे सर्व त्याच्या मागे होतो.  वेशीच्या अांब्याकडे येणाऱ्या रस्त्यावर अाम्ही सावजीमागे चालत असलेले मला दिसू लागलो.  पुढे सावजी गाठोडे घेऊन, त्यामागे तुका अाणि मी, त्यामागे अामची मुले अाणि बायामाणसे.  अांब्याशी येईपर्यंत सावजीने एकदाही मागे वळून पाहिले नाही.  तुका माझ्याशेजारून मान खाली घलून चलत होता.  मी भिरभिर सर्वांकडे पाहत होतो.

सावजी संथपणे भजन करू लागला.  त्या संथ सुराने बांध फुटले.  अजून तो सावजीचा अभंग कुणी म्हटलेला ऐकला की माझा गळा दाटून येतो.  कापरे भरते.  सावजी भजन करू लागला अाणि प्रथम बाया रडू लागल्या.  तुकाच्या डोळ्यांतून अश्रू अोघळू लागले.  मी रडू लगलो.  गोंधळून मुलांनी रडण्यास सुरूवात केली.

अामचे ते सावजीला पोहोचवायला जाणे जिवंत माणसाला शेवटचे पोहोचवायला जावे तसे होते.  अाम्ही घरी राहणार होतो व तो यात्र करीत कुठेतरी दूर, दृष्टिअाड हिंडत राहणार होता.  तो असा कुठेतरी देहाने अाहे याचे दुःख तो गेल्याच्या दुःखापेक्षाही जास्त होते.  अामची–घरची–सर्वच माया त्याने सोडली होती.  अाम्हांला मात्र त्याची माया सुटत नव्हती.

वेशीच्या अांब्याशी असल्यावर सावजीने डोक्यावरचे बोचके खाली ठेवले.  वळून तो म्हणाला,

‘माधारी वळा.  मला निरोप द्या.’

तो थांबताच अाम्ही सारे होतो तिथेच थांबलो.  मग तुका पुढे झाला.  त्याने सावजीच्या पायावर लोळण घेतली.  मीही अावेगाने पुढे होऊन जमिनीवर पडलो.  मुले पुढे अाली, पाया पडली.  बायांनी जमिनीला डोकी टेकून नमस्कार केले.  सारी रडू लागली.  गावकरी चार अाले होते तेही सावजीच्या पायाला लागले.

सावजीने तुकाला मिठी मारली.  पण त्याचे डोळे कोरडे होते.  तो म्हणाला,

“तुका !  व्यवसाय नीट संभाळ.  देवांचे नीट कर.  देवळातील देवाची पूजाअर्चा नीट होते ना पाहा.  सार्वांचा नीट संभाळ कर.  लहान वयात तुझ्यावर हा भार पडलाय.  ते ठीक नाही, मला कळतेय.  पण मी विरक्त झालोय.  मला व्यवहार उरला नाही.  केवळ तुम्हांला बरे वाटावे म्हणून मी हा उपदेश करतोय.  मला हा संसार खोटा वाटतो.  सगळी माया वाटते.  मला काही अोढीत नाही.  इतके दिवस अापल्या अाईवडिलांना वाईट वाटेल अाणि बायकोची जबाबदारी होती म्हणून मी संसारात राहिलो.  अाता वाटतेय, उगीचच राहिलो.  ते वाटणे माया होती.  पण उशिरा कळतेय.  पांडव महाप्रस्थानाला निघाले तसा मी निघालो अाहे.  अाता हिंडत राहायचे.  ही भूमी काय, दुसरी भूमी काय ?

“मला खरोखर पूर्ण वैराग्य अालेय.  माझ्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका.  तुम्हांला माझ्या वैराग्याबद्दल दुःख होतेय तसे मलाही तुम्ही मायेत गुंतला अाहात याचे दुःख होतेय, हे ध्यानात अाणा.  इथे माझा उपयोग नाही.  अाणि उपयोगाचे अाणि निरूपयोगाचे असे काही उरलेलेही नाही.  मला सर्व शून्य दिसतेय.  ही इंद्रायणी, हे गाव अाणि मी जिथे जाईन ते ते सर्व शून्य अाहे.  मी शून्यातून चालत जाणार.  चालणेही खरे नाही.  देहत्याग करावा तर ते पटत नाही.  मी मेलो असतो तर तुम्हांला काही दिवस दुःख झाले असते, मग विरले असते.  मी मेलो असे समजा.  जगणे जगायचे अाहे म्हणून मी जगत अाहे.  जगने जगत, मला माझा शेवट पाहायचा अाहे.  नमस्कार !”

हात वर करून त्याने सार्वांना नमस्कार केला.  मग गाठोडे उचलून तो चालू लागला.  त्याने एकदाही मान वळवली नाही.  काही अंतर जाऊन त्याने इंद्रायणी अोलांडली अाणि दरडीवर चढून पलीकडच्या उताराखाली नाहीसा झाला.  अाम्ही कितीतरी वेळ तो गेला त्या दिशेकडे पाहत उभे होतो.

त्यानंतर मला अाठवते की, सावजीबद्दल तुका कधी बोलला नाही.  मला त्याचे अाजही नवल वाटते.  की असे निघून जाणाऱ्याबद्दल बोलायच नसते ?  की निघून जावे असे वाटण्याची तुकाने धास्ती होती अाणि त्याच्या मनात सावजीचे जाणे अायुष्यभर सतत रेंगाळत होते ?

अाता सावजीच्या प्रयाणाचा प्रसंग डोळ्यापुढे धावत असता माझ्या मनात अाले, माणूस कुणाकुणाला, कशाकशाला तरी बांधलेला असतो.  सावजीने अाईवडील, बायको यांच्यापुरते बंधन पाळले व नंतर चालत राहण्याचे बंधन घालून घेतले.  दादा !  तू असे कसलेच बंधन पाळणार नाहीस का ?  तुझी बायको गर्भार अाहे त्यासाठी तरी ये.

हताशपणे “तुका !  दादा !”  हाका मारीत मी झाडाखालून उठून डोंगराच्या चढणीला लागलो.

|| १३ ||

डोंगर चढताना मी रुळलेली पायवाट सोडून मुद्दाम अाडवाटा जवळ केल्या.  डाव्याउजव्या हाताची खड्डे-कबदाडे-झुडपे पाहत वर जात राहिलो.  माझ्य पायात काही नव्हते अाणि करंवदीच्या जाळीतून जाताना, त्यात फांद्या बाजूला करून शोधताना, तोंडावर काट्यांनी अोरखाडे काढले, पायातही काटे गेले, पण भान नव्हते.  मला वाटत होते की, अशाच एखाद्या जाळीत, खबदाडात तुका सापडणार.  तो कोणत्या अवस्थेत सापडेल याची मात्र मला भीती वाटत होती.  डोंगर चढून गेल्यावर वर तुका सापडणार नाही अशी माझी खात्री होती.  जिथे तुका बसे तो कातळ रिकामा दिसेल.  तिथे बसून तुकाने ग्रंथवाचन केले.

डोंगरमाथ्यावर येऊन मी तुका बसे त्या जाग्यावर येऊन बसलो.  अाणि माझ्या मनात अाले, मी तुकाच्या जागी असलो तर काय करीन ? कुठे जाऊन बसेन ?

मला कळत होते, तुकाच्या अायुष्यात दोन क्षण जाऊन बसणे अशक्यप्रय होते.  जेव्हा तो संसाराच्या हौसेत तेव्हा क्षण न दवडता हौस करीत होता.  जेव्हा तो विरक्त झाला होता तेव्हा क्षण न दवडता विठ्ठलाचे विचार करू लागला.  त्याच्या मनाचे पाखरू ज्या फांदीवर बसले तिथे रमत गेले.  ते विलक्षण, अनावर हट्टी होते.

असे हे त्याचे मन मी कसे पकडणार होतो ?  तो नाहीसा झाला तेव्हा त्याच्या विचारांची परिणती कुठपर्यंत, कशी झाली असेल ?  काही सुचेना.

विचार झेपेनासे झाले.  मग तुकाचे काय काय झाले असेल याच्या कल्पना मनात येऊन लागल्या.  लहानपणापासून कल्पनांत मी फार घाबरा होतो.  जो दूर असेल त्याच्याबद्दल नाना काळज्या करण्याची मला सवय होती.  घरचे जनावर जरी वेळेत घरी अाले नाही तरी मी भयंकर अस्वस्थ होई.

अाता मला वाटू लागले, तुका बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल अाणि वाहत गेला असेल.  किंवा नदीत शिरला असता सुसरीने अोढून नेऊन तळातकपारीत त्याचा देह खोवून ठेवला असेल.  सवडीने ती भक्ष्य खात राहील.  किंवा नदी अोलांडून पलीकडे चढून जाऊन सरळ चालत राहिला असेल अाणि एखद्या जनावराने झडप घालून त्याला उचलून नेले असेल.

त्याने बेभान होऊन नाचतगात म्हटलेले गेल्या महिन्यातील अभंग माझ्या डोळ्यापुढे अाले.  त्यांत स्वत: देव अापल्याला विमानातून न्यायला अालेयत असे त्याला वाटत होते.  विमान येणार म्हणून तो उत्कटतेने इंद्रायणीच्या तीरवर जात होता.  वैकुंठाला जातो म्हणून तो सारखा सर्वांचे निरोप घेत होता.

विमान येणार हे त्याला खरे वटत असेल यात शंका नाही.  अापणच कल्पना करायच्या व अापणच नवीनवी विश्वे तयार करायची त्याची विलक्षण हातेटी होती.  अापणावर परस्त्रीने मोह घातला तर … असा विचार त्याच्या मनात अाला अाणि लगेच असे घडून अापण त्या मोहातून निसटलो असा त्याने अभंग रचला.  अशी स्त्री नव्हती अाणि मोहही नव्हता, मी त्याचा धाकटा भाऊ संगतो.

त्याचप्रमाणे अाताही विमान नव्हते अाणि वैकुंठही नव्हता.  तो इथेच कुठेतरी सापडणार यात मला संशय नव्हता.  गेल्या वेळी अाम्ही सात दिवस शोधले होते.  अाता वेळ अाली तर मी सतरा दिवस शोधिन.

पण म्हणूनच ही शोधाशोध का अाली, तुका असा का झाला ?–सारखा हा माझ्यापुढे प्रश्न येतो.  अाणि दर वेळेला मी त्याचे वेगळे उत्तर शोधतो.

ते दोन मृत्यू झाले नसते तर ?  तुका असा झाला नसता.

अामचा पिता अवचित गेला.  बैलावर गोणी लादून तुका व्यापाराला कोकणात गेला होता.  वडिलांचे अौर्ध्वदेहिक उरकून अाम्ही त्याची वाट पाहत होतो.  घर उदास झाले होते.  सावजी अधिकच पूजाअर्चा-भजनात मग्न झाला होता.  अाईने अंथरूण धरले होते.  मुले दबून होती.  मोठी माणसे मंद झाली होती.  कामात मन गुंतवीत होती.  अाणि भिंतीशी शून्य डोळ्यांनी बघत बसत होती.

तुका अालेला मी अातून पाहिला.  त्याअाधी बैलांच्या गळ्यांतील घुंगुरांच्या विशिष्ट किणकिणीने तुका अाल्याची सूचना मिळाली होती.  सगळे घर चूपचाप झाले होते.  वडील गेल्याचे तुकाला कुणी सांगायचे !  प्रत्येकाच्या मनात अाले असावे.  तुकाने बाहेरच्या अंगणात बैल थांबविले.  मग तो गोणी उतरवू लागला.  तेव्हा धावत पुढे होऊन मी त्याला हात द्याला गेलो.  गोणी उतरवून अाम्ही अोटीवर अाणून ठेवल्या.  मग बैलांना विहिरीवर नेऊन अाम्ही पाणी पाजले.  बेड्यात नेऊन बंधले.  गवाणीत ताजे गवत टाकले.  वेसणीचे कासरे सोडले.  ते अगदी व्यवस्थित गुंडाळी करून खुंटीवर अडकविले.  माझ्या घशाशी अावंढे दाटून येत होते.  “दादा !  बाबा गेले रे !”  मला सारखे अोरडावेसे वाटत होत.  पण शब्द फुटत नव्हता.  तुका बैलांना गोंजारू लागला.  त्याने त्यांच्या पाठीवरून, तोंडांवरून, अायाळीवरून ममतेने हात फिरविला.  ते पाहत असता माझा बांध फुटला. मी अावेगाने अोरडलो,

“दादा !”

तुकाने चमकून माझ्याकडे पाहिले.  मी सदऱ्यात तोंड लपवून हुंदके देऊ लागलो.  तुका झर्रकन माझ्याकडे अाला.  माझ्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणाला,

“काय झाले कान्हा ?”

“बाबा गेले रे !”  मी हुंदक्यात अोरडलो.

तुकाचा डोक्यावरचा हात एकदम खाली अाली.  मी वर पाहिले.  ताठ नजरेने तो समोर पाहत होता.  त्याचा भकास झालेला चोहरा पाहून घाबरून त्याला हलवीत मी म्हणालो,

“दादा–दादा !  असा काय बघतोस ?”

मग माझ्याकडे न पाहता तुका घरात गेला.  अातल्या खोलीत अाईचे अंथरूण पडले होते.  तुकाला पाहताच तिने हंबरडा फोडला.  तुकाने धावत पुढे होऊन अाईला मिठी मारली.  “काय केले र हे देवाने ?”  अाई अोरडली.  तिने गळा काढला.  सगळे घर रडू लागले.

तुका अाईचे डोके मांडीवर घेऊन बसला.  मी हळूच उठून बाहेर अालो.

बैलांवरच्या, अोटीवर अाणून ठेवलेल्या गोणी व्यवस्थित लावल्या.  त्यांतच पैशांची थैली होती.  ती अात अाणून कपाटात ठेवली.  कुणीतरी हेही करायला हवे.

इतक्यात तुका उठून बाहेर अाला.  अाणि अनवाणीच नदीच्या रस्त्याने चालू लागला.  मी चमकून हातातले काम टाकून त्याच्या मागे गेलो.

एका उंचवट्याशी येऊन तो थांबला.  तिथून स्मशान हाताशी दिसत होते.  मी तुकाच्या मागे जाऊन उभा राहिलो.  वडिलांच्या चितेची राख अजून तिथेच होती.  तिकडे पाहत असता तुकाच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.

कितीतरी वेळ तुका रडत होता.  मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभा होतो.

तुका तेव्हा रडला.  मग अाईच्या वेळी रडला.  त्यानंतर तो कधी असा रडलेला मला अाठवत नाही.

|| १४ ||

ते दोन मृत्यू झाले नसते तर ?  वडिलांचा,  नंतर अाईचा.  पुन्हापुन्हा माझ्या मनात येऊ लागले.  वडिलांनंतर वर्षचे अात अाई तेली,  ती मात्र तुकाच्या मांडीवर.  या दोन मृत्यूंनी पुढचा तुका घडला.  माझी खात्री अाहे.

अाई गेल्यानंतर त्याने केलेला विलक्षण शोक !  स्मशानातून मी व सावजीने त्याला दोनही बाजूने धरून घरी अाणले.  घरी येताच अोटीवरच तो भिंतीपाशी कोसळला.

तुकाने तेव्हा इतके दुःख केले की मला दुःख करायला त्याने सवडच ठेवली नाही.  सावजी विरक्त, तुका असा दुःखात.  मी मुकाट्याने घरातली कामे हाती घेतली.

तुकाच्या त्या वेळच्या अतीव दुःखाचा मला उलगडा होत नाही.  दादा !  तुला ठाऊक नव्हते का की कुणाचेच अाईबाप जन्माचे राहत नाहीत.  अापले अाईवडील जातात.  अापल्या मुलांचे अाईवडील, म्हणजे अापण जातो.  हे असेच होत असते, ही जगरहाटी अाहे.  असेच जग जगत राहत जात असते.  अरे !  तुझा अहंकार तरी केवढा होता ?  की साध्या माणसालाही ज्या गोष्टी कळतात, त्या न कळण्याइका तू अज्ञानी होतास, साधाभोळा होतास ?

मी हे तेव्हा तुकाला बोललो नाही.  पण दिवसभर त्याच्याजवळ बसून होतो.  संध्याकाळी तुका जरा शांत झाला.  माझ्याशी बोलण्याइतपत शांत झाला.  अापले दुःख अोकीत तो म्हणाला,

‘कान्हा !  बाबा गेल्यावर अाईने विचारले, ‘हे काय झाले रे ?’  मी तेच विचारतो, हे काय झाले ?  बाबा का गेले ?  अाई का गेली ?  सावजीने अंग काढून घेतल्यावर किती हिरीरीने मी उदीम करू लागलो.  हौसेने व्यापार केला.  कसोशीने सावकारी केली.  थैल्या भरभरून होन घरी अाणले.  वडिलांना धन्य वाटले अापल्या.  अाईने कुरवाळले.  अाणि काय झाले ?  मला वाटले, मी उद्योग नीट संभाळू लागलो अाहे.  वडिलांना सुख देत राहू.  मोठ्या वैभवात जगू.  सगळे उत्तम होत राहणार.  कष्टाची फळे मिळणारच.  पण काय झाले ?  काय मिळाले ?  घन मिळाले.  अाईबाबा गेले.  त्यांचा मृत्यू टाळण्यास धनाचा उपयोग झाला नाही.  भरत जवळ नसता दशरथ गेला, तसा मी जवळ नसता पिता गेला.  त्या वेळी मी जवळ अाहे की नाही याची तमा मृत्यूने बाळगली नाही.  भरलेल्या सुखी संसारातून बाबा-अाईला कुणी उचलून नेले ?  हा मृत्यू कोण अाहे ?  अाणि त्याला माणसांच्या भावनांची चाड का नाही ?  अाम्ही करतो त्याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही, कान्हा !  किती भयंकर अाहे हे !”

अाम्चया अाईवडिलांच्या मृत्यूनंतर तुका पुन्हा कधी पहिल्यासारखा झाला नाही.  दोन मृत्यूंनी त्याच्या अहंकाराला पहिला धक्का दिला.  त्याच्या नजरेत तेव्हापासून मृत्यूचा विचार डोकावू लागला.  मृत्यूची जाणीव म्हातारपणीच यावी.  बाळपण, तरूणपण, म्हातारपण क्रमाने जात शेवटी मृत्यूचा विचार मनात यावा.

पण भरल्या वयात मृत्यूचे विचार सुरू अाणि तुका अाम्हांला हरवला.

|| १५ ||

एकीकडे डोके या असल्या विचारात असता माझे डोळे वाढत्या उन्हात परिसर शोधत होते.  डोळ्यांवर हात ठेवून मी कुठे तुकाची चाहूल कळते का पाहत होतो.  ऊन उदास व कोरडे वाटत होते.  त्यात दिसणारे सगळे त्या वेळी पोकळ वाटत होते.  निसर्ग तोच असतो.  मनःस्थिती बदलली की वेगळा दिसतो.  किती निरर्थक वाटत होते मला त्या वेळी !  ज्या उन्हात गवत कापत असता, नांगरत असता, खणत असता, घामाने निथळत असता, शक्ती कमी न होता वाढल्यासारखी वाटली होती, जे ऊन जीवनाने रसरसले वाटत होते, ज्या उन्हाने मानेच्या, हातावरच्या, पायांवरच्या शिरा टरटरा फुगल्या होत्या, ज्या उन्हात मधूनच सूर्य किती कललाय हे बघताना, ऊन पाडणाऱ्या त्या सूर्यनारायणाकडे बेदिक्कत टक लावली होती, ते ऊन अाता पार निराळी भावना देत होते.

अाता त्याच उन्हाने जीवनातले सगळे सत्त्व काढून घेऊन पोकळी निर्माण केली होती.  अाता वाऱ्याने डुलणारे गवत, नवी पालवी, उडणारे पक्षी व्यर्थ वाटत होते.  सृष्टीत सार न वाटणे याइतकी भयाण भावना कुठली नसेल.  तुका सापडला की ही भावना कुठल्याकुठे जाईल, मला कळत होते.  अाणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणत होतो, तुका !  तू परत ये.  परत ये–परत ये.

खाली दूर इंद्रायणी दिसत होती.  तिचा वाहता प्रवाह कळत नव्हता.  झाडी कमी होती त्या फटीतून तिचे निळे पट्टे डोकावत होते.  गावाकडून तीन माणसे नदीकडे उतरत होती.  इतक्या दुरून त्यांतला एक मी तत्काळ अोळखला.  तो रामेश्वरभट होता.  रामेश्वराला पंचक्रोशी मानीत होती.  हा पंचाहत्तर-ऐशी वर्षांचा म्हातारा अजून उमेदीने हालचाली करीत होता.  हा वाघोलीचा.  पण अाता पारमार्त्थिक होऊन अाळंदीस येऊन राहिला होता.  त्याची वारंवार देहूस अामच्याकडे खेप असे.  तुकोबावर त्याचे प्रेम व तुकाही त्याच्यावर प्रेम करी.  पहिल्या भेटीपासूनच त्यांची जुळली होती.

नदीकडून येणाऱ्यांपैकी दुसरे दोघे, त्यांना नदी अोलांडल्यावर मी अोळखले.  त्यांतला एक मंबाजी.  इतकी वर्षे तुकाचा मत्सर करून अाता तो तुकाला मानू लागला होता.  पण माझा त्याच्यावर अजूनही विश्वास नव्हता.  खरे मी त्याला दुरूनच अोळखायला हवे होते.  त्याच्या अंगावर इतके भस्म लावलेले असे की तो न दिसता भसवमाचे पट्टे उभे अाहेत असे वाटे.  नाना तऱ्हेच्या माळा एकाच वेळी घालण्याची त्याला हौस होती.  त्याची भगवी वस्त्रे कधी विटलेली नसत अाणि स्वच्छही असत.  त्याचे बोलणे फार गोड.  अध्यात्म हा त्याला धंदा होता.  ज्यांना असा बुवा लागतो त्यांना तो योग्या होता.  लोक त्याच्या नादी होतेही.  पण तुकामुळे अापले नाव कमी होईल ही भीती त्याला सारखी होती.

अालेला तिसरा माणूस होता बहिणावईचा नवरा.  बायकोच्या हट्टासाठी तो बायकोबरोबर गेले वर्षभर देहूत येऊन राहिला होता.  अाणि ती तुकासाठी अाली होती.  बिचाऱ्य या तिच्या नवऱ्याला उगीचच कथाकीर्तने ऐकत संतमंडळीत वावरावे लागत होते.  बायकोला तो कधी कुठे एकटी सोडत नाही अशी त्याची गावात ख्याती होती.  अामच्या अानंदअोवरीत कीर्तनाच्या वेळी तो पेंगत बसलेला असायचा.

|| १६ ||

त्या तिघांचे लक्ष वेधायला मी जोरजोराने हात वर केले.  तिघेही तुकाला शोधायला बाहेर पडले अाहेत, माझी खात्री होती.  कारण तुका हरवला ही बातमी देहूभर कालच झाली होती.  तिघे नदी अोलांडून, मी होतो त्या तीराला अाले होते.  मी कुडते काढून ते जोरजोराने हलवीत डोंगर उतरून खाली अालो.  त्यांनी मला पाहिले असावे.  तेही अाता वेगाने डोंगराकडे येऊ लागले.  मी उतारावरून धावत येत असलयाने नदीतीरापासून ते फार पुढे येण्यापूर्वीच मी त्यांना गाठले.  पुढे होऊन मी रामेश्वरभटाला पायाशी वाकून नमस्कार केला.  मी म्हटले,

‘अजून पत्ता नाही.’

रामेश्वरभट अाशीर्वाद देत पुटपुटत म्हणाले,

‘घाबरू नकोस.  अाता अापण चौघे अाहोत.  अाम्ही डोंगराच्या बाजूने वळसा घेऊन येतो.  तू तीरावरून हळूहळू चालत राहा.  अाम्ही तुला गाठतो.  तू दमलाही असशील.’

तिघे डोंगराच्या मेरेने निघाले.  मी इंद्रायणीच्या काठाकाठावरून हळूहळू चालत राहिलो.  मला खूप विचार करायचा होता.  तुका सापडल्यावर तो पुन्हा हरवणार नाही याची मला युक्ती काढायची होती.  अाणि गुण्यागोविंदाने त्याने अामच्यांत दिवस काढावे असे मनात होते.  त्याचे अायुष्य शांतपणे जावे असे मला वाटत होते व अामचेही.  मागे जे झाले ती वावटळ ठरावी, पडलेली झाडे उचलून वाटा मोकळ्या कराव्यात, उडालेले छप्पर पुन्हा व्यवस्थित करावे.

ही वावटळ शांत करणे किती कठीन अाहे हे मला समजत होते.  या वावटळीच्या अाधी जो उष्मा झाला, जे तरारून ढग अाले ते या मंडळींनी पाहिले नव्हते.  ही मंडळी अात्ताअात्ता त्याच्या अायुष्यात अाली.  तुकाचे कवित्व सुरू झाल्यावर अाली.  ते गर्जू लागल्यावर अाली.  त्याअाधीचा तुका यांच्यापैकी एकालाही ठाऊक नाही.  खरे कल्लोळाचे दिवस तेच होते.

तुका अाणि अाम्ही त्याच्या कुटुंबातली मंडळी तुकाचे कवित्व सुरू व्हायच्या अाधी केवढ्या यातनांतून गेलो हे यांना कुणीतरी सांगायला हवे, माझ्या मनात अाले.  त्या वेळी कुणाला ठाऊक होता तुका ?  कुणाला ठाऊक होते तो कवित्व करणार ?  ज्या वेळी फक्त दुःख, हाल, कष्ट व अपमान सोसायचे होते तेव्हा त्याला अामच्याशिवाय कुणी नव्हते.  अाणि अाईवडील गेल्यावर ‘अति दुःखे दुःखी’ असताना संसाराचा गाडा रेटण्याचा तुकाने यत्न केला.  त्याच्या हाताखाली राहून तो सांगेल त्याप्रमाणे कामे पुरी पाडण्याची मी धडपड केली.  तेही दिवस कुणी पाहिले नव्हते.  रामेश्वरभटाने नाही–मंबाजीने नाही–बहिणाबाईच्या नवऱ्याने तर नाहीच नाही अाणि कुणी पाहिलेच असले तर दुरून.  तिऱ्हाइताच्या नजरेने.

तेव्हा मोरे कुटुंब एक सधन महाजन कुटुंब होते अाणि अाम्ही महाजनांची मुले होतो.  वडिलांनंतर तुका महाजन झाला तेव्हाही अर्ध्या गावाचे सावकार होतो.  बाहेरची परिस्थिती वाईट होती.  पण अाम्हांला वाईट नव्हती.  कुळे जर्जर होती.  पण कुळे जर्जर असतात तेव्हाच सावकाराचे फावते.  अाणि कुळे अामच्यामुळे जर्रर नव्हती.  सारा डोईजड होता.  त्याची वसुली जुलुमी होती.  परचक्रे तेत होती.  राजे जुलुमी होते.  शत्रूंनी येऊन अाज हे गाव लुटले, उद्या ते लुटले असे कानांवर येत होते.  अामचे गाव बाजूला होते.  अाम्हांला तेवढी झळ नव्हती.  चांगले सुखवस्तू कुटुंब म्हणून लोक अामच्याकडे पाहत होते.

पण सावजीने गृहत्याग केला त्याच्या पुढच्या वर्षी दुष्काळ पडला.  तीन मृत्यू व एक गृहत्याग यांतून सावरायला तुकाला सवड मिळाली नाही.  लोक नंतर म्हणत होते–असा दुष्काळ शंभर वर्षंत पडला नव्हता.  त्यात मोऱ्यांचे वैभव गेले.

|| १७ ||

दुष्काळाचे ते पहिले वर्ष !

अाम्ही शेते नांगरून ठेवली होती.  नजरा अाकाशाकडे होत्या.  उन्हे रोज रोज जास्तच तापत होती.  अाकाश जमिनीला करपवीत होते.  जमीन अाकाशाला तापवीत होती.  इंद्रायणी डोळ्यांसमोर अाटत चालली होती.  प्रथम जागोजागी प्रवाह थबकला.  मग एकेक करीत ती डबकीही सुकली.  रखरखीत वाळू तेवढी पात्रात चकाकत राहिली.  लोकांनी वाळूत डबरे खणले.  गवत केव्हाच गेले होते.  झुडपे उरलीच नव्हती.  गुरांनी दोन्हींचा केव्हाच फन्ना उडविला होता.  मग खालच्या मानेने ती रानोमाळ काडी काडी शोधीत हिंडू लागली.  मग नदीत येऊन वाळू हुंगू लागली.  पाहतापाहता त्यांची पोटे अात गेली.  मांसल पुठ्ठे वितळले.  कातडींना तंबूसारखी उचलीत हाडे उंच डोकावू लागली.  मग एक मेलेले ढोर सापडले.

दुष्काळाचा पहिला बळी पडला.  ते ढोर पाहायला सारे गाव लोटले.  त्या ढोराचा फक्त हाडांचा सापळा राहिला होता.  फुगीरपणा फक्त पोटाचा होता.  विषारी पाला खाऊन त्याचे पोट फुगले–लोक म्हणत होते.

या दुष्कालातच, तुका !  तुझी पहिली बायको अन्नअन्न करीत तडफडत मेली.  चतकोर-अर्ध्या भाकरीसाठी ती तडफडत होती.  ती दमेकरी होती.  अापण पाला उकडून खात होतो.  तो तिला पचेलसा नव्हता.  या अापल्या एके काळी समृद्ध महाजनांच्या घरात तांदळाचा दाणा नव्हता.  बाजरीचा, ज्वारीचा कण नव्हता.  हातात फडके

घेऊन तू गावात कुणी मूठभर तांदूळ, मूठभर ज्वारी देतोय का पाहत हिंडत होतास.  बायकोचा जीव वाचवण्यास तू भिक्षापात्र अवलंबले होतेस.  सकाळ-दुपार गाव हिंडून तू परत येत होतास.  ज्यांच्याकडे अापले येणे होते तेही तोंड चुकवीत होते.

त्या वेळी एका कुटुंबाचा मुख्य याशिवाय तू कुणी नव्हतास.  गावातील इतर कुटुंबपतींसारखा.  त्यांच्याप्रमाणेच तुझ्या डोक्यात अापले कुटुंब जगवायचे याशिवाय काही नव्हते.  इतरांसारखीच स्वत:च्या कुटुंबापुरती तुझी तडफड होती.  बायकोला वाचवायला तू अटीतटी केलीस.  मग तिचे मूल वाचवायला.  त्याला दूध मिळत नव्हते.  घरात गाय उरली नव्हती.  जनावरे सर्वांबरोबर रानात सोडली होती.  डोळ्यांसमोर ती मरताना पाहवत नव्हते म्हणून.

त्या वेळी दादा !  तू विठ्ठलवेडा नव्हतास.  अामच्याइतपत तुझी विठ्ठलावर श्रद्धा होती.  तुझे कवित्वही जागृत झाले नव्हते.  त्या वेळी अाज जी चार संतमंडळी तुझ्या भोवती अाहेत ती नव्हती.  लहानपणी जसा न खेळता येणारा खेळ जिद्दीने खेळलास, अंगावर पडलेली सावकारी चोखपणे संभाळलीस, तसाच दुष्काळाचा तडाखा तू हिंमतीने अंगावर घेत होतास.

तो ‘दादा’ मला अावडत होता.  अजूनही तोच अावडतो.  अन्नअन्न करीत पहिली बायको व मुलगा मेल्यावर भयंकर दुःखाने तू हतबल झालास.  तुला इतके हतबल मी कधी पहिले नवहते.  तरी तो ‘दादा’ मला अावडला.  कारण माणसाने मणसासारखे वागायला हवे, दादा !  अशा संकटात अाम्ही जसे वगू तसा तू वागत होतास.  अाणि तू हतबल झाल्यावर घराचा कारभार मी जिद्दीने अंगावर घेतला.

त्या वेळीच सावकार अापल्या दाराशी धरणे धरून बसले.  अापले येणे येत नव्हते, घेणेकरी दार सोडत नव्हते.  त्यामुळेच दादा !  अाकाश कोसळले.  अापले दिवाळे निघाले.

तरी काय बिघडले दादा !  दुष्काळ संपतो, पुन्हा पाऊस पडतो, धान्या येते.  व्यवहार सुरू होतात.  पुन्हा सावकारी सुरू करता येते.  वाडवडिलांची मिराशी वाया जात नाही.

पण तू वाडवडिलांची ही सावकारीची, महाजनकीची मिराशी वापरली नाहीस.  तू वापरलीस वाडवडिलांची विठ्ठलाची मिराशी.  अाणि तीही केवढ्या मोठ्या अट्टाहासाने !

दुष्काळानंतर पहिला पाऊस पडला तेव्हा, मला अाठवले, मी या पायथ्याशी खाण्यासाठी कंद किंवा मुळे किंवा पाला मिळतोय का पाहत होतो.  गेले काही दिवस अाकाशात ढग दिसत होते–जात होते अाणि अाकाशानिराशेचे खेळ करीत होते.  ढगांनी जोर धरावा म्हणून मनात प्रार्थना करीत होतो.

त्या दिवशीचा पहिल्या पावसाचा झटकारा मी जन्मात विसरणार नाही.  काही खाण्यासाठी खणायचे ते विसरून मी वेड्यासारखा भिरभिरणाऱ्या ढगांकडे पाहत होतो.  जरा दूर एका जनावराचा सापळावजा देह पडला होता.  अशी सापळा होऊन मृत झालेली जनावरे रोजच नजरेला दिसत होती.  वारा सुटला होता.  ढग लोटत चालले होते.  अाभाळ अाल्याने जमिनीचा उष्मा कमी झाला होता.  मग वादळ सुरू झाले.  धुळीचे भोवरे उंच गिरगिरत जाऊ लागले.  त्यांत वाळलेली पाने चकरा खाऊ लागली.  वाऱ्याकडे तोंड करून मी वारा पिऊ लागलो.

एकदम पावसाचे थेंब सडसडत पडू लागले.  ते तोंडावर घेत, खोल श्वास अोढीत मी नाचू लागलो.  मी कुडते काढून फेकले.  सर्वांगाला थेंबांचा स्पर्श होऊ दिला.  पावसाच्या थेंबांना जमीन भुकेली होती तशी माझी कातडीही भुकेली होती.  मला उन्मेष अाल्यासारखे झाले होते.  मी हात पुढे पसरून हातांत थेंब पकडू लागलो.  तळहातावर तेवढ्यात गार पडली अाणि हिऱ्याकडे पाहावे अशा लोभाने मी ती पाहू लागलो.  अाता सगळीकडे गारा पडण्यास अारंभ झाला.

वर तोंड करून गारांचा मारा खात मी बेहोष नाचत होतो.  गारांचा मारा कुर-वाळल्यासारखा लागत होता.  डोक्यावर टेंगळे अाली.  मी वाकून मूठभर गारा उचलल्या अाणि अाकाशाला अर्पण केल्या.  पुढच्या वर्षी वर्षादेवतेने पुन्हा अाम्हांस अशाच द्याव्यात म्हणून.  मग पुन्हा वाकून मी मूठभर गारा वेचून तोंडात टाकल्या, अोंजळभर धोतरात धरल्या.  कुडते उचलून त्यात गोळा केल्या.  नंतर गारा थांबून जोरात पाऊस सुरू झाला.  मी ठिबकत उभा राहिलो.

काही वेळाने पाऊस थांबला.  चहूकडून पाणी वाहण्याचे गोड अावाज येत होते.  मी डोक्यावरून अोघळणारे पाणी हाताने पुसून वर पाहिले.  जे ढोर मघा मी मेलेला सापळा समजलो होतो, त्या सापळ्याने मान वर केली होती.

दादा !  माझ्यासारख्या साध्या संसारी माणसाला अानंद होण्यास दुसरे काय हवे असते ?  देवाने पाऊस द्यावा, शेतात कणसे चांगली यावी, विहिरींना पाणी यावे, पोरेबाळे, बायको अानंदात सुखात असावी, सणसमारंभ थाटाने करावे–अाणखी काय हवे ?

|| १८ ||

दादा !  माझे हे खोटे अाहे का सांग !  अशा वाटण्यात काय चुकले सांग !  पण दुष्काळ संपून वर्ष संपायच्या अात तू अापले भंगलेले देऊळ दुरूस्तीला का काढलेस ?  पाऊस चांगला झाला होता अाणि तुझ्यासारख्या अनुभवी वाण्याला धंदा सहज उभा करता अाला असता.  पण दुकान उघडून सहाअाठ महिने झाले अाणि तू देऊळ दुरूस्तीला घेतलेस.

देऊळ हा अापल्या पूर्वजांचा ठेवा होता.  गावाबाहेर कुठेही उभे राहिले की प्रथम त्याचेच दर्शन होई.  दूर गावाला गेलेला गावकरी देऊळ दिसू लागताच गाव अाले म्हणून पाय जोराने उचली.  माहेरवाशिणीला दुरून ते देऊळ पाहताच माहेर अाले वाटून ऊर भरून येई.  पण दादा !  तू दुष्काळानंतर इतक्या लौकर त्याची दुरूस्ती हाती घेणे बरोबर नव्हते.  वर्षा-दोन वर्षांी दुकानातून पैसे निघाल्यावर ते काम करता अाले असते.  नाहीरती काही वर्षे ते भंगलेले होतेच.  दुष्काळानंतर तू दुकान उघडल्यावर मला वाटले, तू उभारी घेतलीस.  तू उभारी घेणार यात संशय नव्हता.  पराभव हा तुझ्या स्वभावात नव्हता.  तू जीवनाने अोतप्रोत भरलेला होतास.  जीवनातून जेवढे मिळेल तेवढे तू घेत अाला होतास.  ऊस गाळणारा जसा उसाचे कांडे जास्तीत जास्त पिळून घेतो, तसा तू चोखंदळ गाळणरा होतास.  तुला एकसारखा रस हवा होता.

देऊळ नीट करायला का घेतलेस हे त्या वेळी तू माझ्याजवळ बोलला नाहीस.  पण पुढे तू कवित्व केलेस त्यात, देवाचे देऊळ भंगले होते ते नीट करावे असे चित्ताला वाटले, असे लिहिलेस.  अाईवडील गेले त्याचे दुःख, बायकोचे दुःख, दुष्काळत झालेले अपमान, निघालेले दिवाळे, लोकांत चाललेली छी थूः–यामुळे तू दुःखी कष्टी होतास.  अशा वेळी माणूस देवाकडे वळतो; तसा तू वळलास का ?

तेव्हा तू बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हतास.  नाहीतर माझ्याजवळ काहीतरी बोलला असतास.  तेव्हा तुझी हालचाल मंद झाली होती.  तुझे टपोरे डोळे निस्तेज, उदास होते.  दुकानात बसायचास तेव्हा कुठेतरी टक लावून, शून्य नजरेने पाहत बसायचास.  गिऱ्हाईक अाले तरी तुला भान नसायचे.

दुकानातून भंगलेले देऊळ समोरच दिसायचे.  मग केव्हातरी मुलांनी चढून चढून किंवा ढोराने शिंगांनी धडक देऊन भंगलेल्या भिंतीच्या दोनचार विटा तुझ्या डोळ्यादेखत पाडल्या असतील.  तुझ्या मनात अापल्या पूर्वजांनी बांधलेल्या देवळाची अवस्था पाहून स्वतःच्या स्थितीची तुलना अाली असेल.  अापला संसार भंगलाय तसे हे देऊळही भंगले अाहे.  अाणि मग मनात अाले असेल की, भंगलेला संसार अापल्याला नीट करता येत नाही, निदान पूर्वजांचे देऊळ तरी नीट करावे.  पडलेल्या विटा अाधी तू वर नुसत्या रचल्या असशील.  तुला बरे वाटले असेल.

तुला तेव्हा एवढासुद्धा अाधार पुरे होता.  मग तू अंग मोडून देवळाच्या दुरूस्तीच्या मागे लागलास.  हाती जे थोडे द्रव्य होते ते त्यात घालू लागलास.  दुकानाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.  दादा !  गेल्या काही वर्षांत अापल्यावर ज्या अापत्ती अाल्या त्या दैवी होत्या.  पूर्वसंचितामुळे हे दारिद्र्य अाले असे धरून अाम्ही खाली मान घालून, पुन्हा चांगला काळ येईल असे धरीत संसार रेटीत होतो.  देवाला चांगला काळ अाण म्हणून भाकीत होतो.  कवडी-कवडी काळजीने खर्च करीत होतो.

म्हणूनच तू देऊळ बांधायला घेतलेस तेव्हा अाम्हांला तुझा राग अाला.  मी बायकोला म्हटले, प्रत्येक दमडी अापल्याला जगायला हवी अाहे अाणि दादा हातात द्रव्य अाले की देवळाकडे घालतोय.  कसे निभायचे अापले ?

तुझ्या बायकोने त्या वेळी प्रथम तोंड सोडले.  तिने ते द्रव्य अापल्या मोहेरून अापले कुटुंब सावरण्यासाठी अाणले होते.  ती तुला गोणी घेऊन व्यापारासाठी देशांतराला जाण्यास सांगत होती.  तीही सावकाराची लेक होती.  परिस्थिती अंगावर अाल्यावर वाण्याने कशी सावरायची असते हे तिला ठाऊक होते.  पूर्वी तू चांगला व्यापार केला होतास.  पुन्हा तेच करावे, पूर्वीचे येणे वसूल करायच्या मागे लागावे, असे तिला वाटत होते.

अाणि पहिल्यांदाच तू तिचे ऐकले नाहीस. भंगलेले देऊळ बांधीत राहिलास.  लोक परिस्थिती अंगावर अाली की नवस बोलतात अाणि नवसाला देव पावला की मगच नवस फेडतात.  पण तुका !  नवस न बोलताच तू फेडू लागलास.  तू देवावर अोझे घातलेस.  देवाशी झालेला तुझा व्यवहार अपूर्व होता.

तुझ्या स्वभावात बदल होऊ लागला होता.  अामच्यांतून तू काहीतरी वेगळा होऊ लागला होतास.  अाम्हांला ते कळले नाही.

|| १९ ||

डोंगरापलीकडून फेरा घेऊन शोधायला गेलेले तिघे मी नदीकाठावर होतो तिथे परत अाले.  अाम्ही सगळे सावलीत बसून, तुकाला कुठे शोधायचा याचा विचार करू लागलो.  रामेश्वरभट, बहिणाबाईचा नवरा, मंबाजी या तिघांतच खरी चर्चा चालली होती.  मी बाजूला गप्प ऐकत होतो.  मी तुकाचा भाऊ होतो.  ते शिष्य होते.  तुका म्हणत असे त्या संतजनांत त्यांची जमा होती.  ते तुकाला भावाहूनही जवळचे समजत होते.  त्यांच्या मते जन्माने तो जाझा भाऊ असेल, जिजाबाईचा नवरा असेल, पण त्याचे खरे कुटुंबीय संतमंडळी होती.  त्यांच्या त्या कुटुंबात मला कधी शिरकाव मिळाला नाही.  कारण मी माझ्यामागे संसाराच्या जबाबदाऱ्या लावून घेतल्या होत्या व तुकाच्या अासपास राहणे मला नेहमी जमणार नव्हते.  तुकाचे कवित्व रोज मला सर्वांअाधी वाचायला मिळत होते.  त्यांच्या दृष्टीने मी केवढा भाग्यवान होतो.  पण कवित्वाचा मी उपयोग करून घेत नव्हतो, म्हणून मी दुर्दैवी होतो.  त्यांना माहीत नव्हते की, तुकाचे कवित्व वाचून उठताच, तुकाच्या व माझ्या दोन्ही कुटुंबांच्या योगक्षेमाचे मला बघावे लागत होते.

संतमंडळींचे एकमेकांबद्दलचे प्रेम विलक्षण !  असे म्हणतात की, त्यांना दुरूनसुद्धा एकमेकांशी संवाद साधता येत होता.  तुकाने किंवा त्याच्या संतमित्रांनी जर असेच प्रेम स्वतःच्या कुटुंबियांबद्दल दाखविले असते तर !  पण संसार हा त्यांना ‘वमान’ होता.  कित्येक वेळा मला असे वाटे की, सर्व संत एकत्र होऊन संसारी माणसांविरुद्ध बंड करून उठत अाहेत.  त्यांना अाम्हा सर्वांचे संसार उद्ध्वस्त करायचे अाहेत.

संतांबद्दल असे बोलणे चूक ठरेल.  माझ्या मोठ्या भावाची मी निंदा केली असेही त्यात होईल.  माझी ही भावना माझ्यापुरती होती.  संत जमले अाणि मी तिथे गेलो की त्यांनी मला अापल्यापैकी समजावे असे मला वाटे.  त्यांच्यापैकी कवित्व करणारे एकदोनच होते.  मीही कवित्व करणारा होतो.  माझे कवित्व त्यांनी ऐकावे असे वाटे.  पण मी त्यांना त्यांच्या कथाकीर्तनानंतर जेवणास वाढणारा यजमान होतो.  अाता ते बोलत असता मी जसा बाजूला पडलो होतो, तसा सतत बाजूल पडत अालो होतो.

गवताच्या काड्या उपटीत, खाली मान घालून त्यांची चर्चा मी ऐकत होतो.  तुकाच्या भोवती काही वर्षे जमा झालेले हे लोक, एकदोन सोडले तर, मला फारसे अावडले नव्हते.  मला वाटे की, तुकाचा अाणि यांचा काही संबंध नाही.  तुका एका वाटेने जातोय, हे दुसऱ्या !

|| २० ||

गवताच्या काड्या खुडून मी तोंडात चघळू लागलो.  मला भूक लागली होती.  मी मग काडीने दात कोरू लागलो.  मंबाजी म्हणाला, “गावात म्हणताहेत, तुका सदेह स्वर्गाला तेला.”

मंबाजीला हे सांगताना अानंद वाटत होता तो मला अावडला नाही.  या कल्पनेचे तो स्वतःच्या हितासाठी कसे कौतुक व गाजावाजा करील हे माझ्या डोळ्यापुढे अाले.  तुका सदेह स्वर्गाला गेला असला तरी मला हेवा नव्हता.  पण ती अफवा अावडल्याबद्दल मला मंबाजीचा राग अाला.  तुका स्वर्गाला गेल्यावर त्याच्या बायकोमुलांचे काय होणार हे माझ्यापुढे अाले.

त्यांची बोलणी चालूच होती.  भंगलेले देऊळ कसे बांधले याची अाठवण निघाली.  तुकाने भिंतीसाठी चिखल केला तेव्हा ‘विठ्ठल-विठ्ठल’ म्हणत तो कसा रंगायचा अाणि प्रत्येक वीट ‘विठ्ठल’ म्हणत त्याने कशी रचली, अशी कोल्हापुरास ऐकलेली कथा बहिणाबाईच्या नवऱ्याने सांगितली.  त्यामुळेच देवळाचे काम हजार वर्षे ढळणार नाही अशी समजूत अाहे, तो म्हणाला.

तो सांगत असता मला मनात हसू येत होते.  कारण त्यातले काही खरे नव्हते.  देऊळ नीट करताना मी तुकाला पहिले होते.  तो अभंग म्हणत नाचत नव्हता.  तो ‘विठ्ठल-विठ्ठल’ म्हणतही नाचला नव्हता.  त्या वेळी तसले काही त्याच्या मनात नव्हते.  त्याने दुरुस्तीचे सारे काम स्वतः केले हे खरे.  मी मदतीला गेलो, पण माझी मदत त्याने घेतली नव्हती.  देह कष्टवून ती अापल्या गांजलेल्या मनाला गुंतवू पाहत होता.  याशिवाय काही नव्हते.  या तिघांपैकी ती दुरुस्ती पाहिली असलीच तर रामेश्वरभटाने.  त्या वेळी रामेश्वरभट तुकाला देहूचा एक दुर्दैवी महाजन म्हणून अोळखत असेल इतकेच–ज्याच्या घरी चार मृत्यू झाले, दिवाळे निघाले.

तुका त्या वेळी पराभूत तुका होता.  हे मोऱ्यांचे घर मोडकळीस अालेले घर होते, हे मानाने वाढलेले घर फजित झालेले, नमलेले घर होते.  जिथे सणसमारंभ, सनयाचौघडे घुमले होते तिथे शांतता अाणि हुंदके होते.  या मोऱ्यांचा प्रमुख केवळ लज्जा अाणि दुःख झाकण्यास देवळाची भिंत बांधीत होता.

पुढे तो कीर्तनाला बसू लागला, एकादशी करू लागला.  एकदा त्याने पंढरीची वारीही केली.  अर्थात, या नंतरच्या गोष्टी.  देऊळ बांधल्यावर काय झाले हे या मंडळींना कळावे म्हणून मी त्यांना म्हटले,

“ऐका !  तुका मला एकदा म्हणाला, ‘कान्हा !  भिंत नीट करून, हातपाय धुऊन मी देवळात जाऊन देवाला नमस्कार करून बाजूला बसलो.  माझ्या मागून एक गावकरी अाला.  दर्शन घेऊन तो पलीकडे बसला.  मग अाणखी एक गावकरी अाला.  तोही नमस्कार करून बसला.  मला नवल वाटले, कारण माझी जराही चलबिचल झाली नाही.  दुष्काळानंतर माणसांची मला भीती वाटू लागली होती.  प्रत्येक जवळ अालेला माणूस मला घेणेकरी वाटू लागला होता.  कित्येकदा मी भिऊन घरात अगदी अात काळोखात जाऊन बसे.  पण या वेळी त्या दोघांची मला थोडीही भीती वाटली नाही.  माझे मन इतके निवांत होते !  त्यापूर्वी मी देवळात अनेकदा गेलो असेन.  त्या दिवशी मला देऊळ काय हे खरे कळले.  गावात देऊळ हेच एक असे ठिकाण असते, जिथे व्यवहार संपतात.  विठ्ठल-रखुमाई असलेल्या या चार भिंतींत बसणारा निर्वेध बसतो.  माझ्यासारखा दिवाळे निघालेला येतो.  माझा सावकारही येतो.  देवासमोर ते सारखे समान होऊन बसतात.

“‘कान्हा !  अापल्या पूर्वजांनी देऊळच का बांधले हे मला तेव्हा प्रथम कळले अाणि भंगलेले देऊळ अापण नीट केले ही नकळतच किती चांगली गोष्ट केली, असे मनात येऊन माझे मला बरे बाटले.’

“मंडळी !  तुका मला असे म्हणाला अाणि देवळात जाऊन कीर्तनाला बसू लागला व एकादशी करू लागला.  त्यासंबंधीही तो काय म्हणाला सांगतो.  तो म्हणाला, ‘कान्हा !  मी पहिल्यांदा कीर्तनाला बसलो तेव्हा पंधरावीस श्रोते होते.  कीर्तनकार रंगला होता.  तितकेच श्रोतेही रंगले होते.  सगळे अानंदात भान विसरले होते.  मी अाश्चर्याने पाहू लागलो.  या मंडळीतील बहुतेक माझ्याप्रमाणे दुष्काळातून भाजून बाहेर अाली होती.  कुणाची अाई, कुणाचा बाप, कुणाची भाऊबहीण, मुले, माझ्या बायको-मुलांप्रमाणे अन्नअन्न करीत मेली होती.  त्यांचा अानंद मला कळेनाच.’

“‘कान्हा !  अापले मातापिता गेले तेव्हापासून दुष्काळापर्यंतच्या अापत्तींनी माझे मन पोखरून गेले होते.  बायकोसाठी अन्न मागायला दारोदार हिंडून मी अपमानित झालो, तो अपमान मन जाळत होता.  पण हे सर्व अपमान व दुःखे तिथे बसलेल्यांनीही सहन केली होती.  अािण तरी ती सारी अानंदात होती.  जणू जे हाल झाले ते हाल नव्हतेच व कीर्तन हेच खरे होते !  मी अादराने मनोमन त्यांच्या पायावर डोके ठेवले.  अाणि मनातच म्हटले, संतजनहो !  तुमच्या अानंदाचा एक चतकोर तुकडा या दुःखी जीवाकडे फेका.’”

तुकाने सांगितलेले मी सांगत होतो.  तिघेही मोठ्या भक्तिभावाने ऐकत होते.  मी ‘बुवां’ विषयी अाणखी सांगावे असा त्यांनी अाग्रह केला.  पुन्हा केव्हातरी सांगेन असे म्हणून मी उठलो.  तुकाला शोधायचे मुख्य काम होते.  माझी ती चिंता होती.

अाम्ही नदीच्या पलीकडल्या तीरावर होतो.  मग त्याच तीरावरून अाम्ही शोध घेत निघलो.  नदी वाहते त्या दिशेने अाम्ही चालू लागलो.  उन्हाने डोकी तापत होती.  घटिका गेली.  तुका इकडे कुठे गेला असेल असे चिन्ह दिसले नाही.  अाम्ही एका अांब्याच्या झाडाखाली थांबलो.  मग अापापल्या भाकऱ्या सोडून अाम्ही खाल्ल्या.

नदीच्या प्रवाहात उतरून अाम्ही पाणी प्यालो.  पाणी पिण्यास वाकलो असता पाण्यातले माझे प्रतीबिंब पाहून दचकलो.  मला तुकाची जबरदस्त अाठवण झाली.  जिथे तुका अाता असेल तेथे त्याला भाकरी मिळाली असेल का ?  अापले जेवण झाल्यावर त्याची अाठवण यावी याचे मला फार वाईट वाटले.  देहधर्म माणसाला प्रेमही विसरायला लावतात.  दुष्काळात अनेकांनी स्त्रिया व मुले विकली नव्हती का ?  काही ठिकाणी मुलेही फाडून खाल्ली, अशा तेव्हा वदंता होत्या.

मग अाम्ही तोंड फिरवून नदीच्या मुखाकडे चालू लागलो.  पोट भतले होते.  तहान भागली होती.  धुळीत पाय भाजत होते तरी पावले जड नव्हती.  माझे चित्त अाशा गोष्टींकडे नव्हते.  तुका गेल्याचा हा दुसरा दिवस होता.  सूर्य डोक्यावरून खाली उतरत होता.  त्याच्याकडे टक लावून म्हटले, अादित्यादेवा !  तू सर्वसाक्षी अाहेस.  माझा तुका कुठे गेला सांग.  माणसांचे सर्व पाहत तू अनेक युगे फेऱ्य घालीत अाहेस.  तू कधी बोलत नाहीस.  तरी या एका वेळी बोल.  अगे इंद्रायणी, हे वृक्षांनो, हे शेतमळ्यांनो, डोंगरांनो–कुणीतरी सांगा तुका कुठे गेला ते.  इंद्रायणी !  तुझा प्रवाह त्याने निश्चित अोलांडला असेल.  तुझ्या ज्या बिंदूचा तुकाच्या पायांना चंचल स्पर्श झाला तो बिंदू दूर वाहत गेला असेल.  त्याला परत बोलावून विचार.  तुझ्या प्रवाहाच्या तळातील कुठलीतरी वाळू तुकाच्या पायांखाली दाबली गेली तिला विचार.  हे वृक्षांनो अाणि गवतांनो, तुम्ही डुलता अाहात ते तुका कुठे गेला हे सांगता येत नाही या दुःखानेच ना ?  तुमच्या फांद्यांचे हात करून तुका गेला ती वाट दाखवा.  हे पाखरांनो !  झाडाझाडांवरून उडताना तुम्ही नक्की तुका कुठे गेला हे पाहिले असेल.  सोयरी-सहचरे म्हणून तुम्हा सर्वांना तुकाने प्रेमाने म्हटले.  तुमच्यापैकी कुणीतरी, तुकाने समाधी लावल्यावर त्याच्या खांद्याडोक्यावर निर्वेध बसला असाल.  अाणि तुकाने अापल्या शिदोरीतील अन्नाचा वाटा तुम्हांला अनेकदा दिला असेल.  तुमच्यांतले जे वृद्ध पक्षी, त्यांनी तुकाची अनेक कौतुके तुम्हांला सांगितली असतील.  ती अाठवून तरी सांगा तुका कुठे अाहे ?  सगळे शोक व्यर्थ असतात तसा हाही शोक व्यर्थ होता.

|| २१ ||

दादा !  सारी कामे सोडून मी तुला असा शोधीत हिंडत अाहे.  अापली शेते माझी वाट पाहत अाहेत.  राबाची तयारी करायची अाहे.  गुरे वाट पाहत अाहेत.  दुकान वाट पाहत अाहे.  घरी जाऊन मुलांशी हसणे-खेळणे करायचे अाहे.  बायकोशी प्रेमगोष्टी करायच्या अाहेत.  पण ते सोडून मी रानोमाळ तुझ्यामागे हिंडतो अाहे.

दादा !  या सर्वांना वाटतेय, केवळ भावाच्या नात्यामुळे मी तुला शोधतोय.  त्यांना असेही वाटत असेल की, भावाने भावाला शोघले नाही तर लोकापवाद येईल म्हणून मी तुला शोधतोय.  मी तुला का शोधतोय हे मनोमन मला ठाऊक अाहे.  मी तुला शोधतोच अाहे, पण जे मी हरवून बसलोय ते शोधतोय.  दादा !  तू जे शोधीत अाहेस त्याची चुणूक मी अनुभवली अाहे.  तू ज्या विरक्तीत पूर्ण बुडाला अाहेस, त्यात चुकलीमाकली बुडी मारून घाबरा होत मी बाहेर अालो अाहे.  ज्या विरक्तीने अापल्या कुटुंबाला पछाडले तिने मला तरी कुठे सोडले अाहे ?  संपूर्ण विरागी होणे कदाचित सुखाचे असेल.  पण विरक्तीचे झटके येण्यासारखे दुर्दैवाचे काही नाही.  मधूनच संसार वमन वाटतो, पण तो सोडवतही नाही, अशी अवस्था अत्यंत शोककारक असते.

‘वमन’ हा शब्द तुझा फार लाडका अाहे.  किती घाणेरडी उपमा देतोस तू संसाराला !  जेवत असता कुणीतरी विष्ठा टाकावी इतकी शिसारी हा शब्द मला देतो.  या संसारात गुंतलेले अाम्ही इतके घाणेरडे अाहोत का रे ?  कधीकधी संसारी माणसाचा तू हा करीत असलेला उपहास मला असह्य झाला अाहे.  पहाटे उठून जेव्हा मी तुझे कवित्व वाचायचो, तेव्हा मला तुला सांगावेसे वाटायचे, दादा !  नको रे हा ‘वमान’ शब्द वापरूस.

दादा !  मला संसार वमन वाटत नाही.  माझा भाऊ मला हवाय.  म्हणून मी तुला शोघतोय, समजू या.  पण तुझे हे शिष्य तुला का शोधत अाहेत ?  एक नश्वर देह सापडवण्याची यांची एवढी तगमग का ?  की मी एका संसारात गुरफटलो अाहे तसे हे दुसऱ्या एका ‘संसारात’ गुरफटले अाहेत–संतांच्या ?  अाणि त्या संतांच्या संसाराचा त्यांना तितकाच मोह अाहे.  ‘तुका गेला म्हणता; ठीक !’  असे म्हणून त्यानंी अापल्या नामसंकीर्तनात शांतपणे रमायला हवे होते.  दादा !  तुझ्या मागेमागे लागलेले हे लोक मला एवढेसे अावडत नाहीत.

|| २२ ||

अाज दीड दिवसाच्या शोघातच माझे पाय गळले अाहेत.  काही वर्षांपूर्वी मी तुला सात दिवस शोधले व घरी घेऊन अालो तेव्हा मी थकलो नव्हतो.  तुला शोधण्यासाठी पृथ्वी खणून काढण्याची उमेद होती तेव्हा.  हा वयाचा फरक असेल.  तेव्हा मी अठराएकोणीस होतो.  तू एकवीस होतास.  संसाराच्या भाराने थकलो नव्हतो तेव्हा–अापला मोठा भाऊ हरवलाय, त्याला शोधायचाच एवढेच मनात होते.  त्या सात दिवसांत मी राने, डोंगर पालथे घातले.  प्रत्येक झुडपात शिरून धुंडाळले.  डोहात बुड्यात मारल्या.  कधी थकलो नाही.  पाय गळले नाहीत.

तुझी मनःस्थिती मला तेव्हा कळली नव्हती.  तुझे जाणे हे कुटुंबावरचे संकट होते व त्या संकटाला तोंड देण्यास मी ठाकलो होतो.  तुझ्या मनात काय चालले अाहे हे कळण्याचा पोच मला नव्हता.  तू दुःखी अाहेस, अस्वस्थ अाहेस, एवढे दिसत होते.  पण तू भामनाथ डोंगरावर जाऊन बसलेला असशील हे स्वप्नातही अाले नाही.  तीनचार कोसांवरच्या जंगलातल्या या डोंगरावर तू जाण्याचे कारण नव्हते.  तिथे अाहे काय, तर जुन्या काळापासूनचे शंकराचे स्थान, मोडके देऊळ.  लहानपणी अापण दोनचार वेळा गंमत म्हणून तिथे गेलो होतो, इतकेच.  त्या वेळी सहा दिवस तुला शोधून सातच्या दिवशी जवळजवळ निराश होऊन या डोंगरावर चढलो, ते उंचावरून भोवतालचा प्रदेश न्याहाळता येईल, कुठे तुझी हालचाल कळेल यासाठी.  डोंगर चढून मी माथ्यावर गेलो अाणि तू बेशुद्ध पडलेला मला दिसलास.

मी घावत तुझ्यापाशी अालो.

खरे म्हटले तर पहिल्यांदा वाईट शंकाच मनात अाली होती, इतका तू अस्ताव्यस्त पडला होतास.

ते सात दिवस मी दोघांपुरती भाकरी अाणि लोटाभर पाणी बरोबर बाळगीत होतो.  अाणि तू सापडला नाहीस की माझ्या वाटणीची भाकरी किंवा पाणी न संपविता शिदोरी तशीच परत अाणीत होतो.  मला वाटायचे की, तू इतका भुकेला असशील की तुला दोघांच्या वाटणीच्या भाकऱ्या लागतील.  तू इतका तहानेला असशील की हा लोटासुद्धा तुला पुरणार नाही.

धावत पुढे होऊन मी तुला हलविले.  “दादा !  दादा !” हाका मारल्या.  तुझ्या तोंडावर दोन चुळका पाणी मारले.  तुझ्या तोंडात चार थेब सोडले.  हळूहळू तू डोळे उघडलेस.  मला इतका अानंद झाला !  शक्तिपात झाल्यासारखी तुझी गात्रे गळली होती, त्यांत थोडा जीव अाला.  तुला मी बसते केले.  मग भाकरी सोडली.  लहान मुलासाठी करतो तसे भाकरीचे बारीक तुकडे केले.  अगदी सावकाश चावतचघळत खायला सांगून, एकेक तुकडा पाण्यात बुडवून तुला भरवीत बसलो.  अर्धी भाकरी खायला तुला तास लागला.

तुला बरे वाटू लागल्यावर अापण डोंगर उतरू लागलो.  तुझा एक हात माझ्या मानेभोवती धरून, माझ्या दुसऱ्या हाताने तुझ्या कमरेभोवती मिठी घालून तुला सावरीत खाली अाणले.  मधूमधून तू थकलाससे पाहून मी तुला थांबवून बसून राहायला लावीत होतो.  इंद्रायणीच्या काठाशी अालो तेव्हा वाटले, अापण कितीतरी तास चालत होतो.  तिथे अापण डोहावर बसलो अाणि तू म्हणालास, “कान्हा !  घरी जाऊन कपाटातील सारे कर्जरोखे घेऊन ये.  ते डोहात बुडवून मगच मी घरी येणार अाहे.”

प्रथम तुझे बोलणे मला कळलेच नाही.  सात दिवसांच्या शोधात झालेली धावपळ, अाणि नंतर तू सापडल्याचा अानंद डोक्यात होता.  सात दिवस तू अाम्हांला कसे घाबरवून सोडलेस, घरी काय अवस्थ झाली हे मला सांगायचे होते.  अाणि सर्व धावपळीचा शेवट गोड झाल्याने, त्यावर गमतीने बोलायचे होते.

पण तेव्हा, त्या स्थळी तुझे ते वाक्य इतके अवचित अाले की क्षणभर सुन्न झालो.  मागतील सात दिवसांत तुझ्या डोक्यात काहीतरी विलक्षण चालू असले पाहिजे.  पण ते जाणून घेण्यापेक्षा मी माझ्या विचारातच राहिलो.

दुष्काळानंतर पाऊसपाणी चांगले झाले होते.  लोकांजवळ धान्य झाले होते.  धनही.  ज्यांचे कर्जरोखे अापणाकडे होते त्यांची फेड सुरू झाली होती.  व्याजासह कर्जे परत अाली की अापला संसार पुन्हा ताळ्यावर येईल अशा अाशेत मी होतो–अाम्ही घरचे सर्व होतो.  पुन्हा श्रीमंती येण्याचे हिशेब सुरू झाले होते.

अाणि तू कर्जरोखे इंद्रायणीत बुडवायचे बोलत होतास.

तुझी लहर मला कळेना.  जर शरीर जिवंत तर सारे जिवंत.  माझी खात्री झाली की दुष्काळापेक्षाही मोठे संकट तुझ्या लहरीने अापल्या कुटुंबावर कोसळणार.  माझे डोके गरम झाले.  बायकापोरे उपाशी मारण्याचे हे तुझे डोहाळे !  माझ्या तोंडून शब्द फुटेना !  तू शांतपणे म्हणालास,

“कान्हा !  यापुढे माझ्या हातून सावकारी होणार नाही.  दिवाळे निघून अपमान झाल्यावर कित्येकदा जीव द्यावा असे मनात अाले.  माझे काय होणार मला कळेना.  मी देऊळ नीट करून पाहिले.  मग लोकांत अपमानाचे जिणे असह्य झाले म्हणून दूर जाऊन विचार करायचा असे ठरवून मी या डोंगरावर अालो.  तिथून मी लोकांकडे पाहू लागलो.  थोडे भजनकीर्तनात रंगले होते.  बाकीचे संसारात रंगले होते.  मी त्या थोड्या लोकांत जायचे की बाकीच्या लोकांनत लोकांत जायचे, हा प्रश्न होता.

“जर बाकींच्याप्रमाणे राहायचे ठरवले तर त्यांच्याप्रमाणे अापल्याला पुन्हा पोटापाण्याचा उद्योग सुरू करायला हवा.  अाणि सावकारी कधी तोट्यात येत नाही.  धन मिळवणे सोपे अाहे.  पण अापल्या बाबांनी धनसंचय केला अाणि सगळे धन इथे सोडून त्यांना जावे लागले.  ते धन त्यांनी मिळवले नसते तर काही बिघडले नसते.  कारण अापण त्यांची मुलेही तसेच एकदा धन सोडून जाणार अाहोत.  बाबांनी मरताना माझी अाठवण अनेकदा काढली.  मी जवळ असताना मरणे ही साधी गोष्ट त्यांच्य हाती नव्हती.  माझी बायको अाणि मुलगा उपाशी मेली.  अापण महाजनांच्या घरचे, कधी असे अन्न-अन्न करीत मरू हे त्यांच्या स्वप्नातही नसेल.  दुष्काळ त्यांच्या हातात नव्हता.  माझी पहिली बायको खूप वर्षे मला सोबतीला हवी होती.  तेही माझ्या हातात नव्हते.  तिचे मरण मला हतबल होऊन पाहत बसावे लागले.

“अापण सर्व दुबळे अाहोत–माझ्या ध्यानात अाले.  अापण सर्व करतो, अापण ठरवतो व होते, असे अापणांस वाटत असते.  पण अापण काही करीत नाही, काही ठरवणे हेही अापल्या हाती नाही–मला कळून चुकले.

“भजन-कीर्तनांत रमणारे अापल्या गावात जे चार लोक होते त्यांचे ऐकायला मी देवळात जायचो.  संचारचक्रातून मुक्त होण्यास ते विठ्ठलाचे नाव घेण्यास सांगायचे.  ऐकताना ते मनाला पटायचे.  पण कीर्तनातून बाहेर अाले की संशय यायचे–माणसाचे दुःख असे कसे जाईल ?  माणसाने उद्योगउदीम केला पाहिजे.  कुटुंबात एकमेकांवर प्रेम केल पाहिजे.  लोकांनी परस्परांना मदत केली पाहिजे.  दुःख अशामुळे जाते.

“परंतु पुन्हा कीर्तनाला बसल्यावर, विठ्ठलनामात गुंगल्यावर अापले हे वाटणे चकू अाहे असे वाटायचे.  माणसाच्या दुःखाची यांची व्याख्या वेगळी अाहे.  यांचे काहीतरी निराळेच अाहे.  संसाराचे रहाटगाडगे वरखाली िफरत राहाणार.  सुखदुःखे होणार, धन येणार, जाणार, प्रियजनांचा मृत्यू होणार.  हे चक्र थांबणार नाही.  माणसाचे यात काही साधणार नाही.  अज्ञान हेच माणसांचे दुःख अाहे.  मग अापण काय करायचे ?  पुन्हा सावकारी सुरू करायची ?  पुन्हा श्रीमंत झालो तरी काय होणार ?  ज्यांच्या दाराशी मी धरणे धरीन, घरावर जप्ती अाणीन त्यांचा व माझा शेवट एकच होणार अाहे.  माझ्या ऋणकोपेक्षा फार तर चार दिवस मी जास्त चांगले अन्न खाईन.  चांगली वस्त्रे वापरीन.  याशिवाय त्यात जास्त काय अाहे ?  मग धनको होऊन मी दुसऱ्यांना का लुबाडावे ?  हे मी का करावे ?

“कान्हा !  मी ठरवले, ‘सावकारी’ इंद्रायणीत बुडवायची.”

 || २३ ||

तेव्हा तुकाचे ते बोलणे ऐकताऐकता मी दिङ्मूढ झालो होतो.  असे काही विचार जगात असतील ही कल्पनाही मला नव्हती.  त्या क्षणी मी इतका भारावून गेलो की न बोलता उठून कर्जरोखे अाणायला घराकडे निघालो.

अापण तुकाला शोधायला गेलो होतो अाणि घरी सर्व चिंतेत अाहेत हे मी कर्जरोख्यांच्या विचारात विसरलेच होतो.  मी घरी जाताच मुले येऊन बिलगली.  तुकाची बयाको व माझी बायको ‘काय झाले ?’ ऐकायला माझ्याकडे पाहत राहिली.  त्यांचे चेहरे कळवळलेले होते.  तुका सापडल्याचे सांगताच दोघी रडू लागल्या.  एकमेकींना मिठी घालून हसूरडू लागल्या.

ते पाहून माझ्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागले.  भावनांत वाहून जाणे किती सुखाचे असते !  दादा !  तू जर त्या दोघींना असे हसतारडताना पाहिले असतेस तर माझी खात्री अाहे की तू म्हणाला असतास, कान्हा !  ते कर्जरोखे तसेच कपाटात राहू देत !  तू म्हाणाला असतास, संसारात दुःख असेल तर अानंदही अाहे.  अानंद पर्वताएवढा–दुःख जवाएवढे अाहे.

तुका कसा सापडला हे दोघींना मी सांगितले.  दोघींचे रडणे थांबून दोघी हौसेत अाल्या होत्या.  मी कपाटाशी जाऊन कर्जरोख्यांचे दप्तर काढू लागलो.

दप्तर काढीत असता दोघींच्या नजरा माझ्या पाठीला कळत होत्या.  या भलत्या वेळी मी दप्तर काढतोय हे त्यांना विचित्र वाटत असणार.  तुकाचा हट्ट त्यांना कसा सांगावा हे मला कळेना.  तुका सापडून असता सर्व अानंदीअानंद झाला अाहे असे त्यांना वाटत असता प्रत्यक्ष वस्तुस्थिती किती निराळी होती हे फक्त मलाच ठाऊक  होते.

दप्तर कपाटाबाहेर काढले.  मुलांपैकी एक जण माझ्या पायाशी येऊन माझा धोतराचा सोगा धरून उभा राहू लागला.  त्याच्याकडे पाहतापाहता माझा तुकावरचा गिळलेला राग पुन्हा उसळून अाला.  हे कर्जरोखे डोहात बुडविल्यावर या मुलांचे काय होणार ते माझ्या डोळ्यांपुढे अाले.  ती अन्न-अन्न करीत राहणार.  अाम्हांला तुका दारोदार हिंडायला लावणार.  अामचा ‘दुष्काळ’ संपणारच नाही.

दप्तर सोग्यात लपवून मी झटकन दाराकडे गेलो अाणि घराबाहेर पडलो.

इंद्रायणीशी पोहोचेपर्यंत तुकाशी भांडण करण्याचा माझा निश्चय झाला.

दादा !  तेव्हा मी तुझ्याशी भांडलो त्याची क्षमा कर.  ते भांडण बरेचसे खरे होते.  पण काहीसे खोटे होते.  विरक्त पुष्कळ अाहेत.  अापला सावजी विरक्त होता.  पण सर्व जबाबदारी संपल्यावर तो निघून गेला.  पण तुझी बयकोमुले होती–माझी बयकोमुले होती.  सर्वांचा पोटापाण्याचा प्रश्न असता तू कर्जरोखे बुडवायला निघालास हे तुझे धैर्य कौतुकास्पद होते.  त्या वेळी मला कळले नाही, पण तू अापला मार्ग मोकळा करीत चालला होतास.  अाम्हीही तुझ्याबरोबर यावे अशी तुझी इच्छा होती.  पण मी मोडता घालून माघार घेतली.

संसारी, स्वार्थी, संकुचित वृत्तीचा भाऊ जे बोलेल ते मी तुला त्या वेळी बोललो.  तुला बायकोमुलंची, भावाची, भावाच्या कुटुंबाची पर्वा नाही म्हटले.  अापल्या वडिलांनी कष्टाने बांधीत अाणलेला व्यवसाय तू धुळीला मिळवतो अाहेस म्हटले.  कर्जरोख्यांतील माझा अर्धा हिस्सा मी मागितला.

तुझा चेहरा कष्टी झाला.  माझा कळवळा येऊन कष्टी झाला.  मी दिलेले दप्तर तू परत माझ्या हातात देऊन अर्धे कर्जरोखे मला काढून घ्याला सांगितलेस.  मीही ते निवडून काढून घेतले.  उरलेल्याचे दप्तर बांधून तुझ्याजवळ दिले.  तू ते डोहाशी जाऊन, एक दगड अात खुपसून डोहात फेकलेस.

त्यानंतर काही क्षण तुकात व माझ्यात अातापर्यंत कधी न उत्पन्न झालेला दुरावा उत्पन्न झाला.  इंद्रायणीवर अाम्ही दोघे स्तब्ध उभे होतो.  तो यापुढे असाच अबोल होणार असे वाटून मला गदगदून येत होते.  झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागावी व काढलेले कर्जरोखे पाण्यात फेकावे असे मनात येत होते.  पण ते धैर्य मला झाले नाही.  मी रडू लोगलो.

मला गोंजारीत तुका म्हणाला, “कान्हा, रडू नकोस.  मी तुझ्यावर रागावलो नाही.  चल !  घरी जाऊ.”

|| २४ ||

भामनाथ डोंगर शोधीत असता अशा तापदायक अाठवणी मनात येत होत्या.

भामनाथ डोंगर शोधून झाला.  अाम्ही भंडारा डोंगराकडे निघालो.  माझे सोबती अाता तुकाबद्दल अाणखी काही सांगण्याचा अाग्रह करू लागले.  हे तीनचार कोसांचे अंतर चालत असता भंडारा डोंगरावरच्या अाठवणीही उसळून येऊ लागलया.  भंडाऱ्यावर तुका कसा जाऊ लागला हे मी त्यांना सांगू लागलो.

“कर्जरोखे बुडवल्यावर तुकाने संतांची अक्षरे अभ्यासायची ठरवली.  त्यासाठी भंडाऱ्यावर जाण्यास सुरुवात केली व माझ्या कष्टयात्रा सुरू झाल्या.  अाश्चर्य असे की त्याने मला असे म्हटलेही नाही, ‘कान्हा, मी असा असा डोंगरावर जाऊन बसणाराय.’  मग ‘तिथे भाकरी घेऊन ये’ म्हणणे दूरच.  सकाळी तुकादादा बाहेर जातो, संध्याकाळी परत येतो अाणि तेव्हा एकदा जेवण घेतो एवढे कळले होते.  तो भंडाऱ्यावर जातो हे एका गवळ्याच्या पोराने दोन दिवसांनी अाम्हांला येऊन सांगितले.  तेव्हा भाकरी अाणि घेऊन मी तिथे जाऊ लागलो.  एक विरक्त कुटुंबात असण्याची सवय सावजीने अाम्हांला केलीच होती.

“नंतर अामची वाडवडिलार्जित ग्रंथसंपत्ती तुकाने बाहेर काढली.  गीता, ज्ञानेश्वरी, भावार्थरामायण, योगवासिष्ठ, एकनाथी भागवत, अमृतानुभव–अनेक पोथ्या घरात होत्या.  तुका त्यांतली एक एक पोथी डोक्यावर घेऊन अगदी सकाळी भंडारा डोंगराकडे चालू लागायचा.

“अाता घर शांत होते.  अधूनमधून वहिनीही तुकाची भाकरी घेऊन जाई.  कर्जरोखे बुडवल्याचे तिला कळल्यावर दोन दिवस ती रागात होती.  नंतर नवरा-बायकोंत काय झाले कळले नाही, पण ती शांत झाली.  तिचा राग उफाड्याचा होता.  पण तो उफाळून येई तसा मावळेही झटकन.  पहिल्या बायकोशी तुका मनानं रमला होता, तर दुसरीत त्याला शारीरिक अाकर्षण होते यात शंका नाही.  वहिनी भाकरी घेऊन गेली की दिवस माझ्या कामाला मोकळा राही.

“मंडळी, मी माझ्या भावाची ही हकीगत का सांगतोय ?  पुष्कळांचे भाऊ विरक्त होऊन गेले असतील.  अामचा सावजीही विरक्त होऊन गेला.  केवळ विरक्तीचे काय सांगायचे ?  तसेच तुकाच्या श्रेष्ठ कवित्वासाठी मी हे सांगत नाही.  श्रेष्ठ कवी अाणखीही अाहेत.  तुकाने अामचे सगळे कुटुंबच विरक्तीत अोढून येण्याचा प्रयत्न केला म्हणून सांगतोय.  ही विरक्ती तरी कोणत्या तऱ्हेची होती ?  ती सावजीची विरक्ती नव्हती.  एखाद्या नव्या प्रदेशात वस्ती करायला न्यावे तशा अानंदाने तुका अाम्हांला नेत होता.  हा नवा विलक्षण प्रदेश कुठे अाहे, कसा अाहे याचा त्यालाच स्वतःला अनेकदा संदेह पडत होता.  तरी तो अाम्हांला अोढीत होता.  अाम्ही अोढाळपणा केला की चिडत होता, रागावत होता, अाक्रस्ताळा होत होता.

“म्हणूनच पुढच्या वर्षाशी ताडून पाहता ही दोन वर्षे शांत गेली असे मी म्हणतो.  तुकाची ही दोन वर्षे अाम्हांला बालपणाइतकी चांगली गेली.  त्याने अभ्यास का सुरू केला मला कळले नाही.  पण अभ्यासाचा ध्यास माझ्यासारख्या संसारी माणसाला कळणारा सीधा, रीतसर ध्यास होता.  देहूत येणारे कीर्तनकार स्वतःचा व कुटुंबाचा योगक्षेम ठीक चालवीत होते.  अभ्यास करून कीर्तनकार होऊन तुकाने तेवढे केले तरी मला पुरे होते.  दुष्काळानंतर बावरलेले त्याचे मन ताळ्यावर येत असल्याचे पाहून मला बरे वाटले.  त्याला अभ्यासाला जेवढी मोकळीक देता येईल तेवढी मी देऊ लागलो.

“मग अापल्या अभ्यासाबद्दल तुका सांगायचा तेही मी रस घेऊन ऐकू लागलो.  अाधी त्याने अनेकदा अापल्या मनातलं वैराग्य सांगितले होते.  ते मला कळले नव्हते.  पण अभ्यासातील त्याच्या अडचणी मला कळत होत्या.  कधीकधी मी त्याच्या अडचणीत सल्ला द्यायचो.  माझा अडाणी सल्ला त्याच्या उपयोगी पडत असेल-नसेल, पण त्याच्या विचारांना चालना मिळायची.  तुका माझ्याशी सगळे बोलायचा, त्याचे मला धन्य वाटते.

“सुरूवातीस अापले चित्त अभ्यासात लागत नाही म्हणून तो उदास झाला.  तेव्हा मी त्याला सांगितले की अापला जन्मजात व्यवसाय वाण्याचे अाहे.  अभ्यासाची अापल्याला सवय नाही.  अापली रात्रंदिवस गाठ गिऱ्हाइकांशी, तराजूशी, देणया-घेण्याशी.  जरा नेट धरावा लागेल.  ग्रंथ शिकवायला अापल्याला गुरू नाही याबद्दल तो हळहळे.  मग त्याने संतांची अक्षरे पाठ करायलाच सुरुवात केली.  ज्याचा अर्थ कळला नाही ते पाठ करून तो वारंवार स्वतःशी म्हणत अर्थ लावीत बसे.  त्याने असे अनेक ग्रंथ मुखोद्गत केले.

“जसजसे तो ग्रंथ वाचू लागला तसातसा नादावू लागला.  तो सारखे म्हणू लागला, मी अडाणी, अहंकारी अाहे.  मला काही कळते असे वाटत होते, पण ते खोट.”

|| २५ ||

शब्द घशात अडकून मी थांबलो.

तुकाचा दोन दिवस शोध घेण्याच्या थकव्यामुळे किंवा मनावर पडलेल्या ताणामुळे मी भयंकर हळवा झालो होतो.  तुकाबद्दल सांगतासांगता मला भडभडून अाले होते.  डोळे अश्रूंनी तरारू लागले.  मी मनात म्हटले, दादा !  तू पहिले कीर्तन केलेस ते किती सुंदर केलेस !  कृष्णाच्या गोकुळातील बालक्रीडा तू सांगितल्यास.  मला अापल्या लहानपणात गेल्यासारखे वाटले.  तुझा अभ्यास सफल झाला.  पण प्रारंभी अभ्यासात चित्त लागत नाही म्हणून तू उदास असायचास.  ग्रंथ कळत नाही म्हणून पाठ करून त्यातील अवघड भाग मनात घोळवीत स्वतःच उलगडा करून घ्यायचास.  मग कीर्तनकारामागे तू ध्रुपद धरू लागलास.  तेव्हा कीर्तनकारापेक्षाही तुझे पाठांतर व पदाची अचूक निवड श्रोत्यांच्या लक्षात येऊ लागली.  विशेषतः दादा !  कीर्तनरंगात तू इतका दंग व्हायचास की तुला श्रोत्यांचे भान राहायचे नाही.

मी बोलणे थांबविले अाहे अाणि सद्गदित झालो अाहे हे पाहून मंडळी माझ्याकडे पाहत राहिली होती.  त्यांना माझे दुःख भावाकरिता अाहे असे वाटत होते.  मी भावाकरिता रडतच होतो.  पण अध्यात्माच्या अरण्यात वाट काढत जाणाऱ्या त्या एकाकी जीवासाठीही रडत होतो.

पण त्या काळात तुका मला तसा कळला नव्हता.  त्या वेळी त्याची बायको जशी त्याच्यावर चिडत होती तसा मीही त्याच्याविषयी हताश होत होतो.  तुका कीर्तने करू लागला.  परगावीही त्याची कीर्तने होऊ लागली.  तो किर्तनाहून घरी अाला की मी हळूच पाहू लासलो.  धोतराच्या सोग्यात त्याने तांदूळ अाणले अाहेत का ?  फळे अाणली अाहेत का ?  द्रव्य अाणले अाहे का ?

पण तो जसा रिकामा जाई तसा रिकामा परत येई.

दादा !  नंतर मला कळले की किर्तनाच्या गावी तू अन्नही घेत नाहीस.  बुक्का लावून घेत नाहीस.  माळ घालून घेत नाहीस.  तुझे कीर्तन योगक्षेमासाठी नव्हते.  स्वतःसाठी होते.  तू त्या वेळी थोडेसे धनधान्य घेतले असतेस तर !  अापल्या कुटुंबाचे पालनपोषण तेव्हा किती अवघड झाले होते !  घरात कित्येकदा दाणाही नसे, तुला दिसत हीते.

तरीही तू इतर कीर्तनकार अाणि संतमंडळी घरी अानू लागलास.  त्यांची अापल्या अानंदअोवरीवर कीर्तने होऊ लागली.  त्यांची सेवा करू लागलास.  त्यांचीच नव्हे तर पांथस्थांनाही तू विसाव्यास घरी अाणू लागलास, त्यांची सेवा करू लागलास.  तू अाणीत असलेले कीर्तनकार तुझ्यापुढे पुष्कळदा मंदबुद्धी असत.  तू अाणीत असलेले पांथस्थ पुष्कळदा चोर असत किंवा परान्नावर जगण्याची सवय लागलेले पृष्ट असत.

काम मिळविण्यासाठी तू घराबाहेर पडत होतास.  पण कुणी म्हातारी जड अोझे घेऊन जाताना दिसली की तिचे अोझे स्वतः घेऊन तिला पोहोचवीत होतास.  लोकांनी सोडलेल्या म्हाताऱ्या जनावरांना तू अंाजारूनगोंजारून दाणापाणी कुरू लागलास.  पंथस्थ अाजारी पडला की त्याला धर्मशाळेत नेऊन त्याची शुश्रूषा करू लागलास.  अडलेल्या बैलगाड्यांना तू नेट देऊ लागलास.  सांगितलेले कुठलेही काम तू फुकट करतोस हे पाहून लोक तुला घरची वाटेल ती कामे सांगू लागले.

गावात तुझे हसे होऊ लागले.  लोक मला तुला अावरण्यास सांगू लागले.  तुला अावरण्याची शक्ती माझ्यात असती तर !  अाणि तुझी शक्ती रोजरोज वाढत होती.  संसाराचे चक थांबावे म्हणून तू धडक्या देऊ लागला होतास.

माझ्यापेक्षा तुझी बायको तुझ्यावर जास्त संतापलेली होती.  स्त्रीचा नवऱ्यावर जास्त अधिकार असतो अाणि भावापेक्षा तिच्या नवऱ्याकडून जास्त अाणि वेगळ्या अपेक्षा असतात.  पण तू अापले प्रेम निवर्तलेल्या पहिल्या बायकोला देऊन बसला होतास.  दुसऱ्या बोयकोला प्रेम देण्याची वेळ येण्याअाधी तुला बायको, मुले, भाऊ ही नातीव उरली नाहीत.  मला तुझ्या बायकोची कितीकदा कीव यायची.  तू कुणाला केव्हा घरी घेऊन येशील, वेळीअवेळी कुणा पांथस्थाचे शिणलेले पाय चेपीत बसशील, केव्हा उठून कीर्तनाला जाशील, केलेले पाठांतर किती वेळ स्वतःशी म्हणत बसशील, कामाला म्हणून बाहेर गेल्यावर, दुसऱ्याची फुकट कामे करीत केव्हा घरी परत येशील याचा काही नेम होता का ?

तू घरी नसताना अाणि असताना वहिनीचे ताडून बोलणे सुरू असायचे.  “या मेल्याला धंदा करायला नको.  अायते खायला हवे.  वाटेल ते कुटाळ लोक अाणून हा टाळ कुटीत बसतो.  पोरांना घरात अन्न नाही.  ही पोरे मरतील तर सुटतील.  अोवरीत यांचा कल्लोळ चालू असतो.  जे घरात येते ते हा वाटून टाकतो.  सासरी, माहेरी, कुठेही याने मला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही.  जे इथे येते ते टाळ कुटते.  सगळे लाज वाटून प्यायले अाहेत.  माझ्या संसाराचा याने पुरा नाश केला.”

दादा !  तिच्या शिव्या काय चूक होत्या !  मलाही कित्येकदा तुला असेच ताडून बोलावेस वाटे.  अाम्ही दोघे साधी योगक्षेमी माणसे होतो.  तुझ्या विचारांची तेव्हा कल्पनासुद्धा येणे शक्य नव्हते.  गावातले लोक तुला हसत होते.  तेसुद्धा पोटार्थीच होते.  पुढे जेव्हा तू केलेले कवित्व मी वाचू लागलो, तेव्हा या वेळी तुझ्या मनात काय चालले होते हे कळले.  प्रथम तुला वाटत होते, माणसांची दुःखे दूर केली पाहिजेत.  दारिद्र्य, अाजार पाहून तुला कळवळा येत होता.  जे संत अाहेत त्यांची सेवा केली पाहिजे.  दुसऱ्या जीवाशी एकरूप होता अाले पाहिजे.  अवघे जन ब्रह्मारूप पाहिले पाहिजेत.  त्या सुखाला अंत नाही.  त्यातच अानंदाचे सागर हेलावणार अाहेत.  शांती, दया, क्षमा अंगी बाणली पाहिजे.  विवेक जवळ केला पाहिजे.  वैराग्याचे बळ बाणले पाहिजे.  नवविधा भक्ती ती हीच.

तुझ्या केव्हा लक्षात अाले की, माणुसकी वरैरे गोष्टी अगदी तोकड्या अाहेत ?  माणसांची जी सांसारिक दुःखे दिसतात ती खरी दुःखे नव्हेतच.  व्यवहारातून दुःखे निर्माण होतात, ती दुःखे खोटी, व्यवहारही खोटा.  खरे दुःख जन्म घेण्याचे अाहे.  कारण एखद्याचे एक दुःख दूर करावे तोच तो दुसरे दुःख करू लागतो.  एक गरज पुरवावी तर दुसरी उत्पन्न करतो.  अशी दुःखे निवारण करणे पोरपणाचे अाहे.  माणसाचे खरे दुःख निराळेच अाहे.

|| २६ ||

अाम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचून जरा विसावा घेतला नाही तोच बहिणाबाईचा नवरा म्हणाला, “अापण भजन करू या !  भजनाने सर्व ईप्सित प्राप्त होते.  तुकाही भजनाने सापडेल.  अापले भजन ऐकून तो भगवद-भक्त नक्की पुढे येईल.”

तिघांनी ‘रामकृष्ण हरि’ भजन सुरू केले.  ‘रामकृष्ण हरि’चा त्यांचा गजर सुरू झाला अाणि मी अातूनबाहेरून हेलावून गेलो.  माझ्या अंगाला घाम फुटला अाणि घशाला कोरड पडली.  तुकाच्या तोंडून पहिल्यांदा ‘रामकृष्ण हरि’ मंत्र ऐकला, ती विलक्षण सुंदर पण भयंकर रात्र माझ्यापुढे अाली.  दोन्ही हात वर करून मी अोरडलो,

“थांबा !”

सर्वांनी त्या क्षणी भजन थांबवले.  सारेजण पाहत होते.  माझ्या फाकलेल्या डोळ्यांकडे अाणि घामाने बडबडलेल्या तोंडाकडे ते बघतच राहिले.  मी म्हटले,

“संत हो !  ज्या रात्री हा मंत्र म्हणत तुका झोपेतून उठला ती रात्र माझ्या अाजन्म स्मरणात राहील.  अाम्ही दोघे रात्री देवळात झोपायला गेलो होतो.  अपरात्री तुका दचकून अोरडत उठला.  मी जागा होऊन त्याच्याकडे पाहिले.  त्याचे तोंड असेच घमाने डबडबले होते.  त्याचे अोठ काहीतरी पुटपुटत होते.  मग घशातून शब्द फुटू लागला.  ‘रामकृष्ण हरि, रामकृष्ण हरि’–तो पुटपुटू लागला.  पाहतापाहता त्याचा स्वर वाढला अाणि मग मोठ्याने ‘रामकृष्ण हरि’ म्हणत तो उठला अाणि ‘रामकृष्ण हरि’ म्हणत बेभान नाचू लागला.  मी झटकन उठून दोन्ही हातांनी त्याच्या कमरेला मिठी मारून त्याला अावरू लागलो.  मला वाटले, तुका वेडा होऊन बेभान झालाय.  काही वेळ अामची धडपड चालली होती.  शेवटी मी त्याला देवळातल्या एका खांबाला टेकून बसवले.  पाणी अाणले.  त्याला प्यायला दिले.

“त्याचे अोरडणे थांबले.  पण अोठ पुटपुटतच होते.  डोळे मिटून तो टेकून बसला होता.  मग त्याच्या डोळ्यांतून घळघळ पाणी वाहू लागले.  बोलण्याचे भान अाल्यावर तो म्हणाला,

“‘कान्हा !  मला स्वप्न पडले.  अपूर्व स्वप्न पडले.  मी इंद्रायणीवरून स्नान करून येत होतो.  सकाळचा प्रहर होता. संबंध नदीवर मी एकटाच होतो.  एक कोंबडा अारवत होता.  काहीसे धुके पडले होते, त्यातून समोरून एक पुरूष अाला.  त्याचे डोळे तेजस्वी होते.  शरीर तेजःपुंज होते.  तो अाजानुबाहू होता.  किडकिडीत, काळा.  छातीवरून शुभ्र यज्ञोपवीत झळकत होते.  कपाळावर, छातीवर, दंडावर चंदनाचे सुरेख पट्टे होते.  मी त्याला अादराने नमस्कार केला.  माझ्या डोक्यावर हात ठेवून अाशीर्वाद देत तो म्हणाला,

“तुका !  मी कोण, माझी गुरुपरंपरा काय अाहे ते तुला सांगतो.  माझा गुरू राघवचैतन्य अाणि त्याचा शिष्य मी–बाबाचैतन्य अाहे.  मी तुला ‘रामकृष्ण हरि’ हा गुरमंत्र द्यायला अालो अाहे.  ‘रामकृष्ण हरि’ हा एक अद्वितीय मंत्र अाहे.  हा सारखा म्हणत राहा.’

“‘त्याचे बोलणे ऐकताच मी त्याच्या पायाशी लागलो.  एकीकडे मी ‘रामकृष्ण हरि’ म्हणत होतो.  माझे ऊर अानंदाने भरून अाले होते.  मग त्याने भोजनासाठी पावशेर तूप मागितले.  पण स्वप्नातल्या त्या अानंदात मी इतका मग्न होतो की त्याच्या बोलण्याचा मला विसर पडला.  त्यामुळे अामच्यांत अंतराय निर्मण होऊन तो एकाएकी निघून  गेला.  मला हळहळ वाटायला हवी होती.  पण गुरूने माझा अंगीकार केला, मला ‘रामकृष्ण हरि’ गुरुमंत्र दिला यानेच मी बेभान झालो होतो.  त्याच अवस्थेत मी जागा झालो.  माझा रोमरोम ‘रामकृष्ण हरि’ मंत्राने भरला होता, मी तो अोठांत पुटपुटू लागलो.  मला वाटले, पांडुरंगानेच मला कुरवाळले अाहे.  मी समोर विठ्ठलमूर्तीकडे पाहिले.  मला वाटले, ती अोठांत दयापूर्ण स्मित करीत, मला चिंता न करण्यास सांगत अाहे.  मला वाटले, कमरेवर हात ठेवून भीवरेच्या काठी उभ्या असलेल्या त्या विठ्ठलाने माझे सायास दूर केले अाहेत.  मी निश्चय केला, अाता हा मंत्र अाणि विठ्ठलाचे पाय सोडायचे नाहीत.  तो माझे वाटेल ते करो.’

“नंतर रात्रभर तुका ‘रामकृष्ण हरि’ म्हणत नाचत होता.  त्याचा अानंद मला कळत नव्हता.

“मंडळी, ‘रामकृष्ण हरि’ मंत्राने तुकावर पूर्ण मोहिनी घातली.  त्याचे कीर्तन त्या मंत्राच्या गजरात गर्जू लागले.  जागृतीचा प्रत्येक्ष क्षण तो ‘रामकृष्ण हरि’च्या उच्चारात घालवू लागला.  मला तो म्हणू लागला,

“‘कान्हा !  माझ्या गुरूने दिलेल्या मंत्राने माझे सारे बदलून गेले अाहे.  या अाधी मी कीर्तनात खूप बडबड केली.  पण मी केवळ संतांच्या वचनांचा भारवाहक होतो.  अरे !  सोन्याच्या मोहरांच्या थैल्या वाहणाऱ्या बैलाला त्या मोहरांचे जितके असते, तितकेच संतवचनांचे मला होते.  मी केवळ भाट होतो.  संतवचनांतले मर्म मला कळत नव्हते.  अाता मात्र या ‘रामकृष्ण हरि’ मंत्राने जे कळत नव्हते ते कळून अाले.  जे दिसत नव्हते ते दिसू लागले.  जो लाभ अलभ्य होता तो मिळू लागला.  अाता मी सारखा ही विठ्ठलाची नामावली घेत राहणार.  मग काय होईल ते होवो.  मला क्षणाचे सुख देणाऱ्या भोगांच्या अाधीन व्हायचे नाही.  ज्यावर मृत्यू सतत टपून बसला अाहे ते क्षणभंगुर लालसांचे जीवन मला जगायचे नाही.  ज्या तापत्रयात माणूस जखडलेला अाहे ते बंध तोडून मला मुक्त व्हायचे अाहे.  ‘रामकृष्ण हरि’त मला हवी ती विश्रांती लाभणार अाहे.’”

|| २७ ||

विश्रांती ?  माझ्या मनात अाता येत, वादळाला विश्रांती असेल तर तुकाला विश्रांती होती.  तो प्रत्यक्ष वादळ होता.  त्याचा स्वभाव मनस्वी होता.  एखादी गोष्ट मनाने घेताच पराकोटील नेण्याचीत्याचि प्रवृत्ती होती.  कलपनेने तो स्वतः पेटत असे व दुसऱ्यालाही अाग लावी.  तो म्हणत असलेल्या ‘रामकृष्ण हरि’ मंत्राचा नकळत माझ्यावर झालेला परिणाम मला अाठवला.

मी म्हशीचे दूध काढताना भांड्यात होणाऱ्या प्रत्येक चुळचूळ अावाजाबरोबर ‘रामकृष्ण हरि’ म्हणू लागलो.  लाकडे फोडताना कुऱ्हाडीच्या प्रत्येक धावाला ‘रामकृष्ण हरि’ पुटपुटू लागलो.  मी ते मनात पुटपुटत होतो.  तुकाला जशी कीर्तन करताना प्रथम लज्ज वाटली, तशी ‘रामकृष्ण हरि’ मोठ्याने म्हणायला मला लाज वाटत होती.

माझ्या लक्षात अाले की, ‘रामकृष्ण हरि’ म्हणू लागले की तेवढा वेळ दुसरे विचार मनात राहत नाहीत.  काही क्षण असे ‘रामकृष्ण हरि’त मन गुंतले नाही तोच दुसरे विचार मनात घुसून ‘रामकृष्ण हरि’ला बाहेर फेकतात.  इतर विचार मनात घोळत असता केव्हातरी ध्यानात येते की, ‘रामकृष्ण हरि’ म्हणायचे अापण थांबलो अाहोत.  मग भराभर ‘रामकृष्ण हरि’ म्हणत, घुसलेले इतर विचार अापण बाहेर फेकतो.  पुन्हा काही क्षण ‘रामकृष्ण हरि’ मनात राहते न राहते तोच इतर विचार हल्ला करून ‘रामकृष्ण हरि’ला बाहेर काढतात.

अातापर्यंत जे विचार मनात येतील ते येऊ देऊन त्याबरोबर वाहून जायची माझ्या मनाची रीत होती.  विचार त्रासदायक झाले तरी मी त्यांच्याशी झगडत बसत होतो.  पण त्रासदायक विचार मनातून या मार्गाने काढता येतात हे मला नवीन होते.  लहान मूल जसे नव्या खेळण्याशी खेळते तसा मी ‘रामकृष्ण हरि’शी खेळू लागलो.

एकदा रानात एकटा असताना ‘रामकृष्ण हरि’ असा तुकाप्रमाणे मोठ्याने गजर करीत नाचून तल्लीन होण्याचा मी यत्न केला.  पण एखादा क्षणच माझी तल्लीनता टिकली.  अापण नाचतो अाहोत याचे भान बहुतेक काळ राहिले.

अधूनमधून चिंतने किंवा रागाने उफाळणारे मन शांत करण्यासाठी ‘रामकृष्ण हरि’ म्हणावे या पलीकडे मला कधी जाता अाले नाही.  मला संशय यायचा, ‘रामकृष्ण हरि’ मनात असते ती मनाची अवस्था खरी की व्यवहारी विचार मनात असतात ती अवस्था खरी ?

या शंकेने मला कधीच सोडले नाही.

पण तुकाला संशय नव्हता.  या संसारी लोकांच्या तकलादू जीवनाहून जो निराळा मार्ग अापण शोधीत होतो, त्या मार्गाकडे नेणारा हमखास वाटाड्या अापणास सापडला अशी त्याची खात्री झाली होती.

दादा ! ‘रामकृष्णा हरि’ मंत्राने माझे मन कधीकधी शांत ठेवले एवढेच.  पण तुला या मंत्रातून अापली वडिलार्जित विठ्ठलाची मिराशी मिळाली अाणि कवित्व सापडले.

|| २८ ||

डोंगरावर रामेश्वरभट, जगनाडे अाणि बहिणाबाईचा नवरा यांना मी म्हटले,

“अाज तुकाच्या कवित्वावर तुम्ही सगळेजण निर्भर अाहात.  तुकाच्या अभंगांतून तुम्ही पराज्ञान घेऊ पाहता.  तुकाच्या अभंगांतून तुम्ही पराकोटीला जाऊ पाहता.  तुकाचे अभंग तुम्हांला अात्मानंद शिकवितात.  तुकाच्या अभंगांतून तुम्ही अनेक अनुभूती घेता.  तुकाच्या त्या कवित्वाचा अारंभ कसा झाला याची तुम्हांला कल्पनाही नसेल.

“तुका कवित्व करील हे त्याच्याही स्वप्नी नव्हते.

“अामच्या घरात त्या दिवसांत होत असलेल्या घालमेलीची कुणालाही कलपना नव्हती.  अामच्या घरी खायला नाही, ल्यायला नाही, दुकान बसले अाहे, या वरवरच्या गोष्टी लोकांना ठाऊक होत्या.  पण अामची अांतरिक लढाई त्यांना अगम्य होती.  वरवर पाहणारे अामची छीः थू करीत होते.  अपमान करीत होते.  तुका वेडा होण्याच्या मार्गावर अाहे असे म्हणत होते.  त्याच्य बायकोची कीव करीत होते व माझ्यासाठी हळहळत होते.

“घरातली रोजची काम चालूच होती.  बायकांची दळणी, कांडणी, मुलांची जेवणे, अांघोळी, कपडे, त्यांची भांडणे मिटवणे, देवपूजा, सण–सारे यथाक्रम होते.  माझी कामेही चालू होती.  तुकाची विरक्ती म्हणजे घरातली एक अपंगता अाहे असे धरूनच दोन्ही बाया चालल्या होत्या.  ‘अामचा दीर अपंग अाहे,’ माझी बायको म्हणे.  पण तुकाच्या बायकोला अापला धडधाकट नवरा अपंगासारखा वागावा हे सारखे खटकत होते.  ती रडत होती, चिडत होती, कुढत होती, पडेल ते कष्ट करीत होती.  तुका डोंगरावर एकांतात गेला की भाकरी घेऊन जात होती.  अापल्या श्रीमंत माहेराहून वेळप्रसंगी धनधान्य अाणीत होती.

“बायकोला काय वाटत हे तुकाला कळत नव्हते का ?  कळत होते.  तुकाला सर्व गोष्टी अापल्या सर्वांहून जासत कळत होत्या.  तुकाचे कवित्व मी पुढे वाचू लागलो तेव्हा हे माझ्या ध्यानात अाले.  वैकुंठाचा टकळा सुरू होण्याअधी त्याने बायकोला ‘अापल्याबरोबर चल’ म्हटले.  त्याची या दुसऱ्या बायकोवरही माया जडली असावी.

“जन्म घेतल्यापासून माणसाला सार्वंत सोपी गोष्टी म्हणजे वासनांप्रमाणे वळणे घेत, पंचमहाभूतांबरोबर समजुतीने राहणे.  ती अाम्ही करीत होतो.  ही वासना ठोकरणे, पंचमहाभूतांना नाकारणे, कळिकाळाला अाव्हान देणे हा मार्ग तुकाने घेतला.  केव्हाकेव्हा त्याच्या या मार्गाचे अोझरते दर्शन मला व्हायचे म्हणूनच केवळ मी त्याला अपंग धरीत नव्हतो.  कधीकधी मला वाटायचे, तो अपंग कसला ?  तो सर्वंत बलवान अाहे.  पण नेहमी वाटायचे, तो सर्वंहून अपंग अाहे.

“–रामकृष्ण हरि’ मंत्राच्य नादात तुका किती महिने होता ?  पोटापाण्याच्या उद्योगाच्या धडपडीत दिवस–महिने–वर्षे कशी जातात कळत नाही.  तुकाला अाता तिसरे मूल झाले होते.  मला दुसरे.  अामचा संसार अाणि अडचणी दोन्ही वाढत होत्या.  मागे वळून पाहिले की कधी कधी वाटते, किती कंटाळवाणे, तेच तेच काम अापण करीत अालो !  मी दुकानदारी करतो अाहे, माझ्या वडिलांनी केली, अाजोबांनी केली.  माझ्याप्रमाणे माझे पूर्वज नांगर धरीत अाले, रानात गवत कापायला गेले.  त्या सर्वांतून निष्पन्न काय झाले ?  काय प्रगती साधली ?

“नकळत तुकाचाच प्रश्न विचारतो अाहे.

“मंडळी, ‘रामकृष्ण हरि’ मंत्र मिळाल्यापासून त्या वर्षात तुका बदलला.  तो अानंदी, सतेज, उत्साही दिसू लागला.  या मंत्राबद्दल तो माझ्याजवळ अनेकदा बोलला.  एकदा म्हणाला,

“कान्हा !  गुरूने ‘रामकृष्ण हरि’ मंत्र दिल्यावर निवांत बसून, शुद्ध चित्त करून मी तो म्हणत बसू लागलो.  नामजपासारखे दुसरे साधन नाही.  माझी खात्री होऊ लागली.  चिंतेने मी पोळलो होतो, दािरद्र्य भाजत होते, संसाराला विटलो होतो.  मी परोपकार खूप केले.  लोकांची सेवा केली, हातातली शेवटली वस्तू गरजूंना दिली.  पण क्षणभंगुर संसारात संसारी जनांवर केलेले परोपकारही क्षणभंगुर ठरले.  ते घेणाऱ्यास क्षणभंगुर व देणाऱ्यासही क्षणभंगुर.  माणुसकी हा मायेचाच भाग कळून अाला.  मी चलत  असता, बसलो असता, काम करीत असता विठ्ठलाचे नाव घेऊ लागलो.  माझे चित्त शांत होऊ लागले.  जर काही व्यत्यय मधे अाला नाही तर यासारखा तडीस लावणारा मार्ग नाही !  फळ देठास टिकून राहिले तरच पिकते हे मनात ठेवून मी ‘रामकृष्ण हरि’ म्हणत राहिलो.  मग मला ब्रह्मानंदाच्याही वर अानंदाचे भरते येऊ लागले.  त्याचे वर्णन करता येणार नाही.  व्यवहारात असा अानंद कधी मिळाला नव्हता.  कारण जरी लक्ष होन जवळ जमले तरी त्यांचा क्षय होण्याची धास्ती असते.  अाणि त्या लक्ष होनांचा उपयोग मृत्यूनंतर काय असतो ?

नामजपाच्या अानंदाला क्षय नाही.  तो माझा, माझ्याबरोबर येणारा अाहे.  माझी खात्री झाली की अाहे मला मूळ सापडले अाहे.  ‘रामकृष्ण हरि’ म्हणू लागले की शरीर शीतल होते.  इंद्रियांचा व्यापार थांबतो.  हा मंत्र अमृताहूनही गोडगोमटा अाहे.  अातातर्यंत मी चक्रात सापडलो होतो.  त्यातून सुटका होत अाहे.  अातापर्यंत पोटापाण्यासाठी, बायकोमुलांसाठी खटपट करण्यात, मायेत रमलो होतो.  चहूबाजूंनी मी बंधनात होतो.  माझे माझ्या हातात नव्हते.  शेत जसे अाकाशाकडे नजर देऊन पडलेले असते अाणि पाऊस अाला तर फुलते नाहीतर जळून जाते, तसे माझे होते.  जन्म-मृत्यू माझ्या हाती नाहीत हा विचारही माझ्य मनात अाला नव्हता.

“‘अाता मी माझा मुक्त राहणार.  सर्व बंधने तुटणार अाहेत.  मला कळिकाळाचे भय नाही.  मृत्यूला जिंकीन.  ज्या परमेश्वराने मला उत्पन्न केले त्याला बोलावून पुढे उभा करीन अाणि त्याच्यात विलीन होऊन त्याची लबाडी  त्याच्या गळ्यात घालीन.  अाता सात दिवस उपवास पडला तरी नाम सोडणार नाही.  हे मस्तक फुटोतुटो, नामगजर चालू राहील.  शरीराचे दोन भाग झाले तरी कीर्तनाचा रंग भंगणार नाही.’

“संतजनहो, तुकाचा त्या वेळचा बोलण्याचा विलक्षण धबधबा तुम्ही ऐकायला हवा होता.  त्या धबधब्याने गिरक्या देत मला वाहवून नेले.  ‘रामकृष्ण हरि’ मंत्राने तुकाला केवळ भारले नाही; त्या मंत्राच्या उच्चाराच्या नादात त्याच्या वाणीत रस भरू लागला.  ती अोजस्वी होऊ लागली.”

एवढे सांगून मी गप्प झालो.  पुढे बोलेन म्हणून मंडळी माझ्याकडे पाहत बसली.  पण माझा माझ्याशीच संवाद सुरू झाला होता.  माझ्या मनाशी मी म्हणालो, तुका, ‘रामकृष्ण हरि’ मंत्राने तुला कवी केले.  तो मंत्र नाना तऱ्हेने अाळविता-अाळविता तुझ्या कवित्वाचा अंकुर फुटला; माझी खात्री अाहे.

मग दादा !  तुला ते स्वप्न पडले.  नामदेव तुझ्या स्वप्नात अाले.  तू मला दुसऱ्या दिवशी ते स्वप्न सांगितलेस.  तेव्हा तू अानंदाने फुलला होतास.  नामदेवांनी तुला स्वप्नात जागे केले.  बरोबर विठ्ठल होते.  कसलेही निमित्त न सांगता नामदेवांनी तुला कवित्व करण्याची अाज्ञा केली.

पृथ्वीवरील क्षणभंगुर जीवनातून सुटका होण्यासाठी तू जे प्रयत्न केलेस त्यांतलाच कवित्व हा एक प्रयत्न होता.  परमेश्वराच्या किल्ल्याच्या तटावर तुझी ती अाणखी एक धडक होती.

|| २९ ||

सूर्य क्षितिजाकडे उतरू लागला अाहे.  यथाक्रम रात्र पडेल.  तुका सापडला किंवा न सापडला याचे सूर्याला काही अाहे का ?  माणसाचे महत्त्व फक्त माणसाला.  पंचमहाभूते त्याला पुसतसुद्धा नाहीत.  दादा !  त्या निर्घृण पंचमहाभूतांपासून तुझ्या देहाचे संरक्षण करायला अाम्ही पाहत अाहोत.  देह अाहे म्हणजे सर्व अाहे एवढेच अाम्हांला कळते.  मागे तुझ्या बायकोने तुझा देह राखण्यासाठी राने तुडवली.  त्याचसाठी हे डोंगर मी अनेकदा चढलो.  अाताही अाम्ही त्याचसाठी वणवण करीत अाहोत.  अामच्या एका हाकेला तरी उत्तर दे.

माझे पाय गळू लागले अाहेत.  तू सापडणार नाहीस अशी भावना मला येऊ लागली अाहे.

दादा ! तू गेल्यावर मला काय उरले ?  या मंडळींना तुझे कवित्व उरेल ते पुरे अाहे.  अाणि तू गेलेला असलास तर तेच कवित्व मला वाचवणार नाही.  गेलेल्या माणसाची वस्तू पाहून भडभडून येते तसे तुझ्या कवित्वाचे कागद पाहून मला दरवेळी रडू कोसळेल.

|| ३० ||

तुकाचे कवित्व मी तेहमीच उत्सुकतेने वाचीत अालो होतो.  तुकाने रात्री लिहून ठेवलेले अभंग मी पहाटे उठून वाचायचो अाणि नंतर माझ्या कामाला लागायचो.  त्या कवित्वाने प्रथम मी चकित झालो.  पुढे इतरेजन चकित झाले.

तुकाचे अभंग वाचून मीही चोरून अभंग करू लागलो.  त्याला अभंगामागून अभंग कसे सुचतात हे मला कधी कळले नाही.  मी खूप विचार करायचो.  अमुक एक अभंग त्याला कसा सुचला असेल ?  त्याची गाभ्याची कल्पना त्याला कशी सुचली असेल ?  त्याच्या अभंगांचे मूळ विठ्ठल होता का ‘तुका’ होता ?  काही विचार सुचला की त्याचा अभंग तयार होतो की काही प्रसंग पाहून त्याला अभंग सुचतो ?  मीही एखादी उत्कट भावना मनात येऊन अभंग करायचो.  मग पुढचे कित्येक दिवस थंड जायचे–कधी महिनेही.  त्याच्या डोक्यात एवढे अभंग कसे येतात हे कळत नसे.  एखादी मधमाशी जशी भराभरा फुलाफुलांवरून जाते तसे तुकाचे अभंग अनेक वस्तु विषयांवरून मध घेत जायचे.  कुठलाही विषय विठ्ठलाकडे किंवा ‘तुका’कडे तो सहज वळवायचा.  जणू प्रत्येक क्षण त्याला जिवंत होता.  प्रत्येक क्षणाचा अनुभव त्याला निराळा होता.  त्याला विलक्षण उल्हास होता.  उलट, सर्व वस्तु-विषय पुष्कळ काळ मला उदास वाटायचे.  माझे जीवन जास्त धडपडीत जात असूनही माझ्यापेक्षा त्याला जीवनात जास्त कसे दिसते, मला कळत नसे.  जणू त्याला पाहताच जीवन अापल्या अंतरंगाच्या पाकळ्या उघडून त्याच्यापुढे उभे राहायचे अाणि मला पाहताच ते पाकळ्या मिटवून घ्यायचे.

दादा !  तुझे अभंग वाचताना वाटे, इंद्राने अापल्या अप्सरा-किन्नर-गंधर्वांसह वरात काढली अाहे.  किंवा एखादा सम्राट, अलंकारांनी नटलेल्या अापल्या सुंदर-सुंदर स्त्रियांसह, सजवलेले हत्ती, पालख्या, घोडे, यांच्यासह मिरवणुकीने जात अाहे.  तुझे अभंग वाचून अोवरीवरून बाहेर अालो की वाटायचे, सर्वत्र इंद्रधनुष्ये पडली अाहेत.  तुका !  देहूचा हा कुरूप परिसर तुझ्या काव्याने तू सुंदर केलास.  येथील गवतकाडीला, पक्ष्यांना तू अक्षरांत अक्षय कोरून ठेवलेस.  येथील माणसे तू अजरामर केलीस.  तुझ्या कवित्वामुळेच देहूगाव कधी लहान वाटले नाही.  येथील राने तू अरण्ये केलीस.  येथील चिमण्या, पोपट, कावळे तू गरूड केलेस.  येथील डोंगर हिमालय झाले अाणि इंद्रायणीला तू गंगेचे भव्य रूप दिलेस.  येथील गाई तुझ्या काव्याने कामधेनू, नंदिनी झाल्या; येथील बैल नंदी झाले.  अापल्या छोट्या घराची छोटी अोवरी, अानंदअोवरी झाली अाणि अापले वडिलार्जित देऊळ तू पंढरपूर केलेस.  तुझ्या अभंगाचे शब्द अाणि टाळमृदुंगाचे नाद देहूगाव अोसंडून भुवनत्रयात निनादले.

पुढे तुका पंढरपूरला अाषाढी वारीला जाऊ लागला.  पंढरपूरच्या वारीला जाऊन अालेला प्रत्येकजण स्वतःला धन्य मानतोच.  पण तुका जेव्हा वारी करून अाला अाणि त्याने अापले अभंग लिहिले अाणि मी ते वाचले तेव्हा त्याच्याहून मलाच धन्य वाटले.  मला वाटले, अापणच वारी करून अालो.  पंढरपूरचा देवळाचा कळस दिसताच अापणच धावत सुटलो.  अापणच इंद्रायणीत स्नान केले.  अापणच विठ्ठलाकडे अनिमिष पाहत उभे होतो.  अापणच गरूडखांबाला मिठ्या मारल्या, सभामंडपात अानंदाने रडत लोळण घेतली.  संतसंगतीत विठ्ठलनामाचा कल्लोळ अापणच केला.  अापणच अबदागिरी अाणि पताका फडकावीत गदारोळात चाललेल्या दिंड्यांतून वेडे होऊन हिंडलो.  अाणि पंढरपूर सोडताना माहेर सोडावे तसे दुःख अापल्यालाच झाले.

पण दादा !  एकदा जेवहा तुला वारीला जाता अाले नाही अाणि वारीला निघालेल्या लोकांबरोबर वेशीपर्यंत जाऊन तू विठ्ठलाला निरोप दिलेस अाणि त्याहूनही जेव्हा वारीला गेलेल्यांचे परत येण्याचे दिवस अाले तेव्हा तू वेशीवर जाऊन बसू लागलास अाणि ते अाल्यावर तू ज्या तऱ्हेने त्यांना तगमगून मिठ्या मारल्यास, त्यांच्या पायांशी लागलास अाणि विठ्ठलाबद्दल विचारून अभंग रचलेस, ते वाचताना मी अक्षरशः रडलो.

|| ३१ ||

तुकाला शोधता हाही दिवस मावळला.

बहिणाबाईचा नवरा उठला.  त्याची सावळी त्याच्याबरोबर लांब होत दूर पडली.  निघू या, रात्र पडेल, तो म्हणाला.  एकट्या ठेवून अालेल्या अापल्या तरुण बायकोची त्याला अाठवण झाली असावी.  सहसा बायकोला एकटे सोडायचे नाही हा त्याचा लौकिक होता.  दिवसभर रान हिंडून तो थकलाही होता.  सारेच थकलो होतो.

अाम्ही डोंगर उतरून नदीशी येईपर्यंत काळोख झाला.  मला नदीकाठी एकटे बसावेसे वाटले.  नदीशी येताच माझ्या तिघा सोबत्यांना मी घरी जाण्यास सांगितले.  बहिणाबाईचा नवरा व मंबाजी जाण्यासाठी वळले.  रामेश्वरभटाने माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटले,

“कान्होबा !  तूही चल, तूही थकला अाहेस.”

मी म्हटले,

“येतोच मागोमाग.”

सायंप्रकाशात रामेश्वरभटाने अापल्या शांत डोळ्यांनी माझ्या डोळ्यांशी टक लावली अाणि म्हणाला,

“ठीक अाहे.  अाम्ही तिघे देवळातच झोपतो.  उद्या लगोलग शोध सुरू करता येईल.  तूही तिथेच ये झोपायला.  इथे फार वेळ काढू नकोस.”

माझ्या खांद्यावर थोपटून तो गावाकडे चालू लागला.  या मन:स्थितीत मी एकट्याने अवेळी नदीवर बसू नये असे त्यांना वाटत होते.

पण थोडा वेळ तरी मला स्वत:शी बसायला हवे होते.  तिघे गावाकडे गेल्यावर मी पुन्हा अामच्या बालपणीच्या कातळाकडे वळलो.  का न कळे, अाज सारखे तिथे बसावेसे वाटत होते.  तुकाचे मन मला कधी नीट कळले नव्हते.  त्याचा बसून मला शोध घ्यायचा होता.

वाईट एवढेच की, मी तर्क सोडून भावनाविवश होत होतो.  कातळावर येऊन बसल्यावर मी मनात म्हटले, दादा !  कुठे लपला असशील तर अाता हळूच ये !  अापण दोघेच इथे अाहोत.  पूर्वीसारखे मनातले बोल.  ते जगाला कुणाला कळणार नाही.  अरे, इंद्रायणीवर अंधार उतरला अाहे.  पक्षी घरट्यांत गेले अाहेत.  माकडे झाडावर गुप्प झोपली अाहेत.  अाकाशात चांदण्या चमचमत अाहेत, पण त्या फार दूर अाहेत.  तू लिहिले अाहेत तसे देवाचे, तुझे अाणि माझे राज्य अाहे.  लबाडा !  तू लपला अाहेस ना ?  खरे बोल !

माझे डोळे पाण्याने भरून अाले.  मी म्हटले, दादा !  या कातळावर म्हणजे अापल्या बालपणावरच मी बसलो अाहे.  तू पहिले काव्य केलेस ते कृष्णाच्या बाललीलांवर.  चोरा !  तू नदीवरच्याच अापल्या बाललीला त्यात घातल्या की नाहीस ?  बोल !  त्या बाललीलांनीच तुला काव्याबद्दल अात्मविश्वास दिला.  कालियामर्दनाचे तुझे पहिले अभंग इथलेच.  त्यात या इंद्रायणीतल्याच सुसरींना तू कालिया केलेस.  खरे ना ?

तेव्हाचे तुझे काव्य निर्लेप कविता होती.  पुढे तिच्यात अहंकार शिरला, तो मला अावडला नाही.  अरे !  एकेक अहंकाराचे अावरण सोलीत तू अालास अाणि हे नव्या अहंकाराचे अावरण का चढवून बसलास ?

तू सालोमालोबद्दल जे अभंग लिहिलेस त्याबद्दल मी बोलतो अाहे.  अाता या अंधारात तू अाणि मी एकटे अाहोत.  तेव्हा मी धीट होऊन बोलतो.  तू सालोमालोला जे बोल लावलेस ते मला अावडले नाहीत.  तो तुझेच अभंग घेऊन त्यांतले ‘तुका म्हणे’ शब्द काढून, ‘सालोमालो म्हणे’ शब्द घालून ते अभंग अापले अाहेत असे सांगत होता.  त्यासाठी दुसऱ्या संतांची वचने मोडून तो अापली भूषणे करीत अाहे, बायकोचे दागिने बुडवून चोर होणारा अाहे, त्याला ताडणाची पूजा हवी इत्यादी दूषणे तू त्याला दिलीस.

सालोमालो दोषी होताच.  पण तू त्याच्यावर चिडल्याने अधिक दोषी ठरलास.  तुला स्वतःच्या काव्याबद्दल अासक्ती निर्माण झाली होती, हा त्याचा अर्थ होता.

मी धीटपणे बोललो याची क्षमा कर.  पण धीटपणा तूच मला शिकविलास.

जे ‘तुका’ नाव काढल्याबद्दल तू रागावलास ते ‘तुका’ मला कोडेच अाहे.  इतर संतांनी तसे नाव घातले म्हणून तू घातलेस का ?  मीही माझ्या अभंगाशेवटी ‘तुकयाबंधू’ म्हणतो.  दादा !  असे नाव घालणे हाही अहंकारच नव्हे का ?  की तुझा ‘तुका’ वेगळा होता ?  ‘तुका’ असे म्हणत तू स्वतःकडे दुरून बघत होतास ?  की ज्याला विश्वंभर बोलवतो अाहे तो निराळाच ‘तुका’ कवित्व करतोय असे तुला दाखवायचे होते ?  की तुका म्हणजे परमात्मा धरायचा ?

तुला शिष्य असते तर तू त्यांच्याजवळ याबद्दल काहीतरी बोलला असतास.  इतर संतांच्या काव्याची चिंता घेण्यास त्यांचे शिष्य होते, पण तू शिष्यही केला नाहीस.

नाही म्हणायला एक बाई कोल्हापुराहून अाली.  स्वप्नात तिने तुला गुरू केले एवढेच.  गेली दोन वर्षे ती येथे येऊन राहिली अाहे.  पण तिच्याशी तू शब्दही बोलला नाहीस.  दुरून ती तुला पाहत असते.  तुझ्या कीर्तनाला कोपऱ्यात अंधारात येऊन बसते.

अाता तुला शिष्यही नाही.  अाणि तू नाहीसा झाला अाहेस.

कवित्व झटकायला तुला दहा वर्षे लागली.  दहा वर्षे तू अापल्या कवित्वाचा अहंकार वाहिलास.  दहा वर्षे तू अनेकांचा दंभस्फोट केलास.  साधू, बैरागी, संत, महंत, संसारी, श्रीमंत, सत्ताधारी–कुणी तुझ्या हातून सुटला नाही.  व्याजबट्टा करणारे, विठ्ठलाचे नाव न घेणारे, सर्वांना तू धरेवर धरलेस.  स्वतःच्या मनात जे जे घडले ते तू निर्भयपणे सांगितलेस.  तुला विषयवासना जास्त होती.  स्त्रीपुत्रा-भावादिकांना तुला सोडता अाले नाही.  लोकनिंदेने तू अस्वस्थ झालास.  पुरेशी भक्ती होत नाही म्हणून हळहळलास, विठ्ठलाला तू शिव्या दिल्यास अाणि कुरवंडीही उतरवून टाकलीस.  लोक माया सोडत नाहीत म्हणून त्यांना अासूड मारलेस.

का ?  हे सर्व तू का केलेस ?  तूच जे शिकवलेस त्यावरून मनात शंका येऊन मी विचारतो अाहे.

|| ३२ ||

अजून मला कातळावरून उठावेसे वाटत नव्हते.

अंधाराचे प्रतिबिंब पडून इंद्रायणीचे पात्र काळे दिसत होते.  ही इंद्रायणी अामची बालपणापासूनची सखी, अामच्या क्रीडांचे स्थान, अामच्या सुखदुःखांची कानोळी, अामची जीवनदात्री अाणि अामची अंतकाळानंतरची विसावा होती.  इंद्रायणी, तू अामचे हसरे चेहरे पाहिलेस, अाता रडवे चेहरे पाहा, मी तिला म्हटले.

माझ्या मांडीखाली एक दगड खुपत होता.  तो काढून मी इंद्रायणीत फेकला.  त्याचा दुब अावाज अाला अाणि मला तुकाने अभंगांच्या वह्या बुडवून जलदिव्य केले ते अाठवले.  तेव्हा त्याने केलेला तो अट्टाहास–तेरा दिवसांचा त्याचा तो निश्चक्र उपवास !  अाणि अभंगांच्या वह्या तरल्य तरच पुढे कवित्व करण्याची प्रतिज्ञा !

त्या वेळी त्याच्या कवित्वाच्या बहरास सुरुवात झाली होती.  अाणि जातीने शूद्र असून वेदांत सांगतो म्हणून त्याला दिवाणीत खेचले होते.  अापल्या कवित्वावर अालेला हा घाला तुकाच्या वर्मी लागला होता.  दिवाणी सुरू झाल्यापासून सर्व गावाने त्याच्याकडे पाठ फिरविली होती.  अाप्तेष्ट बोलत नाहीसे झाले होते.  तुकाने कवित्व सोडावे, जो तो म्हणत होता.  मीही अस्वस्थ झालो होतो.  तुका कवित्व सोडण्यास तयार नव्हता.  सगळ्या कुटुंबावर त्यामुळे अापत्ती अोढवणार होती.

त्या वेळी झालेल्या तगमगीत तुका म्हणाला,

“कान्हा, कुणाच्या दारी न जाता, कुणाचे काही लागत नसता लोक मला का छळतात ?  अरे !  नारायण मेलाय का ?  अाम्ही लोकांना भ्यावे याची लाज त्याला हवी.  अाता कुणीकडे जायचे ?  काय खायचे ?  गावचा पाटील कोपला–अाता मला भीक कोण घालील ?  माझा निवाडा दिवाणीत करणार.  माझा दुर्बळाचा घात होणार.  माझे चित्तच अाता प्रपंचापासून विटले अाहे.”

निवाडा होऊन ठरले की, तुकाने जलदिव्य करावे.  जर मंत्रगीतेच्या अभंगाच्या वह्या बुडल्य नाहीत तर ठीक.  बुडल्या तर तुकाने यापुढे कवित्व करू नये.  गाव सोडावे.

मीच अभंगांच्या वह्या पळसाच्या पानांच्या, केळीच्या पानांच्या अाणि सालीच्या वेष्टनात गुंडाळल्या.  सर्व लोकांसमक्ष मीच त्या तुकाच्या माथ्यावर ठेवल्या.  त्याच्या धोतरात वह्यांवर ठेवायला दगड दिले.  हळूहळू तो पात्रात शिरला.  वह्यांचा गठ्ठा प्रवाहात तळाशी ठेवून त्याने त्यावर दगड ठेवले.  मग नमस्कार करून तो तीरावर अाला अाणि याच कातळावर तेरा दिवसांचा त्याचा निश्चक्र उपवास सुरू झाला.

सगळे गाव तुला पाहायला येत होते.  भोवतालच्या गावचेही येत होते.  डोळे मिटून ‘रामकृष्ण हरि’ म्हणत तू बसला होतास.  त्या वेळी तुझ्या मनात काय होते ?  वह्या तराव्यात म्हणून तू विठ्ठलाला साकडे घालून बसलास.

मग वह्या तरल्या.  जलदिव्यातून सुरक्षित बाहेर अाल्या.  त्या कशा तरल्या कोण सांगणार ?  वर ठेवलेला दगड कासवाने किंवा मगरीने ढकलला किंवा नंतर लोक म्हणू लागले तशा त्या विठ्ठलाने काढून तुझ्यापुढे धरल्या.  दादा !  तुला तेव्हा पहिल्यांदा खूप अानंद झाला, मग खूप दुःख झाले.

तुझा अानंद कवितेच्या वह्या वाचल्या याचा अाणि पुढे कवित्व करायला मिळणार याचा होता.  ज्या विठ्ठलाला तू साकडे घातलेस तो धावून अाला, अापल्या पाठीशी तो अाहे असे, तुला वाटत होते, ते सिद्ध झाले याचा अानंद होता.

तुला दुःख झाले ते देवाला अावाहन केल्याचे.  क्षुल्लक गोष्टीसाठी पांडुरंगाला राबविल्याचे.  तुला वाटू लागले, जनांच्या क्षोभासाठी अापण उगीचच इतका चित्तक्षोभ केला.  ते तेरा दिवस उपवास करून वाडे घातले !  तहान-भुकेचे साकडे घातले.  ते कशासाठी, तर या यातिहीनाच्या अभंगांच्या वह्यांसाठी.  तू विठ्ठलाला म्हणालास, ‘पांडुरंगा !  अापले ब्रीद तू खरे केलेस !  पण मी काय केले ?  कोणत्या गोष्टीसाठी मी संसारातून बाहेर पडलो अाणि हे काय करीत बसलो ?  माझ्य अाईवडिलांच्या मृत्यूच्या दुःखाचे काय ?  माझी पत्नी अन्नअन्न करीत मेली त्या दुःखाचे काय ?  ते सारे विसरून अभंगांसाठी तुला कष्टविले.’

दादा !  कवित्वही क्षणभंगुर अाहे याची चुणूक त्या वेळी तुला येऊन गेली होती.  त्या वेळी तू कवित्व सोडले असतेस तर काय बिघडले असते ?  तुझ्या उत्कृष्ट कवित्वाला अाम्ही मुकलो असतो इतकेच.

नदीवरच्या त्या अंधारात तुका शेजारी नाही याची तीव्र वेदना होऊ लागली.  तो खरा काय होता हे थोडे थोडे कळू लागल्यावर अाता तो सापडावा, म्हणजे काय मजा येईल !  या कान्ह्याला अापण कळलो नाही असे तर त्याला वाटले नसेल ना ?  या कल्पनेने मला कापरेच भरले.  नाही, नाही, माझा तुकादादा अशी समजूत करून घेणार नाही.

दादा !  तू म्हणत होतास ते खरेच अाहे.  हा प्रपंच खोटा अाहे.  येथील सर्व खोटे अाहे.  पाहा !  तुझा सहवास अाहे म्हणताम्हणता चाळीस वर्षे गेलीही अाणि अाणखी पंधरा-वीस-पंचवीस वर्षंत अापल्यापैकी कुणी राहणार नाही.  जसे बाबा होते, अाई होती असे म्हणताम्हणता दोघे गेली.  सावजी गेला.  सगळे जाण्यासाठीच अाले.  कुठून अाले ?  कुठे गेले ?  या विचारानेच तू वैतागलास.  तुझा मागचा अट्टाहास याचसाठी होता.

तरी दहा वर्षे तू कवित्वात रमलास.  तो मार्ग पुरा धुंडाळायचा, असे तू ठरवले असावेस.  अाईबाबा कुठे गेले हे शोधण्याचा तो एक प्रयत्न तुला वाटला.

|| ३३ ||

अभंगांच्या वह्या तरल्यावर तुकाच्या प्रतिभेला वर्षाऋतूतील प्राजक्ताचा बहर अाला.  या तुका-प्रजक्ताखाली अभंगाचा सडा पडू लागला.  मी त्यांचा वेचक, वेचताना थकू लागलो.  त्या अभंगांचा सुगंध अजून माझ्या मनात दरवळतो अाहे.

त्याला अाळशी म्हणत होते ते मूर्ख होते.  त्यांना त्याच्या कवित्वाचा प्रचंड उद्योग कळत नव्हता.  जे त्याला टाळ कुटीत बसतो म्हणत ते अडाणी होते.  त्याची तन्मयता त्यांना कळत नव्हती.  महाजनाचा मुलगा असून तो लोहार, सुतार, गवंडी असल्यांशी संगत करतो, त्यांच्या हाताखाली मजुरी करतो, लोकांची शेते राखतो, असे म्हणणाऱ्यांना ‘कष्टाचेच खायचे’ हा त्याचा निश्चय ठाऊक नव्हता.  जे सावकारी सोडल्याने त्याला अव्यवहारी समजत होते ते स्वत: अव्यवहारी होते.  तो त्याहून मोठ्ठी अशी विठ्ठलाची मिराशी चालवीत होता हे त्यांना उमगले नाही.  सर्व देहूत तो सर्वांत उद्योगी होता.  जीवन भरभरून जगत होता.  परमेश्वराने दिलेल्या मर्यादित अायुष्यातला क्षण नि क्षण वाजवून घेत होता.  तो विठ्ठलाशी सावकारी करीत होता.

दादा, तुला अाळशी म्हणणाऱ्यांना हे कळत नव्हते की, असा एखादा जन्माला येतो, जो संसाराचे वैयर्थ्य जाणून नवीन जीवन अाणण्याचा यत्न करीत असतो.  असा एखादा येतो, ज्याला वाटते, अापण कुणी विशेष अाहेत अशा भ्रमात असणाऱ्या माणसांचा भ्रमनिरास व्हावा.  असा एखादा असतो, ज्याला माणसाच्या विश्वाशिवाय दुसरे एखादे खरे सुखी विश्व असेल अशी श्रद्धा असते.  असा एखादा असतो ज्याला माणसांच्या अहंकारातून निर्माण झालेले धर्म, जाती, वर्ण, असले भेद खोटे वाटतात.  त्याला असे वाटते की, धनसंचय, सत्ताभिलाषा, सुखविलास, या गोष्टी असल्या काय किंवा नसल्या काय !  तो एखादा तू होतास हे त्यांना कळत नव्हते.

|| ३४ ||

वह्या इंद्रायणीतून तरल्या अाणि तुकाला होणारा विरोध संपला.  तो अाता ‘देवां’ना मान्या झाला.  त्याला मान्यता देणाऱ्यांना त्याचा खरा धोका कळलाच नव्हता.  हे संसारी जग उलटेपालटे करण्याची त्याची मनीषा होती.  कदाचित तुकाची ही कल्पना त्यांना ठाऊकही असेल.  पण संसार वमन मानण्यास कुणी तयार होणार नाही, हेही त्यांना ठाऊक होते.  तुकाला विरोध करणारे अाता उलट त्याच्या भजनी लागले.  त्याच्या कीर्तनाला येऊ लागले.  त्याचे अभंग कौतुकाने गाऊ लागले.

त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी तुकाला परंपरेच्या दावणीत गुंतवायला सुरुवात केली.  तुकाला ते कळले का ?

कळले असावे.  कारण तुकाच्या कवित्वात फरक पडू लागला.

तोंडात तंबाखूची नळी असलेले संत, जटाधारी, भगव्या वस्त्रांतील संन्यासी, कानफाटे, मलंग, शेंडीत दर्भ ठेवणारे शास्त्री, गोसावी, शाक्तपंथी, कथेची विक्री करणारे कथेकरी इत्यादी सर्वांच्या ढोंगावर अाधी त्याने कोरडे अोढले होते.  अाणखीही तुकाचे अनेक संताप होते.  ते टाकून तुका अाता स्वतःचे शोधन करू लागला.  तळमळीने तो स्वतःची तळमळ सांगू लागला.  अापल्यातले दोष स्पष्ट बोलू लागला.  अापल्या पापांना सीमा नाही म्हणू लागला.  विठ्ठलाला म्हणू लागला, “तू स्वप्नतसुद्ध माझ्या डोळ्यास पडत नाहीस.”  तो विठ्ठलाशी नाते जोडू लागला.  म्हणू लागला, “िठ्ठल !  मला मोकललेस तर मी वाया जाईन.  मी अवगुणांचा भारा झालोय.  इंद्रियांच्या अधीन झालोय.  माझ्या मीपणावर पाषाण पडो.  माझ्या वाणीचा मला फार अभिमान झालाय.  मला तुझे नाव घेण्यासाठी एकांत हवाय.  तू लोक मला टाकतील असे कर.  माझ्या गावचे मला कुणी भेटत नाही.”

त्याचे कवित्व अाता या तऱ्हेचे होऊ लागले.

मग त्याची साधकदशा सुरू झाली.  अंतरी गोपाळ स्थिरावला अाहे असा विश्वास त्याला येऊ लागला.  “लोकलाग सोडली पाहिजे,” तो म्हणू लागला, “निंदास्तुती सारखीच वाटते.  उपचारांचा कंटाळा अालाय.  मना, मायजाळी गुंतू नको.  मी विठोबाचा दास झालो–धन्य झालो.  जिथे मी जातो तिथे तो माझा सांगाती अाहे.  संतांचे माझ्यावर फार उपकार अाहेत.  ते मला नित्य जागे ठवतात.”

मग तो स्वतःचे पराकोटीचा अवस्थेतले अनुभव सांगू लागला.  “सुखाचे घडलेले श्रीमुख मला दिसले.  अमूर्त मूर्ती मधुसूदन मी समचरण पाहिले.  मागे परतून न पाहता मी क्षणाक्षणाचा काळ जिंकीत गेलो.  सर्व दिशा शुभ झाल्या अाहेत.  संतांच्या संगतीत ब्रह्मरसाचे भोजन चालू अाहे.  अाता मला नेहमी सण, नेहमी दिवाळी अाहे.  जन्ममरणाचा धाक उरला नाही.  अात हरी, बाहेर हरी अाहे.  मीच मला विऊन माझ्या पोटी अालो अाहे.  सगळे जन देव झाले.  दोषगुण हरपले.  भुवनत्रय हाच अामचा स्वदेश.”

दादा !  दहा वर्षे मी तुझे हे अनुभव, तुझ्या प्रचीती, तुझा उपदेश वाचीत अालो, ऐकत अालो.  तुझ्या अभंगांतले शब्द कळूनही कित्येकदा अर्थ कळला नव्हता.  तुझ्या बोलण्यातला अाशय कळूनही कित्येकदा उमगला नव्हता.  तू अध्यात्मात खोल बुड्या मारीत होतास अाणि लहानपणी मी डोहाच्या काठावर बसून तुझ्या बुड्या पाहत विचारीत होतो, दादा !  तळ लागला का ?  श्वासासाठी धडपडत पाण्यावर मान काढून, चूळ टाकत तू ‘नाही–नाही’ मान हलवीत होतास.  तसेच मला अाताही वाटत होते.  कित्येक जागी तू ‘सापडले–सापडले’ अोरडत, दोन्ही हात वर करून, मुठी उघडत होतास अाणि मूठ मोकळी होती.  कित्येकदा काही हातात येत होते व मला ते कळत नव्हते.

अशी दहा वर्षे मी तुझ्य काव्यात डुंबलो.  माझा अानंद होता तो जेवणाऱ्याचा होता.  दादा !  तू स्वयंपाकी होतास, साधकतेचा स्वयंपाक करताना, चूल फुंकून तुझे डोळे किती लाल होत होते.  शेकामुळे तोंड किती भाजत होते.  गरम भांड्यांचे बोटाला किती चटके बसत होते.  मला कळत नव्हते.

अधूनमधून बहिणाबाईच्या गाईसारखा एखादा प्रसंग घडून तुझ्या परानुभूतीचे प्रत्यंतर मिळत होते.

|| ३५ ||

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट.

कानावर अाले की बहिणाबाई बहिणाबाई म्हणून कुणी एक बाई कोल्हापूरहून अाली अाहे.  तुकाने स्वप्नात येऊन अापणास गुरुमंत्र दिला असे ती सांगत अाहे.  ती नवऱ्याला घेऊन अाली अाहे अाणि तिचा वृद्ध नवरा फार संशयी अाहे.  एकदा त्याने तरुण कीर्तनकाराच्या कीर्तनास ती गेली म्हणून संशय घेऊन तिला पोत्यात घालून खूप हाणामार केली.  पुढे तिची सेवा करून त्यानेच तिला बरे केले.  तिची श्रद्धा पाहून तो निवळलाही.  म्हणे ती कविता करते अाणि तिने एक गाय पाळली अाहे.  बिछान्यातसुद्धा ती तिच्या शेजारी झोपते.

बहिणाबाई देहूला तुकाच्या दर्शनास अाली.  तिच्याबरोबर तिची लाडकी गायही अाली.  ती अाली ती मंबाजीकडे उतरली.  माझ्या मनात अाले, अाता मंबाजी तिला तुका वेडा अाहे, त्याच्या नादी लागू नको, माझे शिष्यत्व पत्कर असे सांगणार.  त्या वेळी मंबाजी तुकाचा हेवा करू लागला होता.  तो मला कधी फारसा अावडलाही नव्हता.  अध्यात्माचा धंदा करणाऱ्यांपैकी तो होता.

मंबाजीने खरोखरीच बहिणाबाईला शिष्य होण्यास सांगितले.  पण तिने तुकाचा हट्ट सोडला नाही.  तेव्हा त्याने शिवीगाळ करून तिला बाहेर काढले.  मग बहिणाबाई एका ब्राह्मणाकडे उतरली.  तिथेही तिला व त्या ब्राह्मणाला मंबाजीने त्रास दिला.  मग एकदा बहिणाबाईची गाय त्याच्या अंगणात अाली तेव्हा मंबाजीने तिला कोंडून काठीने बेदम मारले.  दादा !  ते तुला कसे कळले ?  पण रात्रभर तू वेदनांनी कण्हत होतास.  सकाळी गाईच्या पाठीवरचे काठीचे वळ तुझ्या पाठीवर दिसले.

परजीवासी झालेले तुझे तादात्म्य, दादा !  मला शिरसावंद्य अाहे.  या सृष्टीतील प्राणिमात्राशी तू एकरूप झाला होतास.  जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडलेल्या सर्व प्राणिमात्रांची एकजुटीने परमेश्वराविरुद्ध तुला फळी उभी करायची होती.

तुझ्या पाठीवरचे वळ लोकांनी चमत्कार म्हणून घेतले.

बहिणाबाईच्या गाईचे वळ तुझ्या पाठीवर उठले, त्याहूनही मोठे वळ लोहगावला अविंधांनी जे अत्याचार केले ते पाहून उठले.  तेव्हा तुझे मन भयंकर कासावीस झाले.

लोहगावची ती अाठवण माझ्या मनावर नित्याची कोरलेली राहिली अाहे.

|| ३६ ||

तू लोहगावला कीर्तनाला गेला होतास.  नेहमी लोहगावकर तुला बोलावीत.  तुझ्या पहिल्या बायकोचे ते माहेर होते अाणि तुला त्या गावाबद्दल विशेष प्रेम होते.  तेथील लोकही तुला मानीत.

तू तिथे गेल्यावर तिथे अत्याचार झाल्याच्या बातम्या अाल्या.  अविंधांनी लोहगावला वेढा घातला अाणि सरसहा कत्तल अाणि अत्याचार अाणि लूटमार केली.  त्या बातम्या ऐकून मी हबकूनच गेलो.  मी तुला शोधायला लोहगावला निघालो.  गावाबाहेर पडण्यापूर्वी मी देवळात जाऊन विठ्ठलाला भाकले.  म्हटले, पांडुरंगा !  तू तुझ्या भक्ताला वाचवलेच पाहिजेस.  तू जर त्याला वाचवलेले नसलेस तर बघच !

लोहगावच्या वाटेवरच तू मला भेटलास.  तुझ्या अंगावरचे कपडे फाटले होते.  धुळीने मळले होते.  वीणेची तार हुटून लोंबकळत होती.  कपड्यांवर रक्ताचे डाग होते.  वीणा वाकडीतिकडी लोंबत होती.  चेहरा पांढरा पडला होता.  हातांत चिपळ्या होत्या.  बोटे सवयीने हलत होती.  अोठांत तू ‘विठ्ठल विठ्ठल’ पुटपुटत होतास.  तुझे शोक जात होते.

धावत पुढे होऊन मी तुला धरले अाणि सावरीत अाणू लागलो.  वाटेत एक झोपडी लागली.  तिथे तुला नेले.  बरोबर भाकर होती ती सोडली.  पाणी मागून घेतले.  तुला चार घास खायाला लावून पाणी पाजले.

हळूहळू तू बोलू लागलास,

“कानहा !  केवढा अाकांत झाला !  डोळ्यांना पाहवत नव्हता.  अविंधांच्या सैन्याने लोहगाव वेढले अाणि सरसहा कत्तल सुरू केली.  त्या वेळच्या पीडेने माझे हृदय विदीर्णं झाले.  काय उच्छेद मांडला दुष्टांनी !  स्त्रियांवर अत्याचार केले, मुले कापली, घरांना अागी लावल्या.  हे लोक कुठून अाले ?  हे एवढे क्रूर का ?  त्यांच्या देवाधर्माची त्यांना भीती नाही ?  दुसऱ्यांना मारावे, लुबाडावे हा धर्म कुठला !  त्यांना कुणीतरी सांगा रे !  कुठलंच ऐश्वर्य अाणि विलासभोग टिकणारे नाहीत.  सारी माया अाहे.

“कान्हा !  पापावाचून पाप वर येत नाही.  हे अामचेच पाप म्हणावे काय ?  विठ्ठल !  अाता हरीचे दास असतील तिथे तुझा वास घडतो असे अाम्ही कसे म्हणावे ?  माझ्या मरणाला मी भीत नाही.  पण लोकांचे दुःख केवढे !  पांडुरंगा !  अाम्ही लोकांना सांगतो, जिथे तुझे नामोच्चारण चालते त्या ठिकाणी काळिकाळालाही येता येत नाही.  अामचे ते बोल तू वाया केलेस.  भजनात अाक्षेप हेच मरण.

देवा !  ज्या स्थळी अाघात नाही तिथे मला नेऊन ठेव.  पायरी व प्रतिमा एका दगडाचीच.  पण त्यांचे महत्त्व वेगवेगळे.  फिरंग्याची शस्त्रे अाणि खिळे दोन्ही लोखंडाचे, पण त्यांचे गुणमोल निराळे.  या तऱ्हा संतजनांना नाहीत.  अाम्ही दोन्ही सारखेच मानतो.  कान्हा !  मी मनाला सांगतोय, हा अाघात इतर अाघातांसारखा मायाच अाहे.  लोकांत चालतेय ते पाहू नकोस.  त्याचे दुःख करू नकोस.

“अविंध येवो, कुणी येवो, अाम्ही हरीचे दास काळिकाळाच्या वर असहोत.  अविंध येतील-जातील.  पण अाम्ही विठ्ठलाचे नावे घेत राहिलो तर अक्षय होऊ.  ही सारी माया अाहे हे अोळखण्यात विश्वातील अाम्हा हरिदासांची शक्ती अाहे.  या मायाबद्ध जगाला अामचे कूसही वाकडे करता येणार नाही !”

|| ३७ ||

लोहगावच्या अत्याचारांनंतर तुका अधिक अंतर्मुख झाला.  काहीसा खिन्न असा तो नेहमी विचारात दिसू लागला.  त्याच्या तोंडची भाषा बदलली.  त्याला सर्व तऱ्हेचे संशय येऊ लागले.  तो मला म्हणाला,

“कान्हा !  मी जी अक्षरे जोडतो त्याने माझे काय पुरे होणार ?  मी तर माझे सर्वस्व पांडुरंगावर सोपवले अाहे.  त्याचा पुढे काय विचार अाहे कळत नाही.  अक्षरांना मी कंटाळलो अाहे.  नामदेवाने स्वप्नात येऊन सांगितले त्याप्रमाणे मी माझे कवित्व सुरू केले.  स्वप्नात राजा झाल्याने सुख होत नाही तसे अाता या कवित्वाने मला सुख होत नाही.  माझ्याभोवती संतजन माझे कौतुक करीत जमतात त्याची मला लाज वाटते.  कारण माझ्याशी त्यांना द्यायला काही नाही.  मी अज्ञ अाहे.  मी फक्त रसाळपणे वाणी वदवली, पण गोवाऱ्यास जेवढा गाईंपासून लाभ, तेवढाच लाभ मला कवित्वातून झाला अाहे.

“मी अक्षरांत गुंतून पांडुरंगाला विसरलो.  माझ्या अक्षरांत तेवढा तो उतरतो, पण मनातला जातो.  पांडुरंगाने कृपा केली नाही हे माझे मला कळते अाहे.  हा माझा वाढता लौकिक चंदन लावण्यासाठी पोटशूळ उठवावा तसा अाहे.  त्या चंदनाचे काय सुख ?  मी बहुरूपी बनलो अाणि माझ्याच मार्गात खोळंबा अाणला.  नारायणा !  हे ऐकत असशील तर अाता तरी उडी घाल.

“अरे; अाधीच मी हीन जातीचा.  त्यांत संतांनी स्तुती केली.  मला गर्व चढला.  ही स्तुती माझ्या अक्षरांची होती, मी काही साधल्याची नव्हे.  कान्हा !  यापुढे सर्व लौकिक गोष्टी मी सोडणार अाहे.  मी ‘रामकृष्ण हरि’ जपत राहणार, मग काय होईल ते होवो.  कवित्व हेही लौकिकच अाहे हे माझ्या ध्यानात अाले नाही.  पांडुरंगा !  मला कवित्वात बुडालेला पाहून तू हसत असशील.  जसा एखादा कृपणलोभी माणूस होनावर होन ठेवून चळती रचत राहतो तसे मी अभंग रचत गेलो.  मी म्हणत राहिलो, हा विश्वंभर माझ्या तोंडून बोलतो अाहे.  केवढा हा माझ्या अहंकार.  अभंगांच्या वह्या बुडवल्या तेव्हा अहंकारानेच मी उपवास केला.  त्या वेळी वह्याबुडालेल्या राहिल्या असत्या तर तरलो असतो.”

रोज-रोज तुकाची तगमग वाढू लागली.  मागे फिरता येत नाही, पुढचाही मार्ग कळत नाही अशा प्रवाशासारखी त्याची अवस्था झाली.  तो अाता सारखा देवळात बसू लागला.  मी तिथे त्याला जेवण अाणू लागलो.  तापाने फणफणलेल्या मुलाच्या अाईप्रमाणे मला वाटू लागले होते.  तुकाच्या थोड्या यातना अापल्याला घेता अाल्या तर ?  पण अहंकाराचा अाणखी एक पापुद्रा तो सोलून काढीत होता.  त्याच्या त्या यातना होत्या.  त्या त्यानेच भोगायच्या होत्या.

तसे असेल तर नवल नव्हते.

|| ३८ ||

काही महिने गेल्यानंतर तुकाने अापल्या बायकोला उद्देशून अभंग केले.  त्यांत त्याचा कवितेबद्दलचा अहंकार गेलेला होता.  अभंगांतून बोलण्याची सवय लागल्यानेच त्याने अभंगांतून सांगितले असेच मला वाटले.  ते त्याच्या सर्व कवित्वात प्रांजळ अभंग होते.  तुकाला सारे कळत होते, याचे प्रत्यंतर त्यांत होते.  पूर्वी अनेकदा त्याची बायको चिडली, रागावली होती.  अनेकदा तिने, बाईने देऊ नयेत अशा शिव्या नवऱ्याला दिल्या होत्या.  सावजीच्या बायकोने हे का केले नाही ? — माझ्या मनात अाले होते.  लग्न झाल्यावर बायकोची दृष्टी फक्त संसाराकडे असते.  त्यातल्या अपेक्षा पुऱ्य झाल्या नाहीत की त्या नवऱ्याला अाणि त्यांच्या मित्रांना नावे ठेवतात.  नवऱ्यांच्या दोषापेक्षा मित्रांचाच दोष त्यांना अधिक वाटतो.  तुकावर अशा सर्व तऱ्हेने बायको संतापत होती.  तिला द्यायची उत्तरे तुकाने अातापर्यांत दिली नव्हती.  ती या वेळी त्याने दिली.  त्यांत सर्व अाले होते.  तिची साथ त्याला शेवटीही हवी होती.  तो विलक्षण तऱ्हेने तिच्या मोहात होता.

तुकाचे बायकोवरचे प्रेम गमतीचे होते.  ती अनेकदा संतापात बोलली तरी त्याने अापला शांतपणा सोडला नव्हता.  दोन बायकांत अापण वागवण्यात फरक केला याचे त्याला खात असेल.  तिला दारिद्र्याचे चटके सहन करावे लागले याचेही त्याला दुःख होते.  या वेळी त्याने तिला समजावले होते,

“बाई !  माझे संचितच वाईट.  जे जे अातापर्यंत झाले ते देवानेच केले.  मला त्यानेच भिकारी करून सोडला.  माझी पाठ त्याने सोडली नाही.  त्यानेच अापल्याला जेवायला पाने अाणि पाणी पिण्यास भोपळा घ्यायला लावला.  त्याला करुणा नाही.  तो नागवणा अाहे.

“पण अंती कल्याणकर्ता तोच अाहे.  त्याचा माग सोडता कामा नये.  अापल्या बाळांची चिंता करू नको.  ज्याने त्यांस निर्माण केले, त्याने त्यांची सोय केली अाहे.  पुढच्या जनमीचा गर्भवास चुकवायचा असेल तर माझी साथ कर.  माझ्याप्रमाणे हा विठ्ठलाचा माग घेऊन अापला गळा सोडवून घे.  जर माझी चाड असेल तर चित्त वाड कर.  तू असे समज, गुरे मेली, भांडी चोराने नेली, लेकरे झालीच नाहीत.  मन वज्रासारखे कठीण करून अास सोड.  इथले किंचित सुख थुंकून टाक.  त्यामुळेच तुला परमानंद मिळेल.  माझ्याबरोबर चल.

“मला हे संसारसुख का अावडत नाही हे तुला तू मायेने अांधळी झाल्यामुळे कळत नाही.  माझी भूकतहान निश्चल झाली अाहे.  चंचल मन खुंटले अाहे.  लोकांना द्रव्य अावडते, मला ते दगडाहून क्षुल्लक वाटते.  मला सोइरे, सज्जन अाणि वन सारखीच वाटू लागली अाहेत.  पांडुरंग माझ्या जवळ अाहे.

“गुरुकृपेने मी हे बोलतो अाहे.  त्यातले हित समजावून घे.  सत्यदेवाने माझा अंगीकार केला अाहे.  अाता दुसरा विचार नाही.  अाता तूही कास मारून घट्ट कर अाणि माझ्याबरोबर चल.  मी तुला अशा अानंदाचा ठेवा देईन की सर्व दागिने त्याच्यापुढे तुच्छ वाटतील.

“माझे ऐकशील तर दोघांना सुख होईल.  देव अाणि ऋषी सोहाळे करतील.  मानाने रत्नजडित विमानात बसवतील.  गंधर्वांचे गाणे, नामघोष होईल.  संतमहंतादिक अापल्याला सामोरे येतील.  त्यांना अालिंगून, त्यांच्या पायांवर लोळण घेऊन अापण पुढवर पांडुरंगाकडे जाऊ.  त्या सुखाचे वर्णन काय करू ?”

दादा !  तू हे तुझ्या बायकोला सांगितलेस.  मीही तुझा भाऊ होतो, माझी बायको तुझी वहिनी होती.  पण तू अाम्हांला येण्यास सांगितले नाहीस.  हा भेदभाव तुला शोभला का ?  अरे !  माझी पण तयारी होती.  संसाराला मीही कित्येकदा विटलो होतो.  अाणि एवढेच सांगतो, तुझ्या तगमगीबद्दल मी जेवढा हळवा होतो तेवढे तुझे संत-मित्रही नसतील.  ते तुझे अभंग तेवढे म्हणत राहिले.  अाणि तुला अभंगलेखन हीसुद्धा माया वाटू लागली हे त्यांना कळलेही नाही.  मी पराकोटीला पोहोचलेला नसेन, तरी तुझ्यामुळे अधूनमधून त्या वाटेवर पाऊल ठेवले होते.  दादा !  तू मला कसा विसरलास ?  मी संसाराच्या वमनात राहणार असे कसे तू धरून चाललास ?  तुझी माझ्यावरची माया अाटली होती का ?  तुला सगळे सारखे होते, मग असे कसे झाले ?

अाता नदीवरच्या अाकाशाच्या काळ्या पडद्यावर, बालपणी पाहिल्या रामलीलेसारखे त्या वेळचे प्रसंग मला स्पष्ट दिसत होते.  बायकोला लिहिलेले तुकाच्या अभंगांचे कागद वाचून परत कोनाड्यात ठेवून अापण कसे खिन्न बसलो होतो, ते अाठवून नदीवरच्या अंधारात पुन्हा तेवढाच खिन्न झालो.  दादा गेला अाहे या दुःखाहूनही मला ते दुःख जाणवू लागले.

मग मी मनाला समजावू लागलो.  स्त्री ही संसारात जास्त रमत असल्याने दादाने तिला उपदेश केला असेल.  किंवा त्याला अापल्या स्त्रीचा मोह अजून असेल.  किंवा माझा उद्धार करायला मी जास्त समर्थ अाहे असे त्याला वाटले असेल.  कदाचित मी अपरिपक्क अाहे असेही त्याला वाटले असेल.  मी निश्चयाने स्वतःशी म्हटले, दादा !  तू गेला असलास तर मीही निघून पडेन.  लक्ष्मण रामाच्या मागोमाग गेला तसे मी करीन.

माझ्या या निश्चयाने मला बरे वाटले.  शेवटी काहीतरी ठरविले याचे समाधान वाटले.  मी कातळावरून उठलो.  नदीवर बराच वेळ झाल्याचे लक्षात अाले.  रामेश्वरभट अापणास येथे फार वेळ एकटे ठेवण्यास तयार नव्हते, ते अाठवून मी तातडीने घराकडे निघालो.  ते काळजी करतील.

|| ३९ ||

पण घरी अाल्यावर सर्व तऱ्हेच्या चिंतांनी मला परत ग्रासले.  घरात पाऊल टाकताच निजलेली मुले व दोन्ही बायांचे चेहरे पाहून, अापल्याव किती अोझे अाहे हे ध्यानात अाले.  मी मनाशी म्हटले, छे !  छ ! दादा परत यायला हवा.  तो गेला वगैरे स्वप्नातसुद्धा अाणता कामा नये.  दादा परत यायला हवा.  मी संसाराचा सारा भार घेईन.  त्याने अापले भजन निर्वेध करीत राहावे.  मला दिसू लागले, मी दुकानदारी, सावकारी, शेती सर्व करीत संसार व्यवस्थित भागवीत अाहे.  मुले वाढताहेत.  त्यांची लग्ने लावून दिली अाहेत.  मी करीत असलेले कौतुकाने पाहत दादा अभंग करीत सुखाने कालक्रमणा करीत अाहे.  संसारी माणसाची हौस पुन्हा माझ्यात अाली.

रात्रीची जेवणे उरकून मी तीन घोंगड्य शोधून काढून देवळात गेलो.  रामेश्वरभट, बहिणाबाईचा नवरा तिथे झोपणार होते.  मंबाजीही सोबत करणार होता.  मंबाजीने घरून घोंगडी अाणली असेल.  पण त्या दोघांना निजापांघरायल नेणे अावश्यक होते.  देवळातच झोपेन असे सांगून मी घरातून निघालो.  सकाळी उठून पुन्हा अामचा शोध सुरू होणार होता.

देवळात अाम्हा तिघांनाही झोप येत नव्हती.  मूर्तीपुढे लावलेल्या पणतीचा प्रकाश देवळात पसरला होता.  अाम्ही तुकाबद्दलच बोलत होतो.  अाम्ही बोलत असता बहिणाबाईचा नवरा निजायला अाला.  एक शाल अंगाभोवती लपेटून तो बोलणे ऐकत खांबाला टेकून बसला.  बोलण्याबोलण्यात तो म्हणाला,

“माझ्या बायकोला तुकाचे स्वप्न पडले तेव्हा तिला परपुरुषाचे स्वप्न पडावे याचा मला राग अाला.  म्हाताऱ्या नवऱ्याला तरुण बायकोचा संशय येतो तसेच माझे होते.  एकदा मी तिला खूप मारली होती.  तिने देहूस जाऊन तुकाला पाहण्याचा हट्ट घेतला तेवहा तिची कळकळ पाहून मला नाही म्हणवेना.  अायुष्यातला जोडीदार संत होणे फार दुःखकारक.  बैलांनी दोन दिशांनी गाडी अोढावी तसा त्या संसाराचा गाडा अडकून पडतो.”

माझ्याकडे वळून तो म्हणाला,

“अाता तुकामुळे तुमच्या कुटुंबाची अवस्था किती विचित्र झाली पाहा !  तुम्ही अाहात म्हणून गाडा थोडासा तरी रेटला जातोय.  अामची बायकोसुद्धा सांगते, व्यवहार सोडा, विठ्ठलामागे या, संसार ही माया अाहे अोळखा.  मी तिला म्हाणतो, बहिणा !  असे कसे होईल ?  प्रत्येकाने संसार सोडला तर राने भरून जातील, गावे अोस पडतील.  पण रानात संसार सुरू होतील !  मला यांचे कळतच नाही.”

मी निजल्यानिजल्या ऐकत होतो.  मलाही एकदा हेच प्रश्न पडले होते.  पण अाता मी निःशंक होतो.  मला पटू लागले होते की, जगाचे वैफल्या कळालेल्याला संसारात रस न वाटणे हे वाटते तितके चुकीचे नाही.  काय सांगावे, संत जे नवे जग सांगताहेत ते विलक्षण असेलही.  जगाचा अाजचा नश्वर क्रम त्यात उलटलेला असेल.  माणसे त्यात अक्षय होतील.  पांडुरंग त्यांच्यांत असेल.  ती सुंदर होतील, सुंदर वागतील.  पक्षी अापल्या चोचीतून त्यांना धान्या अाणून भरवतील.  गाई अापले पान्हावलेले सड त्यांच्या तोंडात गाळतील.  वृक्ष अापली फळे त्यांच्या पदरात टाकतील.  हत्ती सोंडेने पाणी अाणून त्यांची तृष्णा भागवतील.

मला फार फार वाटले की, तुका या वेळी इथे हवा होता.  अामच्या शंकांना उत्तरे द्यायला हवा होता.  माझ्या लक्षात अाले की, तो भाऊ म्हणून मला परत यायला हवाय तितकाच, तो जो काही मार्ग शोधीत होता तो शोध अपुरा राहू नये म्हणूनही हवाय.  त्या मार्गाबद्दल माझ्य मनात भक्ती निर्माण झाली होती.

अाणि जितकी त्याच्या मार्गाबद्दल भक्ती निर्माण होईल, तितका तो सापडायला सोपा जाईलही असे वाटत होते.

|| ४० ||

अाम्ही विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींना अाडवे झोपलो होतो.  एकदा मी मूर्तीकडे पाठ करून झोपलो, मग तोंड केले.  मी विठ्ठलाकडे टक लावली.  तुकाने या मूर्तीचे ‘साजिरेंगोजिरें रुप’ म्हणून केलेले वर्णन मला अाठवले.  कोटिचंद्रकला, पौर्णिमेच्या पूर्ण कळा, जडित माणकाची खाणी, कोंदणातला हिरा अशा अनेक उपमा अाठवल्या.  तुकाचा ‘उभा विटेवरी, हात कटेवरी’ अभंगा अाठवला.  त्याने वारंवार वर्णन केलेले समचरण अाठवले.  जे सौंदर्य तुकाला दिसले, ते मी पाहण्याचा यत्न केला.  जी ऊर्मी तुकाला अाली ती अाणण्याचा यत्न केला.

पण ते प्रयत्न फुकट गेले.  हरिणाने पक्ष्यासारखे उडण्याचा प्रयत्न करावा इतके ते व्यर्थ होते.  मग गेला महिनाभर तुका जे वैकुंठाचे दर्शन मनाने पाहत होता त्याचे अाकलन तर त्याहून कठीण होते.  दर्शनाचे अभंग म्हणत तो बेभान होऊन बाहेर पडत होता.  त्याला इंद्रायणीच्या पैलतीरी हरी अाल्यासारखे वाटत होते.  त्यांच्या हाती शंखचक्र शोभत होते.  गरुड पंखांचा फडत्कार करून भिऊ नको, भिऊ नको म्हणत होता.  हरी त्याला मेघश्यामवर्ण, चतुर्भुज, वैजयंती माळ गळ्यात असलेला दिसत होता.  दाही दिशा उजळलेल्या वाटत होत्या.

वैकुंठाला जायचे म्हणून तो शेवटचा उपदेश करीत होता.  माझी बोळवण करा म्हणत होता.  बोळवण करून घराला परत जा, तुमचे कल्याण असो, अाशीर्वाद देत होता.  सांगत होता, “अाता हीच अापली शेवटची भेट.  अाम्ही अामच्या गावाला जात अाहोत.  भाविकजनहो !  तार्किकांचा संग टाका.  पांडुरंग स्मरा.  ‘रामकृष्ण हरि’ म्हणा.  तुका अाता विमानात बसलाय.  संतजन कौतुकाने पाहत असता, हा तुका वैकुंठाला गेला अाहे …”

तुकाचा वैकुंठीचा हा टकळा महिनाभर चालू होता.  इंद्रायणीच्या काठी जाऊन विमान येणार या भावनेने तो गातनाचत राहायचा.  पहिल्यापहिल्यांदा अामच्या घरातले कुणीतरी त्याच्या मागोमाग जात असे.  पण नंतर तो तिथे जाऊन परत येतो हे दिसल्यावर मागे जाणे बंद केले होते.

तुकाचे त्या वेळचे ते उत्कट अभंग म्हणत असता झोप केव्हा लागली हे कळले नाही.

|| ४१ ||

तुकाच्या शोधाचा तिसरा दिवस होता.  अाम्ही उठलो तेव्हा दिवस उजाडला होता.

सूर्य अाज निराळा उगवला अाहे का ?  अाकाशात ढग नसून अंधार वाटतोय.  दुष्काळ नसून दुष्काळाची हवा वाटते.  उन्हे वणव्यासारखी तापलेली वाटतात.  अाज दिवस निराळा अाहे.  मला कुत्री रडताना ऐकू तेय अाहेत.  टिटवी अाोरडत अाहे.  अाज घरातला एक रांजण फुटला.  काकवी वाहून गेली.

अाजचा दिवस निराळाच वाटतो अाहे.  कदाचित तो शुभ असेल, चांगला अासेल.  रांजण पिचलेलाच होता म्हणून फुटला.  काकवीला बुरशी अालेली होती.  ती नेहमीच येते.  टिटवी तिच्या अानंदात अोरडत असेल–तिलाही सुखदुःख असतेच.  शुभाशुभ सारे कल्पनांचे खेळ.  उन्हे तापून पडत असली तरी ती शेते तापविण्यास, पिके चांगली येण्यासाठी.

तिसऱ्या दिवशी शोघायला बाहेर पडताना असे काही मनात येत होते.  तुकाला शुभाशुभांचे काही नव्हते.  भूतबाधा, मंत्रतंत्र यांचे नव्हते.  तो सगळा मायेचाच भाग होता त्याला; एक सोपा ‘रामकृष्ण हरि’ जप त्याच्यापाशी होता.  एक साधी, श्यामवर्ण विठ्ठलमूर्ती डोळ्यापुढे होती.  त्याला नवस मान्य नव्हते, उपचार करून घेणाऱ्या देवता मान्य नव्हत्या, सोवळेअोवळे मान्य नव्हते.

मग तो हरवला अाहे म्हणून अशुभ चिन्हे मनात अाणून भीत बसण्याचे कारण काय ?

शोधाच्या त्या तिसऱ्या दिवशी सर्वांअाधी मी इंद्रायणीवर जाऊन पोहोचलो.  मागोमाग रामेश्वरभट, बहिणाबाईचा नवरा, मंबाजी अाले.  पाठोपाठ काही गावकरीही अाले.  एकजण म्हणाला,

“तुका सदेह स्वर्गाला गेल्याच्या वदंता उठल्या अाहेत.  एका गुराखी पोराने म्हणे विमानही पाहिले.  कुणी म्हणतात, तुकाने डोहात उडी घेतली.  कुणी म्हणतात, त्याला मगरीने अोढून नेले.  कुणाचे म्हणणे, तो अापला निघून गेला.”

त्यांची बोलणी मी ऐकत होतो.  मला त्यातले काहीच खरे वाटत नव्हते.  तुका सापडणार एवढेच वाटत होते.  डोहात बुडाल्याची कल्पना काही तरुण पोरांना पटली होती.  ते डोहाकडे बुड्या मारून शोध ध्यायला गेले होते.

मी एकटाच झरझर इंद्रायणीच्या काठाकाठाने निघालो.  गावाकडचा किनारा पुन्हा नीट पाहायचा मी ठरविला.  माझी नजर दोन कातळांतील प्रत्येक खड्डा शोधत चालली होती.  उंच खडकांमागे डोकावत मी जात होतो.  असा अर्धा कोस गेलो नसेन.  दहा हातांवरच्या एका खड्ड्यात मला काहीतरी अोळखीचे दिसले.  मी धावत सुटलो.

खड्ड्यात तुकाची गोधडी नीट घडी करून ठेवलेली होती.  वर त्याचा टाळ होता.  माझे अोठ थरथर कापू लागले.

खड्ड्यात उडी टाकून मी तुकाच्या गोधडीवर अंग झोकले अाणि कोंडलेल्या श्वासात हुंदके देत मी टाहो फोडला,

“दादा !  हे काय केलेस !  अरे, अाम्हांला टाकून गेलास ?  दुःखाने माझे हृदय दुभंगत अाहे.  गहिवर अावरत नाही.  घरी पोरेबाळे अाक्रंदत अाहेत.  तुझी बायको सारखी अश्रू ढाळीत अाहे.  त्यांच्या अाक्रोशाने पृथ्वीसुद्धा फुटेल.  अरे !  तू गेलास तर गेलास, मग अाम्हांला मागे का ठेवलेस ?  तुला ठाऊक अाहे, अाम्हांला तुझ्यावाचून सखा नाही.  तुझ्या वियोगाने अाम्ही पोरके झाले अाहोत.

“म्या चांडाळाने तुला संसारात कष्टवले.  मी योग्यायोग्य न संभाळता तुझ्याशी वागलो.  अाता बोलून काय उपयोग ?

“अाता भ्राता गेला, त्याचे मूळ अाले असे मी समजतो.  अाता मला चिंता नाही.  दादा !  तो जो घरभेद्या वर बसलाय त्याचेच पाय अावळतो.  जेव्हा तो तुझी भेट करवील तेव्हाच त्याचे पाय सोडीन, दादा !  त्याला दाखवीन, मी तुझ्यासारखाच हट्टी अाहे.”

मी ताळ-गोधडी उचलून उराशी गच्च धरली अाणि उडीसरशी खड्ड्याबाहेर अालो.  बाहेर लोक उभे होते.  मला भान नव्हते.  ताळ-गोधडी उराशी गच्च धरून मी गावाकडे धावत सुटलो.  माझ्यामागे सर्व मोठ्याने हाका मारू लागले.  त्या हाका ऐकण्याच्या अवस्थेत मी नव्हतो.

जखमी झालेल्या हरिणासारखा मी वेदनांनी विव्हळत पळत होतो.  जणू माझ्या पोटात रुतलेला तीर तसाच लोंबकळत धावत होता.  या रम्य वनात विहरत असता हा तीर मला का लागावा हे त्या हरिणाला कळत नसेल, तसे हे दुःख मजवर का यावे मला कळत नव्हते.  अापला घात का व्हावा, एवढेच मनात येत होते अाणि हा घात करणाऱ्या विठ्ठलाचा मनात संताप वाढत होता.  बेभान अवस्थेत मी विठ्ठल-रखुमाईच्या देवळाकडे धावत होतो.

देवळात मी अालो कसा, विठ्ठलरखुमाईवर गोधडी व टाळ भिरकावली कशी, मला अाठवत नाही.  विठ्ठलरखुमाईसमोर उभा राहून कमरेवर हात ठेवून मी अोरडलो,

“अरे नष्ट्या नारायणा !  घरबुडव्या, बरा भेटला अाहेस अाम्हांला !  तू अामची विल्हेवाट लावलीस !  काय रे बाबा !  अाम्ही निष्काम राहिलो म्हणून का मनाला येईल तसे अामचे करतोस ?  बोल !  कुठे अाहे माझा भाऊ ?

“बघ तर !  मुकाट्याने माझा भाऊ अाणून दे, नाहीतर तुझ्या धंडीधंडी धंदिड्या उडवीन.  तुझा नाश अारंभीन.  हा प्रसंगच तू मरावे किंवा मी मरावे असा अाणलास.  अाता तुझी भीड न धरता काय करायचे ते करतो.  पाहाच !  तुझे ते भक्तिमुक्तीचे तत्त्वज्ञान जळू दे, अाधी माझ्या भावाला परत अाण.  ऋद्धिसिद्धी, मोक्ष गुंडाळून ठेव.  माझ्या भावाला अाणून पुढे उभा कर.  तुझे प्रसन्न होणे चुलीत घाल !  माझ्या भावाला अाण.  नाही तर तुझ्या डोक्यावर हत्या बसेल !

“माझ्या भावाला लालचीमुळे तू बळकावलास.  पण तुला तो जिरायचा नाही.  अरे !  माझे बळ असे अाहे की तुझे हृदयच फोडीन.  लक्षात ठेव, तू उद्ध्वस्त करीत असताही अामचा संसार मी उभा ठेवला होता.  मी करुणरस गाऊन तुला भुलवीन अाणि माझी वस्तू काढून घेईन.

“तुझी वर्मे, नारायणा !  मला ठाऊक अाहेत.  तरी तू शहाणा होत नाहीस.  मी गरीब अाहे हे ठाऊक असून माझे तू पांघरूण नेलेस.  मला माणसातून उठवलेस.  तुका नेऊन तू अामचा प्राणच नेलास.  तू कृपाबंधू नसून भोंदू अाहेस.  तुला दयामाया नाही.  तू माझी अांधळ्याची काठी न्यावीस !  माझे घर वुडवलेस.  लेकरे दारोदार केलीस.  का बाबा ?  भावाचे निमित्त करून तुझा जीवच घ्यावा असे मला वाटतेय.

“अामच्या पूर्वजांची तू हीच गती केलीस असे कानावर अाहे.  असा अामच्या पाठीस का लागला अाहेस ?  हा जन्मजन्मांतरीचा दावा कशासाठी ?  कसातरी संसार करून अाम्ही पोट भरत होतो.  तर तू देवपण दाखविलेस.  अामचा वंश तू शेवटास अाणलास.  अाम्हा दोघा भावांत अंतर अाणलेस.  अरे !  चांगले लागले म्हणून मुळासकट खायचे ?

“अाता तू माझ्या भावाला अाणण्याबद्दल काही केले नाहीस तर मी इथून हलणार नाही.  मागे झाले ते होऊन गेले.  अाता पुढचा विचार बोल.  माझा भाऊ अाणून दे.”

मी शुद्धीवर अालो तेव्हा घरी होतो.  डोळे उघडून इकडेतिकडे पाहिले.  तुकाची टाळगोधडी उशाशी ठेवलेली होती.  मला कळले की, रामेश्वरभट, बहिणाबाईचा नवरा, मंबाजी यांनी मला बेशुद्धावस्थेत उचलून घरी अाणले.

|| ४२ ||

बाहेर दोन बैलगाड्या जुंपून उभ्या अाहेत.  माझे दोन मुलगे गाड्यांपुढे जोकडे गच्च उभे धरून अाहेत.  बैल उतावीळ झाले अाहेत.

एक गाडी सामानाने भरली अाहे.  दुसरीत माझी बायकामुले बसली अाहेत.  ती तत्पर गृहिणी रांजण वगैरे मातीच्या भांड्यांवर हात देऊन बसली अाहे.  अाम्ही नवराबायको अामच्या मुलांना घेऊन देहू सोडून निघालो अाहोत.  जिथे तुका होता तिथे त्याच्याशिवाय दिवस काढणे होत नाही.  अामच्या मुलांच्या अाजोळाच्या गावी कायम घर करण्याचे अाम्ही ठरिवले अाहे.  तुकाची बायकोही अापल्या मुलांना घेऊन तिच्या माहेरी राहायला गेली अाहे.

घर मोकळे केले अाहे.  नेण्याजोगे सारे सामान गाडीत टाकून झाले अाहे, तरी मी सारखा अातबाहेर करतो अाहे.  काही राहिले का पाहायला जातो असे सांगून मी निदान दहा वेळा तरी घरात गेलो.  पण दर वेळी अात गेल्यावर माझी दृष्टी राहिलेले सामान पाहण्याऐवजी राहिलेल्य स्मृतीच पाहत होती.  अाम्ही कुठे जन्मलो, कुठे हसलो, रुसलो, खेळलो, जेवलो.  तुकादादा कुठे अभंग करीत बसत असे.  सावजी गेला ते.  तुका गेल्यावर तुकाची बायको भिंतीशी कशी शून्य नजरेने बसली होती ते.  अाणि सावजीचे गाठोडे टांगलेले होते ती खुंटी.

असा मी दहाव्यांदा घरात गेलो.  पुन्हा भिरभीर फिरलो.  मग रिकाम्या देवघरा-समोर अालो.  तेथे साष्टांग नमस्कार घातला.  उठलो अाणि शेजारच्या कोनाड्यातील तुकाच्या अभंगांच्या पोथ्यांकडे माझी दृष्टी गेली.  त्या पोथ्थांवरच तुकाची सापडलेली गोधडीची घडी व टाळ ठेवलेला होता.  तो सर्व गठ्ठाच उचलला.  बाहेर पडत, मान वळवून म्हटले, घरा !  रामराम !

मग पोथ्था, टाळ, गोधडी उराशी संभाळीत गाड्यांपुढे गेलो अाणि मुलांना गाड्या हाकलण्यास सांगितले.  देवळाच्या बाजूने गाड्या जाऊ लागल्यावर मुलांना पुढे जाण्याची खूण करून मी देवळात शिरलो.

देवळात जाऊन मी तुकाच्या अभंगांच्या पोथ्या, टाळ, गोधडी सर्व विठ्ठल-रखुमाईपुढे ठेवले.  विठ्ठलाकडे थोडी टक लावली.  मग न राहवून मी लोळण घेतली.  लोळण घेता घेता इतका वेळ अावरलेले डोळे तुकाच्या अाठवणीने अाणि गाव सोडण्याच्या दुःखाने भरून अाले.  अश्रू गाळीत मी म्हटले,

“विठ्ठला !  तुकाने तुझ्यावर लिहिलेली अक्षरे तुला परत करीत अाहे.  हा टाळ अाणि ही गोधडी त्याचीच.  हीही तुला अर्पण.  हा टाळ लोक पाहतील तेव्हा त्यांना कळेल की, जेव्हा संतुष्ट वाटेना तेव्हा तुका मागे वळूनही न पाहता टाळ अाणि कवित्व टाकून गेला.  लोकांना हे कळेल की, कवित्वाचा अहंकारही शेवटी तुकाने केळीच्या सालीसारखा सोलून फेकून दिला.

“पांडुरंगा !  गाव सोडून अाम्ही चाललो अाहोत.  तुका गेला, अाता इथे राहवत नाही.  परवा मी तुझ्यावर संताप अोकला.  पाया पडतो !  क्षमा कर !  अाता राग संपले.  यापुढचे दिवस मी सरळ योगक्षेमात, मुलेबाळे वाढवण्यात घालवणार.  तुका संसाराबाहेर गेला.  मी संसारात चालत येणार; वमनात राहणार.

“विठ्ठला !  तू अाहेस-नाहीस, तुझी कृपा अाहे-नाही हा अाता कसलाच विचार नाही.  तू असशील तर सुखाने तुझ्या घरी अस, मी माझ्या घरी सुखाने असेन.  जरी अामच्या भावांतला मी एकटाच उरलो अाहे अाणि घरदार सोडून निघालो अाहे, तरी तुला दोष देत नाही, तुझ्यावर रागही नाही.

“‘तू कोणत्या गावी अाहेस ?’  तुका तुला विचारीत होता.  तो तुझे गाव शोधायला गेला.  तुझे गाणे गायचे सोडून गेला.  मी तुझे नावच सोडून देत अाहे.  येतो.  रामराम !”

गाड्या निघाल्या.  माझी बायको वळूनवळून मागे पाहत रडत होती.  कन्या सासरी जाताना रडतात.  ती माहेरी जाताना रडत होती.  मुले घाबरीघुबरी झाली होती.  मी मागे वळून पाहिले नाही.  मागे वळून न पाहताच माझे डोळे पाण्याने भरत होते.

|| ३ ||

संध्याकाळचा काळोख उतरताना कित्येकदा अाम्ही तिघे भाऊ इथे बसलो होतो.  सावाजी, तुका अाणि मी.  सावजी चौदापंधरा वर्षांचा, तुका बारा वर्षांचा, मी दहाएक वर्षांचा असेन.  किती वर्षे गेले !  इंद्रायणीचा प्रवाह असाच वाहत होता.  समोरच्या काठावरची झाडी अशीच डोहात लवून पाहत होती.   इंद्रायणीच्या पलीकडल्या तीरावरील या झाडीचे तुकाला नेहमी गूढ वाटे.  तो घटकाघटका त्या झाडीकडे निरखून पाहत बसे.  अाणि मला तिची भीती वाटे.  मी झाडीकडे पाठ करी.  अाधी चरायला सोडलेली ढोरे वळवून अाणून उभी केलेली असत.  माझ्याकडे अाणि तुकाकडे ते काम होते.  फक्त सोबतीला असावा तसा सावजी अामच्याबरोबर असे.  अाम्ही ढोरे नीट चरतात की नाही इकडे नजर ठेवून असताना सावजी काठावरील एका कातळावर बसे.  त्याचे भजन सुरू होई.  तो गीतापाठ म्हणे किंवा ध्यान लावून बसे.

काळोख उतरण्यापूर्वी ढोरे वळवून अाणून अाम्ही दोघेही सावजीच्या शेजारच्या एखाद्या कातळावर बसत असू.  मग तुका समोरच्या झाडीकडे टक लावून बसल्यावर, त्या झाडीची गर्द पालवी, मोठमोठे तपकिरी बुंधे, त्यांना विळखा घालीत चढत गेलेल्या वेली, या सर्वांमागे काहीतरी भयंकर लपलेय असे मला वाटत राही.  तिथून निरनिराळे चीत्कार घुमत कानावर येत.  डोह काळेभोर चककत.  मधेच वाळकी फांदी पडून धप्प अावाज होई.  रात्री तिथूनच कोल्हेकुईला अारंभ होई.

संध्याकाळ वाढून अाकाश लाल पडू लागले की झाडी काळा रंग घेऊन तटासारखी उभी ठाके.  मला अधिकच भीती वाटू लागे अाणि तुका झाडीविषयी बोलत राही.  त्याला पडणारी स्वप्ने तो सांगे.  एका स्वप्नात त्याला दिसे–इंद्रायणीचा प्रवाह अोलांडून त्या झाडीत अापण शिरलो अाहोत.  झाडीतील पाउलवाटेने जाता जाता मागची वाट बंद होत अाहे.  अापले अाईवडील, भाऊबहीण, देहू गाव नाहीसे झाले अाहे.  अापण अगदी एकटे पडलो अाहोत.

दुसऱ्या स्वप्नात हीच झाडी विलक्षण अानंदाची वाटे.  सूर्यप्रकाशात, निळ्या अाकाशावर झाडीतून, झाडीहूनही उंच गेलेल्या एकच एका फांदीवर एखादा शुभ्र बगळा झोके घेत बसलेला दिसे.  तुका नदी अोलांडून झाडीत शिरताक्षणीच झाडी प्रकाशाने फुलून जाई.  पक्ष्यांची सुस्वर गीते चहू वाजूने कानावर येत.  वृक्षवेली कोवळ्या जांभळ्या, पोपटी पानांनी फुललेल्या असत.  फुले वहरलेली असत.  हवेत मंद सुगंध भरलेला असे अाणि पाऊलवाट अापोअाप वाट मोकळी करून देई.  त्याला वाटे, पक्ष्यांबरोबर अापणही गावे.  त्याचा गळा शब्दांनी दाटून येई.  पण शब्द फुटण्यापूर्वीच श्वास कोंडून तो जागा होई.

तुकाने ही दोन स्वप्ने त्या कातळावर बसलो असता कितीतरी वेळा सांगितली असतील.  माझे अर्धे लक्ष उभ्या करून ठेवलेल्या अामच्या गुरांकडे असे.  ती पुन्हा उधळली तर अंधारात सापडणार नाहीत अाणि अधेमधे गावाशी येऊन जाणारा वाघ त्यांना खाईल, अशी भीती मला वाटत राही.

त्याच वेळी सावजी प्रवाहाशी अगदी निकट असलेल्या कातळावर ध्यान लावून बसलेला असे.  त्याला अामचे भान नसे.  गुरांचे, नदीचे किंवा झाडीचेही नसे.  कधी तो काही पाठांतर म्हणत राही.  त्या पाठांतराचा एकच एक सूर मला उदास करी.  फार अंधार पडला की अाम्ही त्याला हलवून भानावर अाणीत असू.

मला वाटते, संध्याकाळच्या त्या लाल प्रकाशातच अाम्ही तिघे भाऊ मोठेपणी जसे होणार होतो तसे घडलो.  त्य कातळावर तिघांचे भवितव्य ठरले.  सावजी पुढे संसारमुक्त झाला.  मी संसाराच्या दरीवर, ब्रह्मज्ञानाच्या फांदीला लोंबकळत राहिलो.  अाता त्याच कातळावर बसलो असता माझ्या मनात अाले, जर तुका सापडला नाही तर तिघा भावांतला मी एकटाच उरलो असे होईल.  जिथे तिघांनी बसायचे तिथे मी एकटाच बसलेला राहीन.  मग माझ्या मनात अाले, जे विठ्ठलाच्या मागे लागले त्यांचे असेच होते.  ज्ञानेशांचे अाणि त्यांच्या भावंडांचे असेच झाले.  पण विठ्ठलाच्या मागे लागणे म्हणजे तरी काय ?

अाता अांधार वाढला होता.  रातकिड्यांचे गाणे सुरू झाले होते.  मला उठावेसे वाटेना.  सारखे अाम्हा भावांचे विचार मनात येऊ लागले.  अाम्ही असे कसे झालो ?  असे कसे गुंतत गेलो ?

|| ४ ||

माणूस जन्मतो तेव्हा कोरास्वच्छ असतो.  पुढे वयाबरोबर तो अहंकारांनी लडबडला जातो.

अाम्हीही असेच लडबडले गेलो.  अाम्हांला लहानपणीच केव्हातरी कळले, अाम्ही शूद्र अाहोत, जातीने कुणबी अाहोत अाणि अामचा धंदा वाण्याचा अाहे.  या सर्वाला मोठा अर्थ अाहे असे अामच्यावर ठसविण्यात अाले.  अाम्हांला कळले की, अामचा सातवा पूर्वज प्रथम देहूला अाला अाणि अाम्ही देहूकर झालो.  की, अाम्हांला कळले की, अामच्या जातीचा अाम्ही अभिमान बाळगला पाहिजे.  अाम्हांला हेही कळले की, ज्याने त्याने अापली जात सांभाळली पाहिजे.  माझ्या मनात अाले, अाम्ही सात पिढ्यांपूर्वी या गावी अालो नसतो तर अाजचे काही झाले नसते.  मग इंद्रायणी नसती, ही झाडी नसती, ती स्वप्ने नसती, कदाचित तुकाचे कवित्वही झाले नसते अाणि महाजनही झालो नसतो.  अाईने अाम्हांला अाम्ही देहूचे महाजन अाहोत ही सारखी जाणीव दिली तीही दिली नसती.  तिला वाटे, अाम्ही महाजनाची मुले अाहोत हे अाम्ही कधी विसरू नये व इतरांना िवसरू देऊ नये.  त्यासाठी तिला वाटे, वाटेल त्या पोरांबरोबर खेळून अाम्ही धुळीत मळून येऊ नये.  अाम्ही वेगळे कळावे म्हणून त्या वयातही ती अामच्या कानांत भिगबाळ्या किंवा हातात सलकड्या घाली.  अाणि अधूनमधून अामच्या हातून खेळताना एखादा अलंकार पडून हरवला की तो, खेळाच्या जागेवर, स्वत: शोधायला येई.  काळोख पडेपर्यत तिचे शोधण्याचे काम चाले.

सावजी अामच्यांत मोठा असल्यामुळे सावजीवर तिने अलंकारांची हौस जास्त केली.  सावजीला विरक्ती येऊ लागल्यावर अाईने घातलेले अलंकार पुढेपुढे तो हळूच घरात कोनाड्यात काढून ठेवून जाऊ लागला.  अाईने सावजीवर नवे अलंकार घालावे, दूर उभे करून त्याला डोळे भरून पाहावे, बोटे मोडावी अाणि तिची पाठ वळताच सावजीने ते काढून ठेवावे.  सावजी केव्हापासून यात्रेला जाणार म्हणू लागला होता.  यात्रा म्हणजे काय हे तेव्हा त्याला कळतही नसावे.  इतक्या लहान वयापासून तो संसारविन्मुख व्हावा याचे मला अाजही अाश्चर्य वाटते.  त्याची शरीरकाठी तेव्हापासून तपस्व्याला योग्य अशी होती.  काळा किडकिडीत देह, कोरडी अोढलेली कातडी.  तेजस्वी मोठे डोळे, लांब हात.  जणू अाईच्या पोटात असल्यापासून तो तप करीत असावा.  अाई त्याच्या चिंतेत नेहमी चूर असे.  अाणि ज्याच्याबद्दल चिंता असते तो लेक लाडका असतो.

अईने महाजनकीचा अभिमान अामच्यांत घातला तर सावजीने अामच्यात, अामच्या मोरे घराण्यात चालत अालेली विठ्ठलाची मिराशी भिनविली.

सावजीचा अावाज गोड होता.  त्याच्या भजनाचा सूर अजून माझ्या कानात घुमतो अाहे.  घरात देवघरासमोर बसून तो भजन-पूजान-पठण करायचा तिथे तो बसला असल्याचा भास, तो यात्रेला निघून गेल्यावरही, मला अनेकदा होत असे.  अगदी पहाटेच्या अंधारात तो इंद्रायणीवर जाऊन स्नान करी.  मग अोलेत्याने तो अामच्या वडिलार्जित विठ्ठलमंदिरात जाई.  तिथे पूजा, पारायणे वगैरे अाटोपून तो घरच्या देवांची पूजा करण्यास येई.  तिथेही पूजापठण होत असेच.  मला अाठवते तेव्हापासून, घरच्या देवाकडून विठ्ठलमंदिर अाणि उलट, असे दिवसभर त्याचे चालू असे.  रस्त्याने तो सरळ समोर पाहत जाई.  कुणाशी बोलताना त्याला पाहिल्याचे मला अाठवत नाही.  वडिलांपुढे तो फारसा जात नसे.

दिवसभर अामच्याशी त्याला बोलायला वेळ होत नसे.  पण संध्याकाळी नदीवर जाताना किंवा नदीवरून परत येताना तो अाम्हांला अामच्या कुटुंबातील विठ्ठल-भक्तीच्या परंपरेच्या गोष्टी सांगे.  त्या गोष्टी एक तर भावोत्कट किंवा एक तर अद्भुत असत.

सात पिढि्यांपूर्वी अाम्ही देहूकर झाले हे ऐकताना अाम्हांला अभिमान वटे.  सात पिढ्या देहूत असलेली घराणी किती होती ?  विश्वंभर हा इथे अालेला अामचा पहिला पूर्वज.  विश्वंभराच्या गोष्टी सांगताना सावजी सद्गदित होई.  पंढरपुरची वारी विश्वंभरापासून अामच्या घरात होती, हे सांगताना त्याचे डोळे चकाकत.  कार्तिकीपासून ज्येष्ठापर्यंत विश्वंभराच्या पंढरपुरास सोळा येरझारा होत.  त्याचे हे सेवाऋण पाहून देव प्रसन्न होऊन त्याच्या स्वप्नात अाले अाणि त्याचे कष्ट वाचवण्यास अापण देहूस येऊन राहिलो अाहोत असे त्यांनी सांगितले.

असे दिसते की स्वप्ने पडणे व पुष्कळदा त्याप्रमाणे होणे हे अामच्या कुटुंबात विश्वंभरापासून अाहे.  पुढे तुकालाही स्वप्नात दृष्टांत झाले.  पण मी मात्र दुर्दैवी होतो.  मला कधी स्वप्नात दृष्टांत झाले नाहीत.

सावजीने सांगितले, देव इथे येऊन राहिले हे स्वप्नात दिसल्यावर, एकदा अांब्याच्या बनात खणत असता विश्वंभराला विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली.  मग विश्वंभराने इंद्रायणीच्या काठाजवळ देऊळ बांधून त्या मूर्तीची स्थापना केली.

ज्या देवळात सर्व गाव दर्शनाला येते ते देऊळ अामच्या पूर्वजांच्या दृष्टांतातून निघाले हे ऐकून अाम्हांला अभिमान वाटे.  सावजी अाम्हांला अापल्या विरक्तीचे मूळ घराण्यातच कसे अाहे हे सांगत असता अाम्ही अहंकाराची एक पुटी चढवून घेत होतो.

तुकाने तर अाम्हांला अामचे बालपण दिले.  तो अाम्हा मुलांचे सर्वस्व होता.  तुकाइतकी हौस कुणाला नसेल.  लहान भावाला मोठ्या भावात जे जे हवे असते ते ते तुकात होते.  दादा !  अंथरुणातून उठताच तोंड वगैरे धुऊन, भाकर खाऊन तू बाहेर धावायचास.  तुझ्यामागे बाहेर पडण्यास माझी धावपळ व्हायची.  अाणि तू रस्त्यावर येताच, बाळकृष्णामागे गोपांची मुले येत तशी घराघरातून गावातली मुले बाहेर पडत.  त्या त्या ऋतूचा खेळ तू पहिल्यांदा सुरू करायचास.  विटीदांडू तुझा लाडके खेळ.  पण सगळे खेळच तुझे लाडके होते.  विटी कोलायला लागले की अगदी समोर जवळ तू उभा राहायचास.  तुला भीती ठाऊक नव्हती.  अाणि तू विटी मारू लागलास की तुझे टोले धडाडत डोक्यावरून जायचे.

गावच्या मुलींबरोबर वारुळाची पूजा करायला अापण मुले जायचो.  त्या गाणी म्हणत जात असता अापण दगडादगडी खेळत मागे असायचो.  मुलींची गाणी तुला सर्व पाठ होती.  एवढेच काय, पहाटे दळताना बाया अोव्या म्हणत त्या तुला पाठ होत्या.  सर्वांना त्याचे नवल वाटायचे.  श्रावणात झाडांना बांधलेल्या हिदोळ्यांवर तू सर्वांत उंच झोके घ्यायचास व मुलींना घाबरवून सोडायचास.  मुली, बाया, बाप्ये, सर्वांशी तुझे चांगले जमायचे.  एकदा उंच झोका गेल्यावर खाली येण्यापूर्वी क्षणभर थबकतो, त्या क्षणी खरी मजा येते, तू म्हणायचास.  तू म्हणायचास, तेव्हा काय वाटे, सांगता येत नाही.

डोंगरावर तू एकदा बेभान अवस्थेत सापडलास तेव्हा तीच भावना तुला झाली होती का ?

|| ५ ||

रातकिड्यांची किर्तर्र एकदम कानांत घुसली.  अापण कातळावर असल्याचे भान अाले.  मी इकडेतिकडे पाहिले.  काळोख चहूकडून घेरून अाला होता.  तो माझी दृष्टी तेवढी अडवीत होता.  अापल्याला दिसत नाही तरी काळोखातही सृष्टी चालूच अाहे, माझ्या मनात अाले.  फाल्गुनातील अाटलेली इंद्रायणी वाहतच अाहे.  अापल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही.  अापला अगदी सख्खा भाऊ असला तरी तो सृष्टीत नाहीसा होतो.  सृष्टीला भाऊ नाही, बहीण नाही, वडील नाहीत.  सृष्टीला कुणाचे काही नाही.  मग सृष्टीला कोण अाहे ?  विठ्ठल ?  तुकाचा तो लाडका विठ्ठल ?  इथे, कातळावर बसल्यावर वाटणारी बालपणाची भीती अाठवली.  ती भीती कुठे गेली ?  मी नवल करू लागलो.  माझ्या लक्षात अाले, ती भीती अाहेच.  तिची रूपे बदलली अाहेत.  तुकाचे काय झालेय याची भीती.  योगक्षेम कसा चालेल ही भीती.

योाक्षेमाचे विचार मनात येताच घर अाठवले.  मी दचकून उभा राहिलो.  घरी सर्व काळजी करीत असतील.  वहिनीचा जीव अर्धा झाला असेल.  लेकरांना भोवताली घेऊन दोन्ही बाया बसल्या असतील.  जाऊन वहिनीला काय सांगू ?

मग विचार अाला, तुका घरी अालाही असेल.  अाणि अाता तो माझी चिंता करीत असेल.  तो मला शोधायला बाहेर पडेल.  संसारी माणसाच्या चिंता अशा पलटी घेत असतात.  एक दुसऱ्याची चिंता करतो.  दुसरा पहिल्याची चिंता करतो.  एकमेकाच्या चिंतेत राहणे त्याला अावडते.  तो तेव्हाच खरा जगतो.

पण तुका अाला नसला तर ?  गर्भार बायकोची पर्वा न करता त्याने जावे !  मला त्याचा संताप अाला.  घराकडे निघण्यापूर्वी रागाच्या भरात मी जोराने दोन हाका मारून घेतल्या.  “तुका ! दादा !”

घराशी पोहोचताच मला कळले, तुका अालेला नाही.  उघड्या दारातून अातली दिव्याची लाल ज्योत दिसली.  माझे पाय गळाले.  घर सामसूम होते.  अंगणात बैलगाडी सोडून ठेवलेली होती.  तिच्या उतरत्या जोकडावर मी बसलो.  समोर दरवाजा उघडा होता.  पण अात जावेसे वाटत नव्हते.  किती हौसेने अनेकदा अाम्ही हे अामचे घर सारवले होते, रंगवले होते !  तुळया-खांबांना तेलपाणी केले होते.  त्या घरात माझी बायकोमुले होती.  तुकाची बायकोमुले होती.  तरी ते उदास वाटत होते.

डोक्यावर काळ्या ताऱ्यांनी भरलेल्या अाकाशाखाली अायुष्यातली मागची सारी वर्षे दाटून अाली.  इतकी वर्षे रोज रोज हेच तारे डोक्यावरून गेले असतील, त्यांचे कधी भान केले नव्हते.  असेना का वर अाकाश, तारे उगवेनात का, सूर्यचंद्र उगवोत, मावळोत–या पृथ्वीवर अाम्ही किती गमतीत होतो.  अाम्ही–ही मोऱ्यांची मुले, ही महाजनांची मुले.  अाम्हांला कधी काही कमी पडण्याचे कारण नव्हते, कधी दु:ख होण्याचे कारण नव्हते.  ज्या बैलगाडीच्या जोकडावर मी अाता बसलो होतो ती गाडी रात्रभर जागून अाम्ही रंगवली होती.  जत्रेला जाताना इतर गाड्यांबरोबर झडपा लावून अाम्ही अग्रेसर राहिलो होतो.  रंगवलेली अामची गाडी रस्त्याने जाऊ लागली की लोक टकमका बघत होते.  अाम्हा भावांचा प्रत्येकाचा एकेक बैल लाडका होता.

जोकडावरून उठून मी घरात अालो.  खाली मान घालून एखाद्या अपराधी मणसासारखा मी झर्रकन तुकाच्या बायकोच्या अंगावरून पुढे गेलो.  स्वयंपाकघरात चूल थंड होती.  अामची दोन लहान मुले कोपऱ्यात गोधडी टाकून बायकोने झोपवली होती.  पुढे होऊन मी चूल पेटवू लागलो.  मागोमाग माझी बायको अात अाली.  शेजारी बसून माझ्या हातातले फाटे घेत तिने हळूच विचारले,

“काय झाले ?  सापडले का ?”

मी ‘सापडला नाही’ अशी मान हलवली.  म्हणालो,

“नदीवर पाहिले.  डोंगरावर जाऊन येईन उद्या.”

बायको चुलीत फाटे हलवीत खालच्या मानेने म्हणाली,

“भावोजी सापडणार नाहीत !”

मला तिचा भयंकर राग अाला.  ती अशी झटकन जी जी भविष्यवाणी वर्तवी ती ती अातापर्यंत खरी ठरत अाली होती, म्हणून राग अाला.  तिला तुकाबद्दल, माझ्या भावाबद्दल अात्मीयता नाही असे वाटून राग अाला.  इतकी वर्षे या घरात येऊन झाल्यावर तिने माझ्याप्रमाणे भावाबद्दल हळवे होऊ नये म्हणून राग अाला.  मागे अामचे अाईवडील गेल्यावर ती म्हणाली होती, “अाता बायको गेल्यावर सावजी-भावोजी यात्रेला निघून जातील.”

सावजीची बायको अाजारी होती व ती मरणार हे दिसत होते.  सारे खरे होते.  पण हे बोलून दाखविण्याची गरज नव्हती तिला.  तिची ती वाणी खरी ठरली होती.  एकदा ती म्हणाली,

“मागच्या जन्मीच्या कोणत्या पापामुळे या वेड्या घरात येऊन पडल्ये !  तुम्ही मात्र वेडे होऊ नका !”  मग म्हणाली, “तुम्ही वेडे होणार नाही.”

अाणि एकदा वैतागल्यावर ती म्हणाली होती,

“सोडू या ना अापण हे गाव.  माझ्या माहेरच्या गावी जाऊन राहू.  तिथे कुणाचे तरी शेत लावायला घेऊ.  सगळी नवीन सुरुवात करू.  नको इथे.  ही महाजनकी नको.  या घराला विठ्ठलाचा शाप अाहे !”

विठ्ठलाचा अाणि शाप !  मी तेव्हा संतापाने अोरडलो होतो,

“गप्प बस रांडे !”

|| ६ ||

अाणि तिच्या मनात अालेली तीही भविष्यवाणी खरी ठरली.  पुढे अाम्ही गाव सोडलेच.  मी बायकोवर, अाशा बोलण्यावर चिडत असे ते भावनेच्या पोटी.  ती बरोबर सांगते हे मनात अातून पटत असे.  मला नव्हता तो अात्मविश्वास तिला होता.  एखादी गोष्ट करायची ठरली की तिला संशय नसे.  कर्तव्याला ती कधी चुकली नाही.  घरातील माणूस तिने कधी अापण होऊन तोडले नाही.  अामचे घर तिच्यामुळेच उभे होते.  तुकाची बायको तुकाचे बघता बघता व त्याची चिंता करता करतानाच जेरीस यायची.

माझी बायको माझ्याचप्रमाणे श्यामवर्णाची व मला शोभेलशी उंच सडसडीत होती.  मी फारच उंच होतो.  पण तिचा उंचपणा रेखीव तर माझा खडबडीत होता.  माझे हाड मोठे होते.  माझी हाडे शरीरांतून बाहेर डोकावल्यासारखी वाटत.  माझे शरीर मलाच अावडत नसे.  घरातले प्रत्येक दार मला ठेंगणे होते.  मला सारखे वाकावे लागे.  प्रत्येकजण एकेक गोष्टीसाठी प्रसिद्ध असतो.  मी माझ्या कुऱ्हाडीच्या घावावद्दल प्रसिद्ध होतो.  “कुठलाही अोंडका द्या, कान्हा एका घावात चिरफळून टाकतो !”, लोक म्हणत.  बाकी मी धांदरट होतो.  माझी उगीचच धावपळ चालायची.

अामच्या घरात रूपाला सुंदर, ठेंगणी, ठुसकी अशी तुकाची ही दुसरी बायको होती.  तुकाची पहिली बायको पांढरी गोरी होती.  ती प्रौढवयापर्यंत जगली असती अाणि जर अामची परिस्थिती चांगली राहिली असती तर शांत, सौम्य घरंदाजासारखी शोभली अासती.  ती समजूतदार होती.  बालवयातही तिला अाब होता.  उलट, तुकाची दुसरी बायको तुकाप्रमाणेच, पण उलट अर्थाने, जीवनाची खरी भोक्ती होती.  जर वैभव राहिले असते तर ते तिने थाटामाटाने भोगले असते.  पण दैवाने ते काढून घेतले होते.

मला वाटते, सावजी व तुका सोडले तर अामचे कुटुंब इतर चार कुटुंबांसारखेच होते.

|| ७ ||

बायकोने भात-पिठले झाल्यावर मुलांना उठवून जेवू घातले.  अाम्ही जेवढे जातील तेवढे चार घास तोंडात टाकले.  तुकाच्या बायकोला थोडेसे दूध घ्यायला लावले.  अाणि एक घोंगडी देवघरासमोर अंथरून मी अाडवा झालो.  ही जागा सावजीची होती अाणि नंतर तुका इथेच बसून अभंग रचीत अाला होता.  त्या जागेवर मी अस्वस्थ मनानेच पडलो.  दिवसभराच्या धावपळीमुळे, थकव्याने डोळे मिटत होते अाणि मधेच मी जागा होत होतो.  तुळईखाली झोपावे, तशी माझी झोप दचकून तुटत होती.  ज्या जागेवर मी झोपलो होतो तिच्यावर विठ्ठलभक्तीची तुळई होती !

केव्हातरी अपरात्री मी जागा झालो ते तुकाचे स्वप्न पडून.  इथेच देवासमोर उभा राहून तुका जरीचा फेटा बांधीत होता.  अाणि सर्वजण कौतुकाने पाहत होते.  फेट्याचे दोन वळसे द्यावे न द्यावे तर टोक निसटून फेटा खाली अोघळत होता.  तुकाची फजिती पाहून सर्व हसत होते.  तुका लाजत होता.  पण पुन्हा पुन्हा पडलेले टोक उचलून बांधीत होता.

मला अाठवले, तेव्हा बालवयातही तुकाचा चेहरा गोल होता.  डोळे वाटोळे मोठाले होते.  भुवया जाड होत्या.  त्याच्या डोळयांत स्वप्ने होती.  अनेक स्वप्ने होती.  त्यात सावजीसारखे टक लावून बसलेले एकच स्वप्न नव्हते.  तो अाईसारखा काहीसा गोरा होता.  त्या वयात अंगावर मांस नसूनही चेहरा मांसल वाटे.  त्याची कातडी सावजीसारखी रूक्ष-कोरडी नव्हती.  त्याच्या अंगावर मार्दव होते.  काहीसे मुलींसारखे मार्दव होते.  त्याचा चेहरा गुबगुबीत वाटे.

मला स्वप्न पडले होते ते तुका पेढीवर जाऊ लागला त्या पहिल्या दिवसाचे.  अाणि स्वप्न संपल्यावर तो पहिला दिवस माझ्या डोळ्यापुढे अाला.  पहाटे लौकर उठून, स्नान करून, गंध लावून, लांब अंगरखा घालून, फेटा बांधून, तुकाने देवांना नमस्कार केला, वडीलमाणसांना केला.  मग तो वडिलांबरोबर दुकानाकडे गेला.

तुका पेढीवर जाऊन व्यवसायउदीम पाहू लागला अाणि अामचे एकत्र खेळणे, रानात भटकणे, नदीत डुंबणे यांत खंड पडला.  दादाने लहानपण सोडले तेव्हा मलाही खेळ पोरकट वाटू लागले.  दादाबरोबर मी दुकानात जाऊ लागलो.  वडील त्याला मोडी शिकवू लागले तेव्हा मीही धुळीत बोटाने मोडी अक्षरे काढू लागलो.  माल देता-घेताना त्याला मापे मोजायला मदत करू लागलो.  कीर्द-खतावण्या, सावकारी हिशेब यांत मला रस नव्हता.  मला त्या वयात तसले व्यवहार कळलेही नसते.  पण तुका मात्र दुकानाच्या सर्व तऱ्हेच्या व्यवहारांत हिरिरीने पडला अाणि दुकानात उगीचच त्याच्या अासपास बसण्याचा मला कंटाळा येऊ लागला.  माझे खेळाचे वय मला दुकानाबाहेरून सारखे खुणावू लागले.  मी दुकानात जाणे सोडले व परत इतर मुलांत खेळू लागलो.

तुका असा मोठ्या माणसांच्या जगात शिरल्यावर काही काळ त्याची नि माझी फारकत झाली.  तुकाचे वागणे-बोलणे अाता बदलत चालले होते.  दुकानातील व्यवहाराशिवाय तो दुसरे बोलत नाहीसा झाला.  घरातलेही त्यांच्याकडे “मोठा झाला” असे मानून वागू लागले.

तुका दुकानातून अाला की अाई तत्परतेने त्याचे ताट वाढायला पुढे होऊ लागली.  त्याच्या दोन्ही बायका लगबगीने पुढे येऊन तिच्या हाताशी लागू लागल्या.  एकदा ऋणकोच्या दारी धरणे धरायला गेल्यामुळे तुकाला जेवायला येण्यास खूप उशीर झाला, तेव्हा अाई वडिलांसाठी थांबे तशी त्याच्यासाठीही जेवणाची थांबली.  वडील येऊन जेवण करून दुकानात गेले.  तुकाच्या बायका जेवीनात तेव्हा अाईने त्यांना जेवायला बसवले.  मी लहान होतो अाणि मला वाटले, माझी बायकोही उशीच माझ्यासाठी जेवणाचे थांबण्याचा हट्ट घेईल.  मला अगदी हौस वाटली.  बायका जेवणाचे थांबत होत्या हे अाईने त्याला सांगितले तेव्हा तुकाही त्या दिवशी सुखावला.  त्याच्या दोन्ही बायका दाराअाड बसल्या होत्या तिकडे तो सारखा कौतुकाने पाहत होता.

घरातला मोठा मुलगा म्हणून खरे सावजीने दुकान संभाळायचे.  पण सावजीने दुकानात बसायला नकार दिला होता.  वडील एकदोन दिवास रागात होते.  अाई त्यांना समजावीत होती.  त्यांचा राग, अाईचे समजावणे किंवा सावजीने धंद्यात पडायचा नकार का दिला, हे त्या वयात मला कळले नाही.  जसे लहानपणाच्या हट्टाचे कारण बघायचे नसते तसे सावजीच्या हट्टाबद्दल कधी विचारही मनात अाला नाही.  त्याने नाही म्हटले बस !  तो मोकळा राहिला.  तो अापले भजनपूजन करीत राहिला.

|| ८ ||

तो सर्व काळ त्याची बायको कुठे होती ?  अाता इतक्या वार्षांनी सावजीची बायको एकदम अाठवून मी नवल करू लागलो.  तिची अाठवण इतकी पुसट झाली होती !  ती कधी होती का या अामच्या घरात ?  खरे पाहिले तर ती सर्वांत लक्षात राहायला हवी होती.  अामच्या घरात विठ्ठलाचा ती पहिली बळी होती.  ती अामची थोरली भावजय होती व तिने अामचे पुष्कळ केले होते.  अाता पडल्या-पडल्या एका कोपरावर उंच होऊन मी स्वयंपाकघराच्या दाराकडील अंधारात डोकावून पाहिले.  जणू मला ती तिथे वावरताना दिसणारच होती.  तेव्हा ती सारखी कामात असे अाणि झटकन इकडून तिकडे जाताना दिसे.  ती एखादा शब्दा बोले न बोले.  मोठी सून म्हणून तिच्यावर सासूचे जास्त दडपण असेल.  अाईच्या हाताखाली ती सारखी लवलेली असे मात्र खरे.  अाईबरोबरच ती जेवायला बसे अाणि तिचे जेवण विलक्षण सावकाश होते.  जशी मी तिला पाहत होतो तशीच ती उंच, किडकिडीत, एकसारखी होती.  तिच्या मंद जेवणाबद्दल अाई नेहमी बोले. रात्री जेवण झाल्यावर अापली ठरलेली घोंगडी अाणि चौघडी घेऊन ती अातल्या खोलीच्या कोपऱ्यात अंथरुण घाली अाणि भिंतीकडे तोंड करून, हाताचे उसे करून झोपी जाई.

सावजीला तिच्याशी कधी बोलतानाही मी पाहिले नाही.  तो तिला अापले एकही काम करू देत नसे.  तो स्वत:चे पान स्वत: घेऊन बसे.  स्वत:चे कपडे स्वत: धुऊन काढी.  पण या वागण्यात बायकोबद्दल तिटकारा किंवा राग त्याच्या मनात नव्हता.  थंडपणा होता.  त्याने जो विरक्तीचा मार्ग पत्करला होता त्यात बायको बसत नव्हती.  ही विरक्ती येण्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.  तेव्हा दोष दैवाचा होता.

त्यांना मूल नव्हते.  सावजीने तिच्याशी कधी नवऱ्याचे नाते ठेवले होते का याबद्दल मला संशय अाहे.  पण त्याच्या मनात तिच्याबद्दल तो दाखवीत नसला तरी अधू भावना होती.  ती मेल्यावरच त्याने यात्रेसाठी कायमचे घर सोडले.  सावजी जरी किती चांगला वागत असला तरी ती कुढत चालली होती.  तिचे शरीर तरुण वयात सुकत चालले होते.  नवरा असा देवाधर्माकडे लागलेला.  या वयातली त्याची विरक्ती पाहून जनांत सावजीचे कौतुक होत होत, पण स्वत:च्या दु:खाचे तिला बोलता येत नव्हाते.  तिचे सावकाश जेवण म्हणजे अन्न कमी कमी खाण्याचे तिने योजले असावे.  नवऱ्याने संसार टाकला म्हणून ती कष्टी होती, तर सावजी ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही म्हणून कष्टी होता.  माझ्या बायकोला तिची फार कीव येई.

सावजीचे चित्त किती अस्वस्थ असते हे एका संध्याकाळी मला कळले.  अाम्ही नदीवर बसलो होतो.  सावजी डोळे मिटून ध्यान लावून बसला होता.  सुर्य अाताच मावळला होता.  इतकयात पक्ष्यांचा एक थवा पात्रावरून उडत फेरी घेत अाला.  तो थवा खाली उतरला अाणि सावजीच्या अंगावर येऊन फुटला.  तेव्हा सावजी इतका विलक्षण दचकला !  थव स्वत:ला सावरीत दाही दिशांना होऊन परत पात्रावर एकत्र होऊन उडू लागला.  पण ध्यानभंग झालेला सावजी कितीतरी वेळ अस्वस्थ होता.  अापण ध्यानमार्गात पुरेसे तयार नाहीत हे ध्यानात येऊन तो अास्वस्थ असावा.

तुका विलक्षण होताच, पण सावजी काही कमी विलक्षण नव्हता.  तुकाची शेवटची वर्षे गढू होती.  सावजीचा अारंभच गूढ होती.  दुसरी कसली जाण येण्यापूर्वी त्याला वैराग्याची जाण कशी अाली असेल ?  एखदे इंद्रिय नसावे तसे त्याला ऐहिकतेचे इंद्रिय जन्मत:च नव्हते का ?  किती विचित्र !  अाम्हांला तो जसा कधी कळला नाही तसा त्याच्या बायकोलाही तो कधी कळला नसावा.  अशा पुरुषाशी जन्माची गाठ पडावी हे अापले दुर्दैव मानून दिवस काढण्यापलीकडे तिच्या हाती काय होते ?

पडल्यापडल्या मला वाटले, कोणत्याही क्षणी अंधाऱ्या दारातून सावजीची बायको पुढे येऊन तुका न सापडल्याने कष्टी झालेल्या अामच्याकडे पाहून, स्वत:चे अायुष्य अाठवून करुण हसेल.

|| ९ ||

या पहाटेची अाणि उगवणाऱ्या सूर्यनारायणाची शपथ घेऊन सांग, तुका !  तू सावजीसारखा होतास का ?  तेराव्या वर्षी ऐटदार फेटा बांधून पेढीवर जाऊन तू उदीम करू लागलास, तो हौसेनेच की नाही ?  सावजीने दुकान संभाळणार नाही असे म्हणताच तू सरसावून पुढे अालास अाणि एका वर्षात तुकाशेट म्हणून लोक तुला अोळखून लागले.  सावजीचे वैराग्य हा तेव्हा तुला काहीसा वेडेपणाच वाटला होता.  दोन वर्षंात सावकारीचे व महाजनकीचे व्यवहार तू सांभाळू लागलास.  तुला होनाची किंमत होनच होती.  होन मोजताना तुला अानंद होत होता.  हिशेबाच्या कीर्दखतावण्या तू व्यवस्थित ठेवायला शिकलास.  कुणाला कर्ज द्यायचे, कुणाला नाही हे तुला चांगले जाणता येऊ लागले.  कर्ज वसूल कसे करावे वगैरे सावकारी डावपेचांत तू तयार झालास.

तुझे नाव पुण्यापर्यंत गेले.  तुझी पहिली बायको दमेकरी होती.  तिला मूल होणार नाही असे वाटून बाबांनी तुझे दुसरे लग्न करून दिले.  ही तुझी दुसरी बायको श्रीमंताची होती.  विशेष म्हणजे शरीराने सुट्टढ होती.  ती तुला एवढी अावडली नाही, मनोमन तुमचे पटले नाही तरी तिच्यापासून मिळणाऱ्या शरीरसुखाचा मोह तुला कधी अावरला नाही.  कबूल ?

सावजीने भोग नाकारले.  तू सारे भोगलेस.  तीनचार वर्षांत धंदाउदीम वाढला.  तू त्यात पूर्ण रमलास.  होन, रूपये यांच्या खेळात, तू लहानपणाच्या खेळात रमायचास तसा रमलास.  तुरा उगवलेल्या कोंबड्यासारखी, व्यवहार कळला अाहे याची जाण तुझ्या प्रत्येक शब्दात, वागण्यात दिसू लागली.  माणसातली जगण्याची धडपड तुला तीट कळली.  खरेदी-विक्रीतले, व्याजबट्ट्यातले तंत्र तू अात्मसात केलेस.  जग कळल्याच्या अात्मविश्वासाने तू वागू लागलास.

बाबांना, अाईला तुझे किती कौतुक वाटू लागले म्हणून सांगू !

अहंकाराचा अाणखी एक पापुद्रा तू अंगावर चढवून घेतलास दादा !  त्या अहंकारातला एकहजारांश जरी अाज राखतास तर !  तू कुठे गेला असशील तेथून परत ये !  परत येऊन इथे अामच्यांत राहण्यापुरता अहंकार मनात ठेव.  बाकी तू काही कर.  कीर्तन कर, भजन कर, रात्रंदिवस कवित्व कर, नदीकाठी जाऊन बेभान नाच.  तुझा वैकुंठाचा टकळा चालू दे.  अाम्ही काही म्हणणार नाही.

|| १० ||

पहाटे उठून मी तुकाला शोधायला बाहेर पडणार होतो.  पण रात्रभर मी असा डोके भरकटत जागा राहिलो अाणि पहाटे मला डोळा लागला.  उठलो तेव्हा उन्हे पडली होती.  काळझोप लागावी तसा मी झोपलो होतो.  मला माझी लाज वाटली.  झटकन उठून, तोंड धुऊन, भाकरी खाऊन व बरोबर घेऊन बाहेर पडलो.  तसाच देवळाकडे गेलो.  बाहेरून विठ्ठल-रखुमाईला नमस्कार केला.

हातातील खुळखुळ्याची काठी अापटीत मी परत नदीकडे निघालो.  पाचपन्नास पावले गेलो नाही तोच गावातला वेडा, म्हातारा जन्या समोर उभा !  मला पाहताच तो हसला अाणि अोरडला, “हरवला–हरवला–तुक्या पुन्हा हरवला !”

अोरडत तो नाचू लागला.  त्याच्या नाचण्याहसण्याचा मला भयंकर राग अाला.  हा जन्या जेव्हा वेडा झाला अाणि मुले त्याच्या मागे दगडे मारीत येऊ लागली तेव्हा, दादा !  तूच मुलांना पिटाळून लावून अनेकदा त्याला वाचवलेस.  अाणि अाता तोच जन्या तू हरवलास म्हणून नाचतोय !  दादा !  तू हरवलास हे ऐकून काहींना अानंद होईल–मला ठाऊक अाहे.  पण या वेड्यालाही अानंद व्हावा !

मी रागाने जन्याच्या अंगावर गेलो.  माझी खात्री झाली, त्याने तुकाला कुठेतरी पाह्यलाय.  अाणि तो माझी गंमत करतोय.  त्याला जोराने हलवीत मी विचारले,

“कुठे पाहिलेस दादाला ?  बोल.”

हसणे थांबवून त्याने माझ्याकडे पाहिले.  मग धोरत वर खोचण्याची नक्कल तो करू लागला.  प्रवाहातून जावे तशी त्याने दोन पावले टाकली.  माझ्या ध्यानात अाले, तो मला नदी अोलांडून जायला सांगतोय.  मी विचारले,

“कुठे ?  नदीपलीकडे ?”

न बोलता तो धोतर वर खोचण्याची नक्कल करीत राहिला.  त्याला सोडून मी पुढे निघालो.  माझ्या पाठीला त्याचे खळखळून हसणे ऐकू अाले.  मला एकदा वाटले, त्याने माझी गंमत चालविली अाहे ; एकदा वाटले, तो खरे पाहिलेले सांगतोय.  मी मागे वळून पाहिले.  चिपळ्या धरल्यासारखे हात वर करून तुकाच्या नाचण्याची नक्कल करीत तो कर्कश भेसूर सुरात म्हणू लागला,

“ अाम्ही जातों अामुच्या गावा

अामुचा रामराम ध्यावा || ”

मला तो भेसूर सूर ऐकवेना.  कानांवर हात ठेवून मी धावत सुटलो.  गेला महिनाभर असलेच अभंग म्हणत बेभान होऊन तुका बाहेर पडत होता.

नदीवर येऊन श्वास अावरीत उभा राहिलो.  पण वेड्याचे मनातून जाईना.  या वेड्याचे नि अापले नाते असल्यासाखे तुका बोलत असे ते मला अाठवले.  कित्येकदा तो वेड्या जन्याकडे टक लावून बसे.  घरात उरलेसुरले, कधी अापल्या पानातले, या वेड्याला येऊन खाऊ घाली.  अगदी शेजारी बसून अाळवून भरवी.  एकदा मला तुका म्हणाला,

“कान्हा !  जन्या वेडा असला तर सगळ्यांनी वेडे व्हावे.  वस्त्रप्रावरणांसाठी अाम्ही तगमगतो तर शरीराला लंगोटीसुद्धा पुरते हे त्याने दाखवून दिलेय.  बायको, मुले, मित्रपरिवार यांच्या मायेशिवाय अाम्हांला जगता येत नाही, तर तस्यला मायेशिवाय जगता येते हे त्याने अाम्हांला शिकवलेय.  राहायला प्रासादाची गरज नाही, वर निळे अाकाशही पुरते–त्याने सिद्ध केलेय.  पोटाला भाकरी-कालवणच लागते अाणि दिवसातून तीन वेळा लागते–त्याने तेसुद्धा खोटे ठरवलेय.  कान्हा !  त्याने मला शिकवले की, जे जे अापण मूल्यवान मानतो ती ती  माया अाहे.  अरे !  त्याला देवसुद्धा लागत नाही जगायला.”

तुकाचे बोलणे मला तेव्हा भयंकर वाटले.  मी म्हटले,

“दादा, हे तू काय बोलतो अाहेस ?”

तुका म्हणाला,

“काय सांगावे !  अापण जगतो ते खोटे असेल.  त्याचेच खरे असेल.  तो अापल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना ?”

|| ११ ||

धोतर नीट वर खोवीत मी इंद्रायणीत शिरलो.  इंद्रायणी नदी अोलांडून काठ चढून वर गेलो.  तुका नेहमीप्रमाणे कुठेतरी डोंगराकडे सापडणार ही खात्री होती.  जरा वेळाने माझी पायवाट बैलगाडीच्या चाकोरीला मिळाली.  फाल्गुन महिना होता.  चाकोरीत धूळ जमू लागली होती.  त्या धुळीत कुठे तुकाची पावले उमटलेली दिसतात का पाहू लागलो.  हवेतला गारठा गेला होता.  वाळलेली पाने झाडांवरून उडू लागली होती.  करवंदी हिरव्य होऊ लागल्या होत्या अाणि पळसात तांबडी कोवळी पाने दिसू लागली होती.  मंद वारा सुटला होता.  मी चिंतेत नसतो तर तो सुखद वाटला असता.  गावाकडून एक कोकिळा अोरडू लागली.

मला वाटले, ती “तुका–तुका–” असेच अोरडत अाहे.  मी मनात म्हणालो, दादा !  बघ सृष्टी कशी अानंदात अाहे.  तूच या सृष्टीचे वैभव पाहून अनेकदा वेडा झाला अाहेस.  या सृष्टीशी तू अनेकदा एकांत केलास.  ही तू सोडून गेलास हे पटत नाही.  तू नक्की इथेच कुठेतरी कपारीत सृष्टीचे रूप पाहत बसला असशील.

दादा ! असे म्हणू नकोस, “मला या सृष्टीचे काय अाहे ?”  तू अामच्या कुणापेक्षाही एकदा जगात रमला होतास.  दुसऱ्या लग्नाच्या वेळी तू हौसेने मिरवलास.  व्यापाराला गेलास.  अामच्यासाठी बासने घेऊन अालास.  जीवनावर तुझी नक्की अासक्ती होती.  अाणि अापल्या कुलदैवताचे तू करीत होतास, तोही या अासक्तीचाच भाग होता.  चारचौघांसारखीच तुझी देवावरची श्रद्धा व्यवहारमिश्रित होती.

दादा !  तू केव्हा बदललास ?  अापले सगळे घरच बदलले.  एखाद्या झाडाची फुले गळावी, मग पाने गळावी, मग फांद्या शुष्क व्हाव्यात, तसे या अापल्या घराचे झाले.  कधीकधी मला हताश वाटते रे !

|| १२ ||

चलता चलता मी थबकलो.  विचारांच्या अोझ्याने माझी पावले मंद केली.  मी एका वृक्षाखाली मुळांवर बसलो.

केव्हापासून अामचे घर बदलले ?  मी मागच्या गोष्टी अाठवू लागलो.  अानंदात असलेल्या घराला एकदम दृष्ट लागली तो दिवस अाठवू लागलो.  वडील गेले, अाई गेली, मग सावजीची बायको गेली.

सावजीची बायको मेली अाणि घराला अवकळा सुरू झाली.  सावजीची बायको मेली–दु:खातून सुटली.  कुणाला त्या घटनेचा धक्काही बसला नाही.  मूलबाळ न झालेली बाई.  नवऱ्याचे लक्ष नसलेली.  तिला किंमत नव्हती.  नवरा संबंध ठेवत नव्हता म्हणून तिला मूल झाले नव्हते.  पण ते कुणी ध्यानात घेतले नाही.  विवाह होऊनही ती कुवारी राहिली.  अाणि ती होती तोपर्यंत तिच्या दु:खाच्या पुण्याईने घराचे वैभव चढत गेले.  ती गेल्यावर तिच्या तळतळाटाने घर बसले.

ती मेली अाणि सावजी यात्रेला गेला अाणि दुष्काळ पडला.  माझ्या मनात अाले, हे सारे कल्पनेचे खेळ असतील अापल्या.  इतक्या वर्षांनंतर अधलेमधले बरेवाईट दोन्ही कितीतरी विसरले गेलेय.  पुसट रेघा पुसून जातात.  खोल रेघा राहतात.  तेव्हा अशा कल्पना करणे खोट.  कुणी गेल्यामुळे किंवा राहिल्यामुळे अवकळा अाली नाही.  सावजी विरक्ती घेऊनच जन्माला अाला होता.

पण एखाद्या कुटुंबात कुणी विरक्त निघत नाही का ?  अाणि अाईबाप केव्हा ना केव्हा जातातच प्रत्येकाचे.  अाणि दुष्काळ पडला तो एकट्या मोरे घराण्यावरच पडला का ?  सबंध देहूवर, सबंध प्रांतावर पडला.  सर्व घरी कुणी ना कुणी अपाशी मेले अाणि कुणाचे दिवाळे निघाले नाही का कधी ?  अनेकांचे निघते.  मग अामच्याच घरात हा सावजी, हा तुका असे का निर्माण व्हावे ?

एव्हाना सबंघ डोंगर पालथा घालायला हवा होता, तुकाला शोधायला.  पण पाय गळाले होते.  मी जरा उंचावर बसलो होतो.  तेथून देहू गाव झाडीतून डोकावताना दिसत होते.  अधूमधून नदीचे पात्र चकाकत होते.  गावाबाहेर निघालेली एक चाकोरी अाणि दोनतीन पायवाटा दिसत होत्या.  वेशीजवळचा अांबा दिसत होता.

सावजीने घर सोडला तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी अामचे सगळे कुटुंब या अांब्यापर्यंत अाले होते.  घर सोडायचे सावजीचे कित्येक दिसत चालले होते.  अाईवडील गेले.  मग त्याची बायको मेल्यावर तो म्हणाला,

“अापल्या अाईवडिलांना दु:ख होईल म्हणून मी ते असेपर्यंत घर सोडले नव्हते.  ते गेल्यावर माझ्या बायकोला दु:ख होईल म्हणून मी थांबलो.  अाता बायको मेल्यावर विठ्ठलाने त्याही जबाबदारीतून मुक्त केले अाहे.  माझा निघण्याचा दिवस अाला.”

तो प्रयाणाची तयारी करू लागला.  तयारी ती काय ?  एक घोंगडी, धोतर-कुडते, लोटा, गंध, भस्म, टाळ.  निघण्याच्या दिवसाच्या अादल्या रात्री तो जेवला नाही.  “उद्या निघणार” एवढेच म्हणाला.  मग बऱ्याच रात्रीपर्यंत तो देवघरासमोर बसून होता.  मनातून तो अस्वस्थ होता.  त्याला विरक्ती तर बाहेर काढीत होती, पण माया सुटत नव्हती.  किती झाले तरी अाम्ही त्याचे भाऊ होतो.  रात्री दोनतीन वेळा तो उठला.  बाहेर जाऊन अाला.  घराभोवती त्याने दोनचार फेऱ्या घातल्या.  एकदोनदा अाम्ही झोपलो होतो तिथे कोपऱ्यात उभे राहून त्याने अाम्हा सर्वंकडे पाहिले.  नजरेने त्याने सर्वांना कुरवाळून घेतले.

मी डोळे किलकिले करून पाहत होतो.  अाम्ही माजघरातच झोपलो होतो.  त्याने काही वेळ तुकाकडे टक लावली.  मग माझ्याकडे.  मग स्वयंपाकघराच्या दारात डोकावून अाला.  देवघरासमोर उभे राहून त्याने वारंवार देवांना नमस्कार केला.  नंतर अोटीवर गेला.  मी हळूच उठून अोटीकडे अालो.  सावजी अोटीवर एका खांबाला टेकून बसला होता.  त्या अंधारात त्याचे तोंड नीट दिसत नव्हते.  डोळे पाणावलेही असतील त्याचे.  तो बसला होता, त्याच्या डोक्यावरच्या खुंटीला त्याने अापले बोचके टांगले होते.  कोपऱ्यात त्याची तेहमीची काठी होती.  त्या वेळी मी बावरून तसाच मागे वळून येऊन परत झोपलो नसतो, पुढे होऊन त्याच्या पायाशी बसलो असतो, त्याला जाऊ नको म्हटले असते, रडलो असतो, तर कदाचित त्या क्षणी सावजी विरघळला असता–गेलाही नसता.

पण मी बावरून अोटीच्या तोंडापासून परत फिरलो.  नेहमीच्या हट्टाप्रमाणेच तो हाही हट्ट पुरा करणार असे वाटले.  वडिलांनी अनेकदा विनंत्या करूनही त्याने घरचा धंदाउदीम हातात घेतला नव्हता हे मी ऐकले होते.  अाणि त्याच्या बायकोने त्याला विरक्तीपासून वळविण्याचे प्रयत्न केले नसतील का ?  पण तरीसुद्धा मला वाटते, एखादा असा क्षण येतो की मन अधू होते.  एक बोटाने तुटते.  तो क्षण तो होता.

तो बोट मी पुढे केले नाही.

सकाळी सावजीने गाठोडे डोक्यावर घेतले.  दारातून पुन्हा एकदा देवांना नमस्कार करून तो बाहेर पडला.  अाम्ही घरचे सर्व त्याच्या मागे होतो.  वेशीच्या अांब्याकडे येणाऱ्या रस्त्यावर अाम्ही सावजीमागे चालत असलेले मला दिसू लागलो.  पुढे सावजी गाठोडे घेऊन, त्यामागे तुका अाणि मी, त्यामागे अामची मुले अाणि बायामाणसे.  अांब्याशी येईपर्यंत सावजीने एकदाही मागे वळून पाहिले नाही.  तुका माझ्याशेजारून मान खाली घलून चलत होता.  मी भिरभिर सर्वांकडे पाहत होतो.

सावजी संथपणे भजन करू लागला.  त्या संथ सुराने बांध फुटले.  अजून तो सावजीचा अभंग कुणी म्हटलेला ऐकला की माझा गळा दाटून येतो.  कापरे भरते.  सावजी भजन करू लागला अाणि प्रथम बाया रडू लागल्या.  तुकाच्या डोळ्यांतून अश्रू अोघळू लागले.  मी रडू लगलो.  गोंधळून मुलांनी रडण्यास सुरूवात केली.

अामचे ते सावजीला पोहोचवायला जाणे जिवंत माणसाला शेवटचे पोहोचवायला जावे तसे होते.  अाम्ही घरी राहणार होतो व तो यात्र करीत कुठेतरी दूर, दृष्टिअाड हिंडत राहणार होता.  तो असा कुठेतरी देहाने अाहे याचे दुःख तो गेल्याच्या दुःखापेक्षाही जास्त होते.  अामची–घरची–सर्वच माया त्याने सोडली होती.  अाम्हांला मात्र त्याची माया सुटत नव्हती.

वेशीच्या अांब्याशी असल्यावर सावजीने डोक्यावरचे बोचके खाली ठेवले.  वळून तो म्हणाला,

‘माघारी वळा.  मला निरोप द्या.’

तो थांबताच अाम्ही सारे होतो तिथेच थांबलो.  मग तुका पुढे झाला.  त्याने सावजीच्या पायावर लोळण घेतली.  मीही अावेगाने पुढे होऊन जमिनीवर पडलो.  मुले पुढे अाली, पाया पडली.  बायांनी जमिनीला डोकी टेकून नमस्कार केले.  सारी रडू लागली.  गावकरी चार अाले होते तेही सावजीच्या पायाला लागले.

सावजीने तुकाला मिठी मारली.  पण त्याचे डोळे कोरडे होते.  तो म्हणाला,

“तुका !  व्यवसाय नीट संभाळ.  देवांचे नीट कर.  देवळातील देवाची पूजाअर्चा नीट होते ना पाहा.  सार्वांचा नीट संभाळ कर.  लहान वयात तुझ्यावर हा भार पडलाय.  ते ठीक नाही, मला कळतेय.  पण मी विरक्त झालोय.  मला व्यवहार उरला नाही.  केवळ तुम्हांला बरे वाटावे म्हणून मी हा उपदेश करतोय.  मला हा संसार खोटा वाटतो.  सगळी माया वाटते.  मला काही अोढीत नाही.  इतके दिवस अापल्या अाईवडिलांना वाईट वाटेल अाणि बायकोची जबाबदारी होती म्हणून मी संसारात राहिलो.  अाता वाटतेय, उगीचच राहिलो.  ते वाटणे माया होती.  पण उशिरा कळतेय.  पांडव महाप्रस्थानाला निघाले तसा मी निघालो अाहे.  अाता हिंडत राहायचे.  ही भूमी काय, दुसरी भूमी काय ?

“मला खरोखर पूर्ण वैराग्य अालेय.  माझ्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका.  तुम्हांला माझ्या वैराग्याबद्दल दुःख होतेय तसे मलाही तुम्ही मायेत गुंतला अाहात याचे दुःख होतेय, हे ध्यानात अाणा.  इथे माझा उपयोग नाही.  अाणि उपयोगाचे अाणि निरुपयोगाचे असे काही उरलेलेही नाही.  मला सर्व शून्य दिसतेय.  ही इंद्रायणी, हे गाव अाणि मी जिथे जाईन ते ते सर्व शून्य अाहे.  मी शून्यातून चालत जाणार.  चालणेही खरे नाही.  देहत्याग करावा तर ते पटत नाही.  मी मेलो असतो तर तुम्हांला काही दिवस दुःख झाले असते, मग विरले असते.  मी मेलो असे समजा.  जगणे जगायचे अाहे म्हणून मी जगत अाहे.  जगने जगत, मला माझा शेवट पाहायचा अाहे.  नमस्कार !”

हात वर करून त्याने सर्वांना नमस्कार केला.  मग गाठोडे उचलून तो चालू लागला.  त्याने एकदाही मान वळवली नाही.  काही अंतर जाऊन त्याने इंद्रायणी अोलांडली अाणि दरडीवर चढून पलीकडच्या उताराखाली नाहीसा झाला.  अाम्ही कितीतरी वेळ तो गेला त्या दिशेकडे पाहत उभे होतो.

त्यानंतर मला अाठवते की, सावजीबद्दल तुका कधी बोलला नाही.  मला त्याचे अाजही नवल वाटते.  की असे निघून जाणाऱ्याबद्दल बोलायचे नसते ?  की निघून जावे असे वाटण्याची तुकाने धास्ती होती अाणि त्याच्या मनात सावजीचे जाणे अायुष्यभर सतत रेंगाळत होते ?

अाता सावजीच्या प्रयाणाचा प्रसंग डोळ्यापुढे धावत असता माझ्या मनात अाले, माणूस कुणाकुणाला, कशाकशाला तरी बांधलेला असतो.  सावजीने अाईवडील, बायको यांच्यापुरते बंधन पाळले व नंतर चालत राहण्याचे बंधन घालून घेतले.  दादा !  तू असे कसलेच बंधन पाळणार नाहीस का ?  तुझी बायको गर्भार अाहे त्यासाठी तरी ये.

हताशपणे “तुका !  दादा !”  हाका मारीत मी झाडाखालून उठून डोंगराच्या चढणीला लागलो.

|| १३ ||

डोंगर चढताना मी रुळलेली पायवाट सोडून मुद्दाम अाडवाटा जवळ केल्या.  डाव्याउजव्या हाताची खड्डे-कबदाडे-झुडपे पाहत वर जात राहिलो.  माझ्य पायात काही नव्हते अाणि करवंदीच्या जाळीतून जाताना, त्यात फांद्या बाजूला करून शोधताना, तोंडावर काट्यांनी अोरखाडे काढले, पायातही काटे गेले, पण भान नव्हते.  मला वाटत होते की, अशाच एखाद्या जाळीत, खबदाडात तुका सापडणार.  तो कोणत्या अवस्थेत सापडेल याची मात्र मला भीती वाटत होती.  डोंगर चढून गेल्यावर वर तुका सापडणार नाही अशी माझी खात्री होती.  जिथे तुका बसे तो कातळ रिकामा दिसेल.  तिथे बसून तुकाने ग्रंथवाचन केले.

डोंगरमाथ्यावर येऊन मी तुका बसे त्या जाग्यावर येऊन बसलो.  अाणि माझ्या मनात अाले, मी तुकाच्या जागी असलो तर काय करीन ? कुठे जाऊन बसेन ?

मला कळत होते, तुकाच्या अायुष्यात दोन क्षण जाऊन बसणे अशक्यप्राय होते.  जेव्हा तो संसाराच्या हौसेत होता तेव्हा क्षण न दवडता हौस करीत होता.  जेव्हा तो विरक्त झाला होता तेव्हा क्षण न दवडता विठ्ठलाचे विचार करू लागला.  त्याच्या मनाचे पाखरू ज्या फांदीवर बसले तिथे रमत गेले.  ते विलक्षण, अनावर हट्टी होते.

असे हे त्याचे मन मी कसे पकडणार होतो ?  तो नाहीसा झाला तेव्हा त्याच्या विचारांची परिणती कुठपर्यंत, कशी झाली असेल ?  काही सुचेना.

विचार झेपेनासे झाले.  मग तुकाचे काय काय झाले असेल याच्या कल्पना मनात येऊ लागल्या.  लहानपणापासून कल्पनांत मी फार घाबरा होतो.  जो दूर असेल त्याच्याबद्दल नाना काळज्या करण्याची मला सवय होती.  घरचे जनावर जरी वेळेत घरी अाले नाही तरी मी भयंकर अस्वस्थ होई.

अाता मला वाटू लागले, तुका बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल अाणि वाहत गेला असेल.  किंवा नदीत शिरला असता सुसरीने अोढून नेऊन तळातकपारीत त्याचा देह खोवून ठेवला असेल.  सवडीने ती भक्ष्य खात राहील.  किंवा नदी अोलांडून पलीकडे चढून जाऊन सरळ चालत राहिला असेल अाणि एखद्या जनावराने झडप घालून त्याला उचलून नेले असेल.

त्याने बेभान होऊन नाचतगात म्हटलेले गेल्या महिन्यातील अभंग माझ्या डोळ्यापुढे अाले.  त्यांत स्वत: देव अापल्याला विमानातून न्यायला अालेयत असे त्याला वाटत होते.  विमान येणार म्हणून तो उत्कटतेने इंद्रायणीच्या तीरावर जात होता.  वैकुंठाला जातो म्हणून तो सारखा सर्वांचे निरोप घेत होता.

विमान येणार हे त्याला खरे वटत असेल यात शंका नाही.  अापणच कल्पना करायच्या व अापणच नवीनवी विश्वे तयार करायची त्याची विलक्षण हातोटी होती.  अापणावर परस्त्रीने मोह घातला तर … असा विचार त्याच्या मनात अाला अाणि लगेच असे घडून अापण त्या मोहातून निसटलो असा त्याने अभंग रचला.  अशी स्त्री नव्हती अाणि मोहही नव्हता, मी त्याचा धाकटा भाऊ संगतो.

त्याचप्रमाणे अाताही विमान नव्हते अाणि वैकुंठही नव्हता.  तो इथेच कुठेतरी सापडणार यात मला संशय नव्हता.  गेल्या वेळी अाम्ही सात दिवस शोधले होते.  अाता वेळ अाली तर मी सतरा दिवस शोधिन.

पण म्हणूनच ही शोधाशोध का अाली, तुका असा का झाला ?–सारखा हा माझ्यापुढे प्रश्न येतो.  अाणि दर वेळेला मी त्याचे वेगळे उत्तर शोधतो.

ते दोन मृत्यू झाले नसते तर ?  तुका असा झाला नसता.

अामचा पिता अवचित गेला.  बैलावर गोणी लादून तुका व्यापाराला कोकणात गेला होता.  वडिलांचे अौर्ध्वदेहिक उरकून अाम्ही त्याची वाट पाहत होतो.  घर उदास झाले होते.  सावजी अधिकच पूजाअर्चा-भजनात मग्न झाला होता.  अाईने अंथरूण धरले होते.  मुले दबून होती.  मोठी माणसे मंद झाली होती.  कामात मन गुंतवीत होती.  अाणि भिंतीशी शून्य डोळ्यांनी बघत बसत होती.

तुका अालेला मी अातून पाहिला.  त्याअाधी बैलांच्या गळ्यांतील घुंगुरांच्या विशिष्ट किणकिणीने तुका अाल्याची सूचना मिळाली होती.  सगळे घर चूपचाप झाले होते.  वडील गेल्याचे तुकाला कुणी सांगायचे !  प्रत्येकाच्या मनात अाले असावे.  तुकाने बाहेरच्या अंगणात बैल थांबविले.  मग तो गोणी उतरवू लागला.  तेव्हा धावत पुढे होऊन मी त्याला हात द्याला गेलो.  गोणी उतरवून अाम्ही अोटीवर अाणून ठेवल्या.  मग बैलांना विहिरीवर नेऊन अाम्ही पाणी पाजले.  बेड्यात नेऊन बांधले.  गवाणीत ताजे गवत टाकले.  वेसणीचे कासरे सोडले.  ते अगदी व्यवस्थित गुंडाळी करून खुंटीवर अडकविले.  माझ्या घशाशी अावंढे दाटून येत होते.  “दादा !  बाबा गेले रे !”  मला सारखे अोरडावेसे वाटत होत.  पण शब्द फुटत नव्हता.  तुका बैलांना गोंजारू लागला.  त्याने त्यांच्या पाठीवरून, तोंडांवरून, अायाळीवरून ममतेने हात फिरविला.  ते पाहत असता माझा बांध फुटला. मी अावेगाने अोरडलो,

“दादा !”

तुकाने चमकून माझ्याकडे पाहिले.  मी सदऱ्यात तोंड लपवून हुंदके देऊ लागलो.  तुका झर्रकन माझ्याकडे अाला.  माझ्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणाला,

“काय झाले कान्हा ?”

“बाबा गेले रे !”  मी हुंदक्यात अोरडलो.

तुकाचा डोक्यावरचा हात एकदम खाली अाली.  मी वर पाहिले.  ताठ नजरेने तो समोर पाहत होता.  त्याचा भकास झालेला चोहरा पाहून घाबरून त्याला हलवीत मी म्हणालो,

“दादा–दादा !  असा काय बघतोस ?”

मग माझ्याकडे न पाहता तुका घरात गेला.  अातल्या खोलीत अाईचे अंथरूण पडले होते.  तुकाला पाहताच तिने हंबरडा फोडला.  तुकाने धावत पुढे होऊन अाईला मिठी मारली.  “काय केले रे हे देवाने ?”  अाई अोरडली.  तिने गळा काढला.  सगळे घर रडू लागले.

तुका अाईचे डोके मांडीवर घेऊन बसला.  मी हळूच उठून बाहेर अालो.

बैलांवरच्या, अोटीवर अाणून ठेवलेल्या गोणी व्यवस्थित लावल्या.  त्यांतच पैशांची थैली होती.  ती अात अाणून कपाटात ठेवली.  कुणीतरी हेही करायला हवे.

इतक्यात तुका उठून बाहेर अाला.  अाणि अनवाणीच नदीच्या रस्त्याने चालू लागला.  मी चमकून हातातले काम टाकून त्याच्या मागे गेलो.

एका उंचवट्याशी येऊन तो थांबला.  तिथून स्मशान हाताशी दिसत होते.  मी तुकाच्या मागे जाऊन उभा राहिलो.  वडिलांच्या चितेची राख अजून तिथेच होती.  तिकडे पाहत असता तुकाच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.

कितीतरी वेळ तुका रडत होता.  मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभा होतो.

तुका तेव्हा रडला.  मग अाईच्या वेळी रडला.  त्यानंतर तो कधी असा रडलेला मला अाठवत नाही.

|| १४ ||

ते दोन मृत्यू झाले नसते तर ?  वडिलांचा,  नंतर अाईचा.  पुन्हापुन्हा माझ्या मनात येऊ लागले.  वडिलांनंतर वर्षचे अात अाई गेली, ती मात्र तुकाच्या मांडीवर.  या दोन मृत्यूंनी पुढचा तुका घडला.  माझी खात्री अाहे.

अाई गेल्यानंतर त्याने केलेला विलक्षण शोक !  स्मशानातून मी व सावजीने त्याला दोनही बाजूने धरून घरी अाणले.  घरी येताच अोटीवरच तो भिंतीपाशी कोसळला.

तुकाने तेव्हा इतके दुःख केले की मला दुःख करायला त्याने सवडच ठेवली नाही.  सावजी विरक्त, तुका असा दुःखात.  मी मुकाट्याने घरातली कामे हाती घेतली.

तुकाच्या त्या वेळच्या अतीव दुःखाचा मला उलगडा होत नाही.  दादा !  तुला ठाऊक नव्हते का की कुणाचेच अाईबाप जन्माचे राहत नाहीत.  अापले अाईवडील जातात.  अापल्या मुलांचे अाईवडील, म्हणजे अापण जातो.  हे असेच होत असते, ही जगरहाटी अाहे.  असेच जग जगत राहत जात असते.  अरे !  तुझा अहंकार तरी केवढा होता ?  की साध्या माणसालाही ज्या गोष्टी कळतात, त्या न कळण्याइका तू अज्ञानी होतास, साधाभोळा होतास ?

मी हे तेव्हा तुकाला बोललो नाही.  पण दिवसभर त्याच्याजवळ बसून होतो.  संध्याकाळी तुका जरा शांत झाला.  माझ्याशी बोलण्याइतपत शांत झाला.  अापले दुःख अोकीत तो म्हणाला,

‘कान्हा !  बाबा गेल्यावर अाईने विचारले, ‘हे काय झाले रे ?’  मी तेच विचारतो, हे काय झाले ?  बाबा का गेले ?  अाई का गेली ?  सावजीने अंग काढून घेतल्यावर किती हिरीरीने मी उदीम करू लागलो.  हौसेने व्यापार केला.  कसोशीने सावकारी केली.  थैल्या भरभरून होन घरी अाणले.  वडिलांना धन्य वाटले अापल्या.  अाईने कुरवाळले.  अाणि काय झाले ?  मला वाटले, मी उद्योग नीट संभाळू लागलो अाहे.  वडिलांना सुख देत राहू.  मोठ्या वैभवात जगू.  सगळे उत्तम होत राहणार.  कष्टाची फळे मिळणारच.  पण काय झाले ?  काय मिळाले ?  धन मिळाले.  अाईबाबा गेले.  त्यांचा मृत्यू टाळण्यास धनाचा उपयोग झाला नाही.  भरत जवळ नसता दशरथ गेला, तसा मी जवळ नसता पिता गेला.  त्या वेळी मी जवळ अाहे की नाही याची तमा मृत्यूने बाळगली नाही.  भरलेल्या सुखी संसारातून बाबा-अाईला कुणी उचलून नेले ?  हा मृत्यू कोण अाहे ?  अाणि त्याला माणसांच्या भावनांची चाड का नाही ?  अाम्ही करतो त्याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही, कान्हा !  किती भयंकर अाहे हे !”

अामच्या अाईवडिलांच्या मृत्यूनंतर तुका पुन्हा कधी पहिल्यासारखा झाला नाही.  दोन मृत्यूंनी त्याच्या अहंकाराला पहिला धक्का दिला.  त्याच्या नजरेत तेव्हापासून मृत्यूचा विचार डोकावू लागला.  मृत्यूची जाणीव म्हातारपणीच यावी.  बाळपण, तरुणपण, म्हातारपण क्रमाने जात शेवटी मृत्यूचा विचार मनात यावा.

पण भरल्या वयात मृत्यूचे विचार सुरू झाले अाणि तुका अाम्हांला हरवला.

|| १५ ||

एकीकडे डोके या असल्या विचारात असता माझे डोळे वाढत्या उन्हात परिसर शोधत होते.  डोळ्यांवर हात ठेवून मी कुठे तुकाची चाहूल कळते का पाहत होतो.  ऊन उदास व कोरडे वाटत होते.  त्यात दिसणारे सगळे त्या वेळी पोकळ वाटत होते.  निसर्ग तोच असतो.  मनःस्थिती बदलली की वेगळा दिसतो.  किती निरर्थक वाटत होते मला त्या वेळी !  ज्या उन्हात गवत कापत असता, नांगरत असता, खणत असता, घामाने निथळत असता, शक्ती कमी न होता वाढल्यासारखी वाटली होती, जे ऊन जीवनाने रसरसले वाटत होते, ज्या उन्हाने मानेच्या, हातावरच्या, पायांवरच्या शिरा टरटरा फुगल्या होत्या, ज्या उन्हात मधूनच सूर्य किती कललाय हे बघताना, ऊन पाडणाऱ्या त्या सूर्यनारायणाकडे बेदिक्कत टक लावली होती, ते ऊन अाता पार निराळी भावना देत होते.

अाता त्याच उन्हाने जीवनातले सगळे सत्त्व काढून घेऊन पोकळी निर्माण केली होती.  अाता वाऱ्याने डुलणारे गवत, नवी पालवी, उडणारे पक्षी व्यर्थ वाटत होते.  सृष्टीत सार न वाटणे याइतकी भयाण भावना कुठली नसेल.  तुका सापडला की ही भावना कुठल्याकुठे जाईल, मला कळत होते.  अाणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणत होतो, तुका !  तू परत ये.  परत ये–परत ये.

खाली दूर इंद्रायणी दिसत होती.  तिचा वाहता प्रवाह कळत नव्हता.  झाडी कमी होती त्या फटीतून तिचे निळे पट्टे डोकावत होते.  गावाकडून तीन माणसे नदीकडे उतरत होती.  इतक्या दुरून त्यांतला एक मी तत्काळ अोळखला.  तो रामेश्वरभट होता.  रामेश्वराला पंचक्रोशी मानीत होती.  हा पंचाहत्तर-ऐशी वर्षांचा म्हातारा अजून उमेदीने हालचाली करीत होता.  हा वाघोलीचा.  पण अाता पारमार्त्थिक होऊन अाळंदीस येऊन राहिला होता.  त्याची वारंवार देहूस अामच्याकडे खेप असे.  तुकोबावर त्याचे प्रेम होते व तुकाही त्याच्यावर प्रेम करी.  पहिल्या भेटीपासूनच त्यांची मने जुळली होती.

नदीकडून येणाऱ्यांपैकी दुसरे दोघे, त्यांना नदी अोलांडल्यावर मी अोळखले.  त्यांतला एक मंबाजी.  इतकी वर्षे तुकाचा मत्सर करून अाता तो तुकाला मानू लागला होता.  पण माझा त्याच्यावर अजूनही विश्वास नव्हता.  खरे मी त्याला दुरूनच अोळखायला हवे होते.  त्याच्या अंगावर इतके भस्म लावलेले असे की तो न दिसता भस्माचे पट्टे उभे अाहेत असे वाटे.  नाना तऱ्हेच्या माळा एकाच वेळी घालण्याची त्याला हौस होती.  त्याची भगवी वस्त्रे कधी विटलेली नसत अाणि स्वच्छही असत.  त्याचे बोलणे फार गोड.  अध्यात्म हा त्याला धंदा होता.  ज्यांना असा बुवा लागतो त्यांना तो योग्या होता.  लोक त्याच्या नादी होतेही.  पण तुकामुळे अापले नाव कमी होईल ही भीती त्याला सारखी होती.

अालेला तिसरा माणूस होता बहिणाबईचा नवरा.  बायकोच्या हट्टासाठी तो बायकोबरोबर गेले वर्षभर देहूत येऊन राहिला होता.  अाणि ती तुकासाठी अाली होती.  बिचाऱ्य या तिच्या नवऱ्याला उगीचच कथाकीर्तने ऐकत संतमंडळीत वावरावे लागत होते.  बायकोला तो कधी कुठे एकटी सोडत नाही अशी त्याची गावात ख्याती होती.  अामच्या अानंदअोवरीत कीर्तनाच्या वेळी तो पेंगत बसलेला असायचा.

|| १६ ||

त्या तिघांचे लक्ष वेधायला मी जोरजोराने हात वर केले.  तिघेही तुकाला शोधायला बाहेर पडले अाहेत, माझी खात्री होती.  कारण तुका हरवला ही बातमी देहूभर कालच झाली होती.  तिघे नदी अोलांडून, मी होतो त्या तीराला अाले होते.  मी कुडते काढून ते जोरजोराने हलवीत डोंगर उतरून खाली अालो.  त्यांनी मला पाहिले असावे.  तेही अाता वेगाने डोंगराकडे येऊ लागले.  मी उतारावरून धावत येत असलयाने नदीतीरापासून ते फार पुढे येण्यापूर्वीच मी त्यांना गाठले.  पुढे होऊन मी रामेश्वरभटाला पायाशी वाकून नमस्कार केला.  मी म्हटले,

“अजून पत्ता नाही.”

रामेश्वरभट अाशीर्वाद देत पुटपुटत म्हणाले,

“घाबरू नकोस.  अाता अापण चौघे अाहोत.  अाम्ही डोंगराच्या बाजूने वळसा घेऊन येतो.  तू तीरावरून हळूहळू चालत राहा.  अाम्ही तुला गाठतो.  तू दमलाही असशील.”

तिघे डोंगराच्या मेरेने निघाले.  मी इंद्रायणीच्या काठाकाठावरून हळूहळू चालत राहिलो.  मला खूप विचार करायचा होता.  तुका सापडल्यावर तो पुन्हा हरवणार नाही याची मला युक्ती काढायची होती.  अाणि गुण्यागोविंदाने त्याने अामच्यांत दिवस काढावे असे मनात होते.  त्याचे अायुष्य शांतपणे जावे असे मला वाटत होते व अामचेही.  मागे जे झाले ती वावटळ ठरावी, पडलेली झाडे उचलून वाटा मोकळ्या कराव्यात, उडालेले छप्पर पुन्हा व्यवस्थित करावे.

ही वावटळ शांत करणे किती कठीन अाहे हे मला समजत होते.  या वावटळीच्या अाधी जो उष्मा झाला, जे तरारून ढग अाले ते या मंडळींनी पाहिले नव्हते.  ही मंडळी अात्ताअात्ता त्याच्या अायुष्यात अाली.  तुकाचे कवित्व सुरू झाल्यावर अाली.  ते गर्जू लागल्यावर अाली.  त्याअाधीचा तुका यांच्यापैकी एकालाही ठाऊक नाही.  खरे कल्लोळाचे दिवस तेच होते.

तुका अाणि अाम्ही त्याच्या कुटुंबातली मंडळी तुकाचे कवित्व सुरू व्हायच्या अाधी केवढ्या यातनांतून गेलो हे यांना कुणीतरी सांगायला हवे, माझ्या मनात अाले.  त्या वेळी कुणाला ठाऊक होता तुका ?  कुणाला ठाऊक होते तो कवित्व करणार ?  ज्या वेळी फक्त दुःख, हाल, कष्ट व अपमान सोसायचे होते तेव्हा त्याला अामच्याशिवाय कुणी नव्हते.  अाणि अाईवडील गेल्यावर ‘अति दुःखे दुःखी’ असताना संसाराचा गाडा रेटण्याचा तुकाने यत्न केला.  त्याच्या हाताखाली राहून तो सांगेल त्याप्रमाणे कामे पुरी पाडण्याची मी धडपड केली.  तेही दिवस कुणी पाहिले नव्हते.  रामेश्वरभटाने नाही–मंबाजीने नाही–बहिणाबाईच्या नवऱ्याने तर नाहीच नाही अाणि कुणी पाहिलेच असले तर दुरून.  तिऱ्हाइताच्या नजरेने.

तेव्हा मोरे कुटुंब एक सधन महाजन कुटुंब होते अाणि अाम्ही महाजनांची मुले होतो.  वडिलांनंतर तुका महाजन झाला तेव्हाही अर्ध्या गावाचे सावकार होतो.  बाहेरची परिस्थिती वाईट होती.  पण अाम्हांला वाईट नव्हती.  कुळे जर्जर होती.  पण कुळे जर्जर असतात तेव्हाच सावकाराचे फावते.  अाणि कुळे अामच्यामुळे जर्रर नव्हती.  सारा डोईजड होता.  त्याची वसुली जुलुमी होती.  परचक्रे येत होती.  राजे जुलुमी होते.  शत्रूंनी येऊन अाज हे गाव लुटले, उद्या ते लुटले असे कानांवर येत होते.  अामचे गाव बाजूला होते.  अाम्हांला तेवढी झळ नव्हती.  चांगले सुखवस्तू कुटुंब म्हणून लोक अामच्याकडे पाहत होते.

पण सावजीने गृहत्याग केला त्याच्या पुढच्या वर्षी दुष्काळ पडला.  तीन मृत्यू व एक गृहत्याग यांतून सावरायला तुकाला सवड मिळाली नाही.  लोक नंतर म्हणत होते–असा दुष्काळ शंभर वर्षंत पडला नव्हता.  त्यात मोऱ्यांचे वैभव गेले.

|| १७ ||

दुष्काळाचे ते पहिले वर्ष !

अाम्ही शेते नांगरून ठेवली होती.  नजरा अाकाशाकडे होत्या.  उन्हे रोज रोज जास्तच तापत होती.  अाकाश जमिनीला करपवीत होते.  जमीन अाकाशाला तापवीत होती.  इंद्रायणी डोळ्यांसमोर अाटत चालली होती.  प्रथम जागोजागी प्रवाह थबकला.  मग एकेक करीत ती डबकीही सुकली.  रखरखीत वाळू तेवढी पात्रात चकाकत राहिली.  लोकांनी वाळूत डबरे खणले.  गवत केव्हाच गेले होते.  झुडपे उरलीच नव्हती.  गुरांनी दोन्हींचा केव्हाच फन्ना उडविला होता.  मग खालच्या मानेने ती रानोमाळ काडी काडी शोधीत हिंडू लागली.  मग नदीत येऊन वाळू हुंगू लागली.  पाहतापाहता त्यांची पोटे अात गेली.  मांसल पुठ्ठे वितळले.  कातडींना तंबूसारखी उचलीत हाडे उंच डोकावू लागली.  मग एक मेलेले ढोर सापडले.

दुष्काळाचा पहिला बळी पडला.  ते ढोर पाहायला सारे गाव लोटले.  त्या ढोराचा फक्त हाडांचा सापळा राहिला होता.  फुगीरपणा फक्त पोटाचा होता.  विषारी पाला खाऊन त्याचे पोट फुगले–लोक म्हणत होते.

या दुष्कालातच, तुका !  तुझी पहिली बायको अन्नअन्न करीत तडफडत मेली.  चतकोर-अर्ध्या भाकरीसाठी ती तडफडत होती.  ती दमेकरी होती.  अापण पाला उकडून खात होतो.  तो तिला पचेलसा नव्हता.  या अापल्या एके काळी समृद्ध महाजनांच्या घरात तांदळाचा दाणा नव्हता.  बाजरीचा, ज्वारीचा कण नव्हता.  हातात फडके

घेऊन तू गावात कुणी मूठभर तांदूळ, मूठभर ज्वारी देतोय का पाहत हिंडत होतास.  बायकोचा जीव वाचवण्यास तू भिक्षापात्र अवलंबले होतेस.  सकाळ-दुपार गाव हिंडून तू परत येत होतास.  ज्यांच्याकडे अापले येणे होते तेही तोंड चुकवीत होते.

त्या वेळी एका कुटुंबाचा मुख्य याशिवाय तू कुणी नव्हतास.  गावातील इतर कुटुंबपतींसारखा.  त्यांच्याप्रमाणेच तुझ्या डोक्यात अापले कुटुंब जगवायचे याशिवाय काही नव्हते.  इतरांसारखीच स्वत:च्या कुटुंबापुरती तुझी तडफड होती.  बायकोला वाचवायला तू अटीतटी केलीस.  मग तिचे मूल वाचवायला.  त्याला दूध मिळत नव्हते.  घरात गाय उरली नव्हती.  जनावरे सर्वांबरोबर रानात सोडली होती.  डोळ्यांसमोर ती मरताना पाहवत नव्हते म्हणून.

त्या वेळी दादा !  तू विठ्ठलवेडा नव्हतास.  अामच्याइतपत तुझी विठ्ठलावर श्रद्धा होती.  तुझे कवित्वही जागृत झाले नव्हते.  त्या वेळी अाज जी चार संतमंडळी तुझ्या भोवती अाहेत ती नव्हती.  लहानपणी जसा न खेळता येणारा खेळ जिद्दीने खेळलास, अंगावर पडलेली सावकारी चोखपणे संभाळलीस, तसाच दुष्काळाचा तडाखा तू हिंमतीने अंगावर घेत होतास.

तो ‘दादा’ मला अावडत होता.  अजूनही तोच अावडतो.  अन्नअन्न करीत पहिली बायको व मुलगा मेल्यावर भयंकर दुःखाने तू हतबल झालास.  तुला इतके हतबल मी कधी पहिले नव्हते.  तरी तो ‘दादा’ मला अावडला.  कारण माणसाने मणसासारखे वागायला हवे, दादा !  अशा संकटात अाम्ही जसे वागू तसा तू वागत होतास.  अाणि तू हतबल झाल्यावर घराचा कारभार मी जिद्दीने अंगावर घेतला.

त्या वेळीच सावकार अापल्या दाराशी धरणे धरून बसले.  अापले येणे येत नव्हते, घेणेकरी दार सोडत नव्हते.  त्यामुळेच दादा !  अाकाश कोसळले.  अापले दिवाळे निघाले.

तरी काय बिघडले दादा !  दुष्काळ संपतो, पुन्हा पाऊस पडतो, धान्या येते.  व्यवहार सुरू होतात.  पुन्हा सावकारी सुरू करता येते.  वाडवडिलांची मिराशी वाया जात नाही.

पण तू वाडवडिलांची ही सावकारीची, महाजनकीची मिराशी वापरली नाहीस.  तू वापरलीस वाडवडिलांची विठ्ठलाची मिराशी.  अाणि तीही केवढ्या मोठ्या अट्टाहासाने !

दुष्काळानंतर पहिला पाऊस पडला तेव्हा, मला अाठवले, मी या पायथ्याशी खाण्यासाठी कंद किंवा मुळे किंवा पाला मिळतोय का पाहत होतो.  गेले काही दिवस अाकाशात ढग दिसत होते–जात होते अाणि अाशानिराशेचे खेळ करीत होते.  ढगांनी जोर धरावा म्हणून मनात प्रार्थना करीत होतो.

त्या दिवशीचा पहिल्या पावसाचा झटकारा मी जन्मात विसरणार नाही.  काही खाण्यासाठी खणायचे ते विसरून मी वेड्यासारखा भिरभिरणाऱ्या ढगांकडे पाहत होतो.  जरा दूर एका जनावराचा सापळावजा देह पडला होता.  अशी सापळा होऊन मृत झालेली जनावरे रोजच नजरेला दिसत होती.  वारा सुटला होता.  ढग लोटत चालले होते.  अाभाळ अाल्याने जमिनीचा उष्मा कमी झाला होता.  मग वादळ सुरू झाले.  धुळीचे भोवरे उंच गिरगिरत जाऊ लागले.  त्यांत वाळलेली पाने चकरा खाऊ लागली.  वाऱ्याकडे तोंड करून मी वारा पिऊ लागलो.

एकदम पावसाचे थेंब सडसडत पडू लागले.  ते तोंडावर घेत, खोल श्वास अोढीत मी नाचू लागलो.  मी कुडते काढून फेकले.  सर्वांगाला थेंबांचा स्पर्श होऊ दिला.  पावसाच्या थेंबांना जमीन भुकेली होती तशी माझी कातडीही भुकेली होती.  मला उन्मेष अाल्यासारखे झाले होते.  मी हात पुढे पसरून हातांत थेंब पकडू लागलो.  तळहातावर तेवढ्यात गार पडली अाणि हिऱ्याकडे पाहावे अशा लोभाने मी ती पाहू लागलो.  अाता सगळीकडे गारा पडण्यास अारंभ झाला.

वर तोंड करून गारांचा मारा खात मी बेहोष नाचत होतो.  गारांचा मारा कुर-वाळल्यासारखा लागत होता.  डोक्यावर टेंगळे अाली.  मी वाकून मूठभर गारा उचलल्या अाणि अाकाशाला अर्पण केल्या.  पुढच्या वर्षी वर्षादेवतेने पुन्हा अाम्हांस अशाच द्याव्यात म्हणून.  मग पुन्हा वाकून मी मूठभर गारा वेचून तोंडात टाकल्या, अोंजळभर धोतरात धरल्या.  कुडते उचलून त्यात गोळा केल्या.  नंतर गारा थांबून जोरात पाऊस सुरू झाला.  मी ठिबकत उभा राहिलो.

काही वेळाने पाऊस थांबला.  चहूकडून पाणी वाहण्याचे गोड अावाज येत होते.  मी डोक्यावरून अोघळणारे पाणी हाताने पुसून वर पाहिले.  जे ढोर मघा मी मेलेला सापळा समजलो होतो, त्या सापळ्याने मान वर केली होती.

दादा !  माझ्यासारख्या साध्या संसारी माणसाला अानंद होण्यास दुसरे काय हवे असते ?  देवाने पाऊस द्यावा, शेतात कणसे चांगली यावी, विहिरींना पाणी यावे, पोरेबाळे, बायको अानंदात सुखात असावी, सणसमारंभ थाटाने करावे–अाणखी काय हवे ?

|| १८ ||

दादा !  माझे हे खोटे अाहे का सांग !  अशा वाटण्यात काय चुकले सांग !  पण दुष्काळ संपून वर्ष संपायच्या अात तू अापले भंगलेले देऊळ दुरुस्तीला का काढलेस ?  पाऊस चांगला झाला होता अाणि तुझ्यासारख्या अनुभवी वाण्याला धंदा सहज उभा करता अाला असता.  पण दुकान उघडून सहाअाठ महिने झाले अाणि तू देऊळ दुरुस्तीला घेतलेस.

देऊळ हा अापल्या पूर्वजांचा ठेवा होता.  गावाबाहेर कुठेही उभे राहिले की प्रथम त्याचेच दर्शन होई.  दूर गावाला गेलेला गावकरी देऊळ दिसू लागताच गाव अाले म्हणून पाय जोराने उचली.  माहेरवाशिणीला दुरून ते देऊळ पाहताच माहेर अाले वाटून ऊर भरून येई.  पण दादा !  तू दुष्काळानंतर इतक्या लौकर त्याची दुरुस्ती हाती घेणे बरोबर नव्हते.  वर्षा-दोन वर्षांी दुकानातून पैसे निघाल्यावर ते काम करता अाले असते.  नाहीरती काही वर्षे ते भंगलेले होतेच.  दुष्काळानंतर तू दुकान उघडल्यावर मला वाटले, तू उभारी घेतलीस.  तू उभारी घेणार यात संशय नव्हता.  पराभव हा तुझ्या स्वभावात नव्हता.  तू जीवनाने अोतप्रोत भरलेला होतास.  जीवनातून जेवढे मिळेल तेवढे तू घेत अाला होतास.  ऊस गाळणारा जसा उसाचे कांडे जास्तीत जास्त पिळून घेतो, तसा तू चोखंदळ गाळणरा होतास.  तुला एकसारखा रस हवा होता.

देऊळ नीट करायला का घेतलेस हे त्या वेळी तू माझ्याजवळ बोलला नाहीस.  पण पुढे तू कवित्व केलेस त्यात, देवाचे देऊळ भंगले होते ते नीट करावे असे चित्ताला वाटले, असे लिहिलेस.  अाईवडील गेले त्याचे दुःख, बायकोचे दुःख, दुष्काळत झालेले अपमान, निघालेले दिवाळे, लोकांत चाललेली छी थूः–यामुळे तू दुःखी कष्टी होतास.  अशा वेळी माणूस देवाकडे वळतो; तसा तू वळलास का ?

तेव्हा तू बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हतास.  नाहीतर माझ्याजवळ काहीतरी बोलला असतास.  तेव्हा तुझी हालचाल मंद झाली होती.  तुझे टपोरे डोळे निस्तेज, उदास होते.  दुकानात बसायचास तेव्हा कुठेतरी टक लावून, शून्य नजरेने पाहत बसायचास.  गिऱ्हाईक अाले तरी तुला भान नसायचे.

दुकानातून भंगलेले देऊळ समोरच दिसायचे.  मग केव्हातरी मुलांनी चढून चढून किंवा ढोराने शिंगांनी धडक देऊन भंगलेल्या भिंतीच्या दोनचार विटा तुझ्या डोळ्यादेखत पाडल्या असतील.  तुझ्या मनात अापल्या पूर्वजांनी बांधलेल्या देवळाची अवस्था पाहून स्वतःच्या स्थितीची तुलना अाली असेल.  अापला संसार भंगलाय तसे हे देऊळही भंगले अाहे.  अाणि मग मनात अाले असेल की, भंगलेला संसार अापल्याला नीट करता येत नाही, निदान पूर्वजांचे देऊळ तरी नीट करावे.  पडलेल्या विटा अाधी तू वर नुसत्या रचल्या असशील.  तुला बरे वाटले असेल.

तुला तेव्हा एवढासुद्धा अाधार पुरे होता.  मग तू अंग मोडून देवळाच्या दुरुस्तीच्या मागे लागलास.  हाती जे थोडे द्रव्य होते ते त्यात घालू लागलास.  दुकानाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.  दादा !  गेल्या काही वर्षांत अापल्यावर ज्या अापत्ती अाल्या त्या दैवी होत्या.  पूर्वसंचितामुळे हे दारिद्र्य अाले असे धरून अाम्ही खाली मान घालून, पुन्हा चांगला काळ येईल असे धरीत संसार रेटीत होतो.  देवाला चांगला काळ अाण म्हणून भाकीत होतो.  कवडी-कवडी काळजीने खर्च करीत होतो.

म्हणूनच तू देऊळ बांधायला घेतलेस तेव्हा अाम्हांला तुझा राग अाला.  मी बायकोला म्हटले, प्रत्येक दमडी अापल्याला जगायला हवी अाहे अाणि दादा हातात द्रव्य अाले की देवळाकडे घालतोय.  कसे निभायचे अापले ?

तुझ्या बायकोने त्या वेळी प्रथम तोंड सोडले.  तिने ते द्रव्य अापल्या मोहेरून अापले कुटुंब सावरण्यासाठी अाणले होते.  ती तुला गोणी घेऊन व्यापारासाठी देशांतराला जाण्यास सांगत होती.  तीही सावकाराची लेक होती.  परिस्थिती अंगावर अाल्यावर वाण्याने कशी सावरायची असते हे तिला ठाऊक होते.  पूर्वी तू चांगला व्यापार केला होतास.  पुन्हा तेच करावे, पूर्वीचे येणे वसूल करायच्या मागे लागावे, असे तिला वाटत होते.

अाणि पहिल्यांदाच तू तिचे ऐकले नाहीस. भंगलेले देऊळ बांधीत राहिलास.  लोक परिस्थिती अंगावर अाली की नवस बोलतात अाणि नवसाला देव पावला की मगच नवस फेडतात.  पण तुका !  नवस न बोलताच तू फेडू लागलास.  तू देवावर अोझे घातलेस.  देवाशी झालेला तुझा व्यवहार अपूर्व होता.

तुझ्या स्वभावात बदल होऊ लागला होता.  अामच्यांतून तू काहीतरी वेगळा होऊ लागला होतास.  अाम्हांला ते कळले नाही.

|| १९ ||

डोंगरापलीकडून फेरा घेऊन शोधायला गेलेले तिघे मी नदीकाठावर होतो तिथे परत अाले.  अाम्ही सगळे सावलीत बसून, तुकाला कुठे शोधायचा याचा विचार करू लागलो.  रामेश्वरभट, बहिणाबाईचा नवरा, मंबाजी या तिघांतच खरी चर्चा चालली होती.  मी बाजूला गप्प ऐकत होतो.  मी तुकाचा भाऊ होतो.  ते शिष्य होते.  तुका म्हणत असे त्या संतजनांत त्यांची जमा होती.  ते तुकाला भावाहूनही जवळचे समजत होते.  त्यांच्या मते जन्माने तो माझा भाऊ असेल, जिजाबाईचा नवरा असेल, पण त्याचे खरे कुटुंबीय संतमंडळी होती.  त्यांच्या त्या कुटुंबात मला कधी शिरकाव मिळाला नाही.  कारण मी माझ्यामागे संसाराच्या जबाबदाऱ्या लावून घेतल्या होत्या व तुकाच्या अासपास राहणे मला नेहमी जमणार नव्हते.  तुकाचे कवित्व रोज मला सर्वांअाधी वाचायला मिळत होते.  त्यांच्या दृष्टीने मी केवढा भाग्यवान होतो.  पण कवित्वाचा मी उपयोग करून घेत नव्हतो, म्हणून मी दुर्दैवी होतो.  त्यांना माहीत नव्हते की, तुकाचे कवित्व वाचून उठताच, तुकाच्या व माझ्या दोन्ही कुटुंबांच्या योगक्षेमाचे मला बघावे लागत होते.

संतमंडळींचे एकमेकांबद्दलचे प्रेम विलक्षण !  असे म्हणतात की, त्यांना दुरूनसुद्धा एकमेकांशी संवाद साधता येत होता.  तुकाने किंवा त्याच्या संतमित्रांनी जर असेच प्रेम स्वतःच्या कुटुंबियांबद्दल दाखविले असते तर !  पण संसार हा त्यांना ‘वमन’ होता.  कित्येक वेळा मला असे वाटे की, सर्व संत एकत्र होऊन संसारी माणसांविरुद्ध बंड करून उठत अाहेत.  त्यांना अाम्हा सर्वांचे संसार उद्ध्वस्त करायचे अाहेत.

संतांबद्दल असे बोलणे चूक ठरेल.  माझ्या मोठ्या भावाची मी निंदा केली असेही त्यात होईल.  माझी ही भावना माझ्यापुरती होती.  संत जमले अाणि मी तिथे गेलो की त्यांनी मला अापल्यापैकी समजावे असे मला वाटे.  त्यांच्यापैकी कवित्व करणारे एकदोनच होते.  मीही कवित्व करणारा होतो.  माझे कवित्व त्यांनी ऐकावे असे वाटे.  पण मी त्यांना त्यांच्या कथाकीर्तनानंतर जेवणास वाढणारा यजमान होतो.  अाता ते बोलत असता मी जसा बाजूला पडलो होतो, तसा सतत बाजूला पडत अालो होतो.

गवताच्या काड्या उपटीत, खाली मान घालून त्यांची चर्चा मी ऐकत होतो.  तुकाच्या भोवती काही वर्षे जमा झालेले हे लोक, एकदोन सोडले तर, मला फारसे अावडले नव्हते.  मला वाटे की, तुकाचा अाणि यांचा काही संबंध नाही.  तुका एका वाटेने जातोय, हे दुसऱ्या !

 || २० ||

गवताच्या काड्या खुडून मी तोंडात चघळू लागलो.  मला भूक लागली होती.  मी मग काडीने दात कोरू लागलो.  मंबाजी म्हणाला, “गावात म्हणताहेत, तुका सदेह स्वर्गाला तेला.”

मंबाजीला हे सांगताना अानंद वाटत होता तो मला अावडला नाही.  या कल्पनेचे तो स्वतःच्या हितासाठी कसे कौतुक व गाजावाजा करील हे माझ्या डोळ्यापुढे अाले.  तुका सदेह स्वर्गाला गेला असला तरी मला हेवा नव्हता.  पण ती अफवा अावडल्याबद्दल मला मंबाजीचा राग अाला.  तुका स्वर्गाला गेल्यावर त्याच्या बायकोमुलांचे काय होणार हे माझ्यापुढे अाले.

त्यांची बोलणी चालूच होती.  भंगलेले देऊळ कसे बांधले याची अाठवण निघाली.  तुकाने भिंतीसाठी चिखल केला तेव्हा “विठ्ठल-विठ्ठल” म्हणत तो कसा रंगायचा अाणि प्रत्येक वीट ‘“िठ्ठल” म्हणत त्याने कशी रचली, अशी कोल्हापुरास ऐकलेली कथा बहिणाबाईच्या नवऱ्याने सांगितली.  त्यामुळेच देवळाचे काम हजार वर्षे ढळणार नाही अशी समजूत अाहे, तो म्हणाला.

तो सांगत असता मला मनात हसू येत होते.  कारण त्यातले काही खरे नव्हते.  देऊळ नीट करताना मी तुकाला पहिले होते.  तो अभंग म्हणत नाचत नव्हता.  तो “िठ्ठल-विठ्ठल” म्हणतही नाचला नव्हता.  त्या वेळी तसले काही त्याच्या मनात नव्हते.  त्याने दुरुस्तीचे सारे काम स्वतः केले हे खरे.  मी मदतीला गेलो, पण माझी मदत त्याने घेतली नव्हती.  देह कष्टवून तो अापल्या गांजलेल्या मनाला गुंतवू पाहत होता.  याशिवाय काही नव्हते.  या तिघांपैकी ती दुरुस्ती पाहिली असलीच तर रामेश्वरभटाने.  त्या वेळी रामेश्वरभट तुकाला देहूचा एक दुर्दैवी महाजन म्हणून अोळखत असेल इतकेच–ज्याच्या घरी चार मृत्यू झाले, दिवाळे निघाले.

तुका त्या वेळी पराभूत तुका होता.  हे मोऱ्यांचे घर मोडकळीस अालेले घर होते, हे मानाने वाढलेले घर फजित झालेले, नमलेले घर होते.  जिथे सणसमारंभ, सनयाचौघडे घुमले होते तिथे शांतता अाणि हुंदके होते.  या मोऱ्यांचा प्रमुख केवळ लज्जा अाणि दुःख झाकण्यास देवळाची भिंत बांधीत होता.

पुढे तो कीर्तनाला बसू लागला, एकादशी करू लागला.  एकदा त्याने पंढरीची वारीही केली.  अर्थात, या नंतरच्या गोष्टी.  देऊळ बांधल्यावर काय झाले हे या मंडळींना कळावे म्हणून मी त्यांना म्हटले,

“ऐका !  तुका मला एकदा म्हणाला, ‘कान्हा !  भिंत नीट करून, हातपाय धुऊन मी देवळात जाऊन देवाला नमस्कार करून बाजूला बसलो.  माझ्या मागून एक गावकरी अाला.  दर्शन घेऊन तो पलीकडे बसला.  मग अाणखी एक गावकरी अाला.  तोही नमस्कार करून बसला.  मला नवल वाटले, कारण माझी जराही चलबिचल झाली नाही.  दुष्काळानंतर माणसांची मला भीती वाटू लागली होती.  प्रत्येक जवळ अालेला माणूस मला घेणेकरी वाटू लागला होता.  कित्येकदा मी भिऊन घरात अगदी अात काळोखात जाऊन बसे.  पण या वेळी त्या दोघांची मला थोडीही भीती वाटली नाही.  माझे मन इतके निवांत होते !  त्यापूर्वी मी देवळात अनेकदा गेलो असेन.  त्या दिवशी मला देऊळ काय हे खरे कळले.  गावात देऊळ हेच एक असे ठिकाण असते, जिथे व्यवहार संपतात.  विठ्ठल-रखुमाई असलेल्या या चार भिंतींत बसणारा निर्वेध बसतो.  माझ्यासारखा दिवाळे निघालेला येतो.  माझा सावकारही येतो.  देवासमोर ते सारखे समान होऊन बसतात.

“‘कान्हा !  अापल्या पूर्वजांनी देऊळच का बांधले हे मला तेव्हा प्रथम कळले अाणि भंगलेले देऊळ अापण नीट केले ही नकळतच किती चांगली गोष्ट केली, असे मनात येऊन माझे मला बरे बाटले.’

“मंडळी !  तुका मला असे म्हणाला अाणि देवळात जाऊन कीर्तनाला बसू लागला व एकादशी करू लागला.  त्यासंबंधीही तो काय म्हणाला सांगतो.  तो म्हणाला, ‘कान्हा !  मी पहिल्यांदा कीर्तनाला बसलो तेव्हा पंधरावीस श्रोते होते.  कीर्तनकार रंगला होता.  तितकेच श्रोतेही रंगले होते.  सगळे अानंदात भान विसरले होते.  मी अाश्चर्याने पाहू लागलो.  या मंडळीतील बहुतेक माझ्याप्रमाणे दुष्काळातून भाजून बाहेर अाली होती.  कुणाची अाई, कुणाचा बाप, कुणाची भाऊबहीण, मुले, माझ्या बायको-मुलांप्रमाणे अन्नअन्न करीत मेली होती.  त्यांचा अानंद मला कळेनाच.’

“‘कान्हा !  अापले मातापिता गेले तेव्हापासून दुष्काळापर्यंतच्या अापत्तींनी माझे मन पोखरून गेले होते.  बायकोसाठी अन्न मागायला दारोदार हिंडून मी अपमानित झालो, तो अपमान मन जाळत होता.  पण हे सर्व अपमान व दुःखे तिथे बसलेल्यांनीही सहन केली होती.  अािण तरी ती सारी अानंदात होती.  जणू जे हाल झाले ते हाल नव्हतेच व कीर्तन हेच खरे होते !  मी अादराने मनोमन त्यांच्या पायावर डोके ठेवले.  अाणि मनातच म्हटले, संतजनहो !  तुमच्या अानंदाचा एक चतकोर तुकडा या दुःखी जीवाकडे फेका.’”

तुकाने सांगितलेले मी सांगत होतो.  तिघेही मोठ्या भक्तिभावाने ऐकत होते.  मी ‘बुवां’ विषयी अाणखी सांगावे असा त्यांनी अाग्रह केला.  पुन्हा केव्हातरी सांगेन असे म्हणून मी उठलो.  तुकाला शोधायचे मुख्य काम होते.  माझी ती चिंता होती.

अाम्ही नदीच्या पलीकडल्या तीरावर होतो.  मग त्याच तीरावरून अाम्ही शोध घेत निघालो.  नदी वाहते त्या दिशेने अाम्ही चालू लागलो.  उन्हाने डोकी तापत होती.  घटिका गेली.  तुका इकडे कुठे गेला असेल असे चिन्ह दिसले नाही.  अाम्ही एका अांब्याच्या झाडाखाली थांबलो.  मग अापापल्या भाकऱ्या सोडून अाम्ही खाल्ल्या.

नदीच्या प्रवाहात उतरून अाम्ही पाणी प्यालो.  पाणी पिण्यास वाकलो असता पाण्यातले माझे प्रतिबिंब पाहून दचकलो.  मला तुकाची जबरदस्त अाठवण झाली.  जिथे तुका अाता असेल तेथे त्याला भाकरी मिळाली असेल का ?  अापले जेवण झाल्यावर त्याची अाठवण यावी याचे मला फार वाईट वाटले.  देहधर्म माणसाला प्रेमही विसरायला लावतात.  दुष्काळात अनेकांनी स्त्रिया व मुले विकली नव्हती का ?  काही ठिकाणी मुलेही फाडून खाल्ली, अशा तेव्हा वदंता होत्या.

मग अाम्ही तोंड फिरवून नदीच्या मुखाकडे चालू लागलो.  पोट भतले होते.  तहान भागली होती.  धुळीत पाय भाजत होते तरी पावले जड नव्हती.  माझे चित्त अाशा गोष्टींकडे नव्हते.  तुका गेल्याचा हा दुसरा दिवस होता.  सूर्य डोक्यावरून खाली उतरत होता.  त्याच्याकडे टक लावून म्हटले, अादित्यादेवा !  तू सर्वसाक्षी अाहेस.  माझा तुका कुठे गेला सांग.  माणसांचे सर्व पाहत तू अनेक युगे फेऱ्य घालीत अाहेस.  तू कधी बोलत नाहीस.  तरी या एका वेळी बोल.  अगे इंद्रायणी, हे वृक्षांनो, हे शेतमळ्यांनो, डोंगरांनो–कुणीतरी सांगा तुका कुठे गेला ते.  इंद्रायणी !  तुझा प्रवाह त्याने निश्चित अोलांडला असेल.  तुझ्या ज्या बिंदूचा तुकाच्या पायांना चंचल स्पर्श झाला तो बिंदू दूर वाहत गेला असेल.  त्याला परत बोलावून विचार.  तुझ्या प्रवाहाच्या तळातील कुठलीतरी वाळू तुकाच्या पायांखाली दाबली गेली तिला विचार.  हे वृक्षांनो अाणि गवतांनो, तुम्ही डुलता अाहात ते तुका कुठे गेला हे सांगता येत नाही या दुःखानेच ना ?  तुमच्या फांद्यांचे हात करून तुका गेला ती वाट दाखवा.  हे पाखरांनो !  झाडाझाडांवरून उडताना तुम्ही नक्की तुका कुठे गेला हे पाहिले असेल.  सोयरी-सहचरे म्हणून तुम्हा सर्वांना तुकाने प्रेमाने म्हटले.  तुमच्यापैकी कुणीतरी, तुकाने समाधी लावल्यावर त्याच्या खांद्याडोक्यावर निर्वेध बसला असाल.  अाणि तुकाने अापल्या शिदोरीतील अन्नाचा वाटा तुम्हांला अनेकदा दिला असेल.  तुमच्यांतले जे वृद्ध पक्षी, त्यांनी तुकाची अनेक कौतुके तुम्हांला सांगितली असतील.  ती अाठवून तरी सांगा तुका कुठे अाहे ?  सगळे शोक व्यर्थ असतात तसा हाही शोक व्यर्थ होता.

|| २१ ||

दादा !  सारी कामे सोडून मी तुला असा शोधीत हिंडत अाहे.  अापली शेते माझी वाट पाहत अाहेत.  राबाची तयारी करायची अाहे.  गुरे वाट पाहत अाहेत.  दुकान वाट पाहत अाहे.  घरी जाऊन मुलांशी हसणे-खेळणे करायचे अाहे.  बायकोशी प्रेमगोष्टी करायच्या अाहेत.  पण ते सोडून मी रानोमाळ तुझ्यामागे हिंडतो अाहे.

दादा !  या सर्वांना वाटतेय, केवळ भावाच्या नात्यामुळे मी तुला शोधतोय.  त्यांना असेही वाटत असेल की, भावाने भावाला शोधले नाही तर लोकापवाद येईल म्हणून मी तुला शोधतोय.  मी तुला का शोधतोय हे मनोमन मला ठाऊक अाहे.  मी तुला शोधतोच अाहे, पण जे मी हरवून बसलोय ते शोधतोय.  दादा !  तू जे शोधीत अाहेस त्याची चुणूक मी अनुभवली अाहे.  तू ज्या विरक्तीत पूर्ण बुडाला अाहेस, त्यात चुकलीमाकली बुडी मारून घाबरा होत मी बाहेर अालो अाहे.  ज्या विरक्तीने अापल्या कुटुंबाला पछाडले तिने मला तरी कुठे सोडले अाहे ?  संपूर्ण विरागी होणे कदाचित सुखाचे असेल.  पण विरक्तीचे झटके येण्यासारखे दुर्दैवाचे काही नाही.  मधूनच संसार वमन वाटतो, पण तो सोडवतही नाही, अशी अवस्था अत्यंत शोककारक असते.

‘वमन’ हा शब्द तुझा फार लाडका अाहे.  किती घाणेरडी उपमा देतोस तू संसाराला !  जेवत असता कुणीतरी विष्ठा टाकावी इतकी शिसारी हा शब्द मला देतो.  या संसारात गुंतलेले अाम्ही इतके घाणेरडे अाहोत का रे ?  कधीकधी संसारी माणसाचा तू हा करीत असलेला उपहास मला असह्य झाला अाहे.  पहाटे उठून जेव्हा मी तुझे कवित्व वाचायचो, तेव्हा मला तुला सांगावेसे वाटायचे, दादा !  नको रे हा ‘वमन’ शब्द वापरूस.

दादा !  मला संसार वमन वाटत नाही.  माझा भाऊ मला हवाय.  म्हणून मी तुला शोधतोय, समजू या.  पण तुझे हे शिष्य तुला का शोधत अाहेत ?  एक नश्वर देह सापडवण्याची यांची एवढी तगमग का ?  की मी एका संसारात गुरफटलो अाहे तसे हे दुसऱ्या एका ‘संसारात’ गुरफटले अाहेत–संतांच्या ?  अाणि त्या संतांच्या संसाराचा त्यांना तितकाच मोह अाहे.  ‘तुका गेला म्हणता; ठीक !’  असे म्हणून त्यांनी अापल्या नामसंकीर्तनात शांतपणे रमायला हवे होते.  दादा !  तुझ्या मागेमागे लागलेले हे लोक मला एवढेसे अावडत नाहीत.

 || २२ ||

अाज दीड दिवसाच्या शोधातच माझे पाय गळले अाहेत.  काही वर्षांपूर्वी मी तुला सात दिवस शोधले व घरी घेऊन अालो तेव्हा मी थकलो नव्हतो.  तुला शोधण्यासाठी पृथ्वी खणून काढण्याची उमेद होती तेव्हा.  हा वयाचा फरक असेल.  तेव्हा मी अठराएकोणीस होतो.  तू एकवीस होतास.  संसाराच्या भाराने थकलो नव्हतो तेव्हा–अापला मोठा भाऊ हरवलाय, त्याला शोधायचाच एवढेच मनात होते.  त्या सात दिवसांत मी राने, डोंगर पालथे घातले.  प्रत्येक झुडपात शिरून धुंडाळले.  डोहात बुड्यात मारल्या.  कधी थकलो नाही.  पाय गळले नाहीत.

तुझी मनःस्थिती मला तेव्हा कळली नव्हती.  तुझे जाणे हे कुटुंबावरचे संकट होते व त्या संकटाला तोंड देण्यास मी ठाकलो होतो.  तुझ्या मनात काय चालले अाहे हे कळण्याचा पोच मला नव्हता.  तू दुःखी अाहेस, अस्वस्थ अाहेस, एवढे दिसत होते.  पण तू भामनाथ डोंगरावर जाऊन बसलेला असशील हे स्वप्नातही अाले नाही.  तीनचार कोसांवरच्या जंगलातल्या या डोंगरावर तू जाण्याचे कारण नव्हते.  तिथे अाहे काय, तर जुन्या काळापासूनचे शंकराचे स्थान, मोडके देऊळ.  लहानपणी अापण दोनचार वेळा गंमत म्हणून तिथे गेलो होतो, इतकेच.  त्या वेळी सहा दिवस तुला शोधून सातव्या दिवशी जवळजवळ निराश होऊन या डोंगरावर चढलो, ते उंचावरून भोवतालचा प्रदेश न्याहाळता येईल, कुठे तुझी हालचाल कळेल यासाठी.  डोंगर चढून मी माथ्यावर गेलो अाणि तू बेशुद्ध पडलेला मला दिसलास.

मी धावत तुझ्यापाशी अालो.

खरे म्हटले तर पहिल्यांदा वाईट शंकाच मनात अाली होती, इतका तू अस्ताव्यस्त पडला होतास.

ते सात दिवस मी दोघांपुरती भाकरी अाणि लोटाभर पाणी बरोबर बाळगीत होतो.  अाणि तू सापडला नाहीस की माझ्या वाटणीची भाकरी किंवा पाणी न संपविता शिदोरी तशीच परत अाणीत होतो.  मला वाटायचे की, तू इतका भुकेला असशील की तुला दोघांच्या वाटणीच्या भाकऱ्या लागतील.  तू इतका तहानेला असशील की हा लोटासुद्धा तुला पुरणार नाही.

धावत पुढे होऊन मी तुला हलविले.  “दादा !  दादा !” हाका मारल्या.  तुझ्या तोंडावर दोन चुळका पाणी मारले.  तुझ्या तोंडात चार थेब सोडले.  हळूहळू तू डोळे उघडलेस.  मला इतका अानंद झाला !  शक्तिपात झाल्यासारखी तुझी गात्रे गळली होती, त्यांत थोडा जीव अाला.  तुला मी बसते केले.  मग भाकरी सोडली.  लहान मुलासाठी करतो तसे भाकरीचे बारीक तुकडे केले.  अगदी सावकाश चावतचघळत खायला सांगून, एकेक तुकडा पाण्यात बुडवून तुला भरवीत बसलो.  अर्धी भाकरी खायला तुला तास लागला.

तुला बरे वाटू लागल्यावर अापण डोंगर उतरू लागलो.  तुझा एक हात माझ्या मानेभोवती धरून, माझ्या दुसऱ्या हाताने तुझ्या कमरेभोवती मिठी घालून तुला सावरीत खाली अाणले.  मधनूमधून तू थकलाससे पाहून मी तुला थांबवून बसून राहायला लावीत होतो.  इंद्रायणीच्या काठाशी अालो तेव्हा वाटले, अापण कितीतरी तास चालत होतो.  तिथे अापण डोहावर बसलो अाणि तू म्हणालास, “कान्हा !  घरी जाऊन कपाटातील सारे कर्जरोखे घेऊन ये.  ते डोहात बुडवून मगच मी घरी येणार अाहे.”

प्रथम तुझे बोलणे मला कळलेच नाही.  सात दिवसांच्या शोधात झालेली धावपळ, अाणि नंतर तू सापडल्याचा अानंद डोक्यात होता.  सात दिवस तू अाम्हांला कसे घाबरवून सोडलेस, घरी काय अवस्थ झाली हे मला सांगायचे होते.  अाणि सर्व धावपळीचा शेवट गोड झाल्याने, त्यावर गमतीने बोलायचे होते.

पण तेव्हा, त्या स्थळी तुझे ते वाक्य इतके अवचित अाले की क्षणभर सुन्न झालो.  मागतील सात दिवसांत तुझ्या डोक्यात काहीतरी विलक्षण चालू असले पाहिजे.  पण ते जाणून घेण्यापेक्षा मी माझ्या विचारातच राहिलो.

दुष्काळानंतर पाऊसपाणी चांगले झाले होते.  लोकांजवळ धान्य झाले होते.  धनही.  ज्यांचे कर्जरोखे अापणाकडे होते त्यांची फेड सुरू झाली होती.  व्याजासह कर्जे परत अाली की अापला संसार पुन्हा ताळ्यावर येईल अशा अाशेत मी होतो–अाम्ही घरचे सर्व होतो.  पुन्हा श्रीमंती येण्याचे हिशेब सुरू झाले होते.

अाणि तू कर्जरोखे इंद्रायणीत बुडवायचे बोलत होतास.

तुझी लहर मला कळेना.  जर शरीर जिवंत तर सारे जिवंत.  माझी खात्री झाली की दुष्काळापेक्षाही मोठे संकट तुझ्या लहरीने अापल्या कुटुंबावर कोसळणार.  माझे डोके गरम झाले.  बायकापोरे उपाशी मारण्याचे हे तुझे डोहाळे !  माझ्या तोंडून शब्द फुटेना !  तू शांतपणे म्हणालास,

“कान्हा !  यापुढे माझ्या हातून सावकारी होणार नाही.  दिवाळे निघून अपमान झाल्यावर कित्येकदा जीव द्यावा असे मनात अाले.  माझे काय होणार मला कळेना.  मी देऊळ नीट करून पाहिले.  मग लोकांत अपमानाचे जिणे असह्य झाले म्हणून दूर जाऊन विचार करायचा असे ठरवून मी या डोंगरावर अालो.  तिथून मी लोकांकडे पाहू लागलो.  थोडे भजनकीर्तनात रंगले होते.  बाकीचे संसारात रंगले होते.  मी त्या थोड्या लोकांत जायचे की बाकीच्या लोकांनत लोकांत जायचे, हा प्रश्न होता.

“जर बाकींच्याप्रमाणे राहायचे ठरवले तर त्यांच्याप्रमाणे अापल्याला पुन्हा पोटापाण्याचा उद्योग सुरू करायला हवा.  अाणि सावकारी कधी तोट्यात येत नाही.  धन मिळवणे सोपे अाहे.  पण अापल्या बाबांनी धनसंचय केला अाणि सगळे धन इथे सोडून त्यांना जावे लागले.  ते धन त्यांनी मिळवले नसते तर काही बिघडले नसते.  कारण अापण त्यांची मुलेही तसेच एकदा धन सोडून जाणार अाहोत.  बाबांनी मरताना माझी अाठवण अनेकदा काढली.  मी जवळ असताना मरणे ही साधी गोष्ट त्यांच्य हाती नव्हती.  माझी बायको अाणि मुलगा उपाशी मेली.  अापण महाजनांच्या घरचे, कधी असे अन्न-अन्न करीत मरू हे त्यांच्या स्वप्नातही नसेल.  दुष्काळ त्यांच्या हातात नव्हता.  माझी पहिली बायको खूप वर्षे मला सोबतीला हवी होती.  तेही माझ्या हातात नव्हते.  तिचे मरण मला हतबल होऊन पाहत बसावे लागले.

“अापण सर्व दुबळे अाहोत–माझ्या ध्यानात अाले.  अापण सर्व करतो, अापण ठरवतो व होते, असे अापणांस वाटत असते.  पण अापण काही करीत नाही, काही ठरवणे हेही अापल्या हाती नाही–मला कळून चुकले.

“भजन-कीर्तनांत रमणारे अापल्या गावात जे चार लोक होते त्यांचे ऐकायला मी देवळात जायचो.  संसारचक्रातून मुक्त होण्यास ते विठ्ठलाचे नाव घेण्यास सांगायचे.  ऐकताना ते मनाला पटायचे.  पण कीर्तनातून बाहेर अाले की संशय यायचे–माणसाचे दुःख असे कसे जाईल ?  माणसाने उद्योगउदीम केला पाहिजे.  कुटुंबात एकमेकांवर प्रेम केल पाहिजे.  लोकांनी परस्परांना मदत केली पाहिजे.  दुःख अशामुळे जाते.
“परंतु पुन्हा कीर्तनाला बसल्यावर, विठ्ठलनामात गुंगल्यावर अापले हे वाटणे चकू अाहे असे वाटायचे.  माणसाच्या दुःखाची यांची व्याख्या वेगळी अाहे.  यांचे काहीतरी निराळेच अाहे.  संसाराचे रहाटगाडगे वरखाली िफरत राहाणार.  सुखदुःखे होणार, धन येणार, जाणार, प्रियजनांचा मृत्यू होणार.  हे चक्र थांबणार नाही.  माणसाचे यात काही साधणार नाही.  अज्ञान हेच माणसांचे दुःख अाहे.  मग अापण काय करायचे ?  पुन्हा सावकारी सुरू करायची ?  पुन्हा श्रीमंत झालो तरी काय होणार ?  ज्यांच्या दाराशी मी धरणे धरीन, घरावर जप्ती अाणीन त्यांचा व माझा शेवट एकच होणार अाहे.  माझ्या ऋणकोपेक्षा फार तर चार दिवस मी जास्त चांगले अन्न खाईन.  चांगली वस्त्रे वापरीन.  याशिवाय त्यात जास्त काय अाहे ?  मग धनको होऊन मी दुसऱ्यांना का लुबाडावे ?  हे मी का करावे ?

“कान्हा !  मी ठरवले, ‘सावकारी’ इंद्रायणीत बुडवायची.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*